आगामी आठवडाभर विदर्भात उष्णतेची लाट

    दिनांक :22-May-2020
|
-तापमान ४५ व ४६ अंशावर राहण्याची शक्यता
-शासनातर्फे सर्वत्र सतर्कतेचा इशारा
नागपूर,
संपूर्ण देशात नागपूर उन्हाळ्यातील उन्हाच्या तडाख्यासाठी प्रसिद्ध आहे. मागील संपूर्ण वर्ष पावसाने पाठ सोडली नाही. मागील आठवड्यात देखील सायंकाळी व रात्री पावसाने हजेरी लावली. पण आता सूर्यनारायणाने कंबर कसली असून येत्या आठवड्यात २७ मे पर्यंत विदर्भात उष्णतेची लाट येणार असून या काळात तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सियसपर्यंत राहण्याची शक्यता हवामानखात्याने व्यक्त केली आहे.
 
heat_1  H x W:  
 
 
सध्या संपूर्ण देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने लॉकडाऊन लागू केले असून त्यामुळे सर्व व्यवहार आणि वाहतूक तसेच घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. पण मध्यंतरी सर्व व्यवस्था काहीअंशी शिथिल करण्यात आल्याने लोक घराबाहेर पडत असतात. पण आता आठवडाभर कुणीही घराबाहेर पडू नये, अशी स्थिती निसर्गाने निर्माण केल्यामुळे किमान या आठवड्यात तरी उन्हाच्या तडाख्यामुळे लॉकडाऊनचे कठोर पालन होईल, अशी स्थिती दिसत आहे.
 
 
नागपूर शहराचे कमाल तापमान शुक्रवारी ४४.५ तर किमान २२.२ अंशावर होते. गुरुवारी देखील रात्री उशीरापयरत उन्हाच्या झळा सवारना सहन कराव्या लागल्या. शुक्रवारी सकाळी ७ वाजता पासूनच प्रखर सूर्यकिरणाने अंगाची लाही होईल, अशी स्थिती जाणवत होती. त्यानंतर दुपारी सूर्य माथ्यावर आल्यानंतर तर घरात बसणे देखील कठीण झाले होते. घरातील पंखे, कुलर, एसी देखील काम करेनासे झाले आहेत. अनेक भागातील विहीरींची पाण्याची पातळी खाली गेली आहे. येत्या काळात पिण्याच्या पाण्याची देखील समस्या जाणवण्याची शक्यता आहे. यावर्षी पाऊस अधिक झाल्याने धरणात पाणी आहे. पण लॉकडाऊनमुळे जलप्रदाय विभागात कर्मचार्‍यांची संख्या लक्षात घेता शुद्ध केलेल्या पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.
 
उष्णतेचा सामना करा
यावर्षी फेब्रुवारीपासून कोरोना प्रादुर्भावामुळे सर्व प्रकारचे थंड खाद्य पदार्थांची निर्मिती बंद आहे. त्यामुळे नैसर्गिक थंडाव्याशिवाय कृत्रिम गारवा मिळणे दुरापास्त आहे. त्यामुळे लोकांनी घरातच रहावे, उष्ण प्रकृतीच्या जिन्नसांचे सेवन करावे यातून उन्हापासून बचाव होईल आणि कोरोनाचा संसर्ग देखील टाळणे शक्य होणार आहे.