‘स्पेस एक्स' दोन अंतराळवीरांसोबत झेपावणार

    दिनांक :22-May-2020
|
केप कॅनव्हेराल,
तब्बल नऊ वर्षांनंतर अमेरिकेच्या धरतीवरून होणा-या 'स्पेस एक्स' या खासगी अवकाश संशोधन कंपनीतर्फे आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रामध्ये पाठविण्यात येणार दोन अंतराळवीर उड्डाणासाठी सज्ज झाले आहेत. हे दोघेही गुरुवारी येथील केनेडी अवकाश केंद्रात दाखल झाले. पुढील आठवड्यात अंतराळवीर डग हर्ले आणि बॉब बेकन यांना सोबत घेत स्पेस एक्सचे अंतराळयान ऐतिहासिक उड्डाण करेल. सरकारी मोहिमेऐवजी खाजगी कंपनी अंतराळवीरांना अंतराळात पाठविण्याविषयी ही पहिलीच वेळ आहे. 
 
spacex_1  H x W
 
अंतराळवीर डग हर्ले आणि बॉब बेकन हे अंतराळ संस्थेच्या विमानाने ह्युस्टनहून फ्लोरिडा येथे दाखल झाले आहेत. फ्लोरिडास्थित अंतराळयान प्रक्षेपणस्थळाहून अमेरिकन अंतराळवीर पुन्हा एकदा अंतराळ मोहिमेवर जाणार असून नासा आणि अंतराळ कार्यक्रमासाठी हा अद्भुत क्षण आहे.
 
आजपासून आठवडाभरात आम्ही अंतराळत भरारी घेऊ. आमच्यासाठी ही एक संधी तर आहेच, तसेच अमेरिकी जनता, स्पेस एक्स आणि नासासाठी आमची जबाबदारी आहे, असे आम्ही मानतो, असे अंतराळवीर हर्ले यांनी फ्लोरिडा येथे पोहोचल्यानंतर पत्रकारांना सांगितले. पुढच्या बुधवारी दुपारी हे दोन्ही अंतराळवीर स्पेस फाल्कन ९ रॉकेटच्या साह्याने स्पेस एक्स ड्रॅगन अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राकडे रवाना होतील.