अमरावतीत पुन्हा सहा कोरोनाबाधित, एकाचा मृत्यू

    दिनांक :22-May-2020
|
 
आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू
अकरा रुग्णांना डिस्चार्ज

तभा वृत्तसेवा
अमरावती,
अमरावतीत कोरोना रूग्णाची संख्या सातत्याने वाढत आहे. शुक्रवारी कोरोनाच्या सहा नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात 4 पुरूष, 1 महिला व एका मुलाचा समावेश आहे. आतापर्यंत 145 कोरोनाग्रस्त झाले असून त्यापैकी 14 जणांचा मृत्यू झाला तर 53 रुग्ण अमरावती रुग्णालयात उपचार घेत आहे. दोन रुग्णाला नागपूरात हलविण्यात आले आहे तर 76 रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.
 
ambud_1  H x W:
 
जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मसानगंज येथील 50 वर्षीय महिला व लालखडी येथील 19 वर्षीय मुलाचा, शिवनगर येथील २३ वर्षीय पुरुषाचा, इतवारी बाजार येथील २९ वर्षीय पुरुषाचा, भातकुली येथील ५० वर्षीय पुरुषाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच मध्यप्रदेशच्या इंदूर येथून लोहोगाव (नांदगाव खंडेश्वर) येथील एक कुटुंब प्रवास करून जिल्ह्यात आले असता त्यांचे विलगिकरन करण्यात आले. दरम्यान, या कुटुंबातील एका सात वर्षीय मुलाचा इंदूर येथे लॅबमध्ये स्वॅब घेण्यात आला. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळताच त्याला तात्काळ जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे व त्याच्यावर उपचार होत आहेत. त्याच्या संपर्कातील इतर 9 नागरिकांना संस्थात्मक विलगिकरण करून नमुने घेण्याची कारवाई करण्यात येत आहे.

30 वर्षीय युवकाचा मृत्यू
जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल पाटीपुरा येथील तीस वर्ष युवकाचा उपचारा दरम्यान शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. संबंधित रुग्णाला 15 मे पासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा अहवाल 16 मे रोजी पॉझिटिव्ह आला होता. गेल्या पाच-सहा दिवसांपासून त्यांची प्रकृती नाजूक होती. या रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज पहाटे त्याची प्राणज्योत मालवली.

66 प्रलंबित, 151 नवीन पाठविले
जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून शुक्रवारी कारोना तपासणी अहवालाचा तपशिल प्राप्त झाला. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत 12 हजार 619 नागरिकांची तपासणी झाली आहे. तसेच आजपर्यंत 3 हजार 157 जणांचे थ्रोट स्वॅब तपासणीला पाठविले, त्यापैकी 2 हजार 843 जणांचे अहवाल निगेटिव्ह व 145 जणांचे पॉझिटिव्ह आले आहे. त्यातील 14 जणांचा मृत्यू झाला असून 53 जणांवर अमरावतीत तर दोघांवर नागपूरात उपचार सुरू आहे. 76 जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. 66 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. शुक्रवारी 151 नवीन नमुने पाठविण्यात आले. आज 60 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 54 निगेटिव्ह व 6 पॉझिटिव्ह आले. 106 नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, असे प्रशासनाने कळविले आहे.

कोविड रूग्णालयातून अकरा जणांना डिस्चार्ज
जिल्हा कोविड रूग्णालयातून 11 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात पाच महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. यात मसानगंज येथील 35 वर्षीय महिला, 38 वर्षीय महिला, 52 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, खोलापुरी गेट येथील 35 वर्षीय महिला, नांदगाव पेठ येथील 60 वर्षीय महिला, परतवाडा येथील 42 वर्षीय पुरुष तसेच उत्तम नगर येथील 42 वर्षीय महिला, अंबिका नगर येथील 43 वर्षीय पुरूष, बेलपुरा येथील 30 वर्षीय पुरूष व लालखडी येथील 65 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. घरी परतल्यानंतर हे रूग्ण 14 दिवस विलगीकरणात राहणार आहेत. आतापर्यंत बरे होऊन घरी परतलेल्या रूग्णांची संख्या 76 झाली आहे. कोरोना योग्य उपचारांनी बरा होतो. त्यामुळे कुठलीही लक्षणे दिसताच तत्काळ तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम व आरोग्य कर्मचार्‍यांनी केले आहे.