भरवस्तीत कोसळले पाकिस्तानचे प्रवासी विमान

    दिनांक :22-May-2020
|
- विमानातील 98 जण ठार
-बळीसंख्या वाढण्याची भीती
कराची,
लाहोर येथून कराचीला जाण्यासाठी झेपावलेले पाकिस्तान इंटरनॅशनल एअरवेजचे विमान आज शुक्रवारी दुपारी कराचीतील मॉडेल कॉलनीमध्ये कोसळले. या विमानात 91 प्रवासी आणि चालक दलाचे 7 सदस्य असे एकूण 98 जण होते. कराची विमानतळावर उतरण्यापूर्वी हा भीषण अपघात झाला. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. विमान भरवस्तीत कोसळल्याने बळीसंख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 

plane crash_1  
 
 
ए-320 या प्रकारातील विमानाने आज दुपारी लाहोर येथून उड्डाण केले. पीके-8303 क्रमांकाचे हे विमान कराची येथील विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असताना, हा भीषण अपघात झाला. भरवस्तीत विमान कोसळल्याने घटनास्थळी मोठी आग लागली. येथील अग्निशमन विभागाच्या बंबांनी घटनास्थळी पोहोचून विमानामुळे लागलेली आग विझवली. कोसळताना या विमानाने चार घरांना धडक दिली. हे विमान कराचीतील मॉडेल कॉलनीजवळ मालिर केन्ट प्रवेशद्वार क्रमांक दोनजवळ कोसळले. विमान कोसळल्यानंतर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
 
 
धावपट्टीवर उतरण्याच्या तयारीत असल्याने विमान अतिशय कमी उंचीवरून उतरत होते. या विमानाने काही घरांना धडक दिली. धडक दिल्यानंतर या घरांच्या छतांना अडकल्याने ते कोसळले. विमान कोसळण्यापूर्वी वैमानिकाने आपात्कालीन संदेश विमानतळाला दिला होता. धावपट्टीवर उतरण्याच्या मिनिटभरपूर्वी विमानाचा संपर्क तुटला होता, अशी माहिती उड्डयन विभागाने दिली. प्राथमिक माहितीनुसार, विमान कोसळल्यामुळे एक महिला व बालक जखमी झाले.
 
 
विमान कोसळताच कराची विमानतळावर आणिबाणी घोषित करण्यात आली. घटनास्थळावर पोहोचलेल्या पोलिस आणि रेंजर्सनी बचाव कार्यात अडथळा ठरणार्‍या लोकांना हटवणे सुरू केले. आगीची व्याप्ती वाढत असल्याने पाकिस्तानी लष्कराच्या जलद प्रतिसाद दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
 
 
वृत्तवाहिनीचा अधिकारीही ठार
पीके-8303 क्रमांकाच्या विमानाला अपघात झाला, अशी माहिती पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचे प्रवक्ते अब्दुल्ला हाफीज यांनी दिली. या विमानात 24 न्यूज या वृत्तवाहिनीचे कार्यक्रम संचालक अन्सार नक्वी हे देखील प्रवास करीत होते, असेही त्यांनी सांगितले.
 
 
अनेक घरे उद्ध्वस्त
विमान कोसळल्यामुळे या परिसरातील अनेक घरांना आग लागली, तसेच अनेक घरे उद्ध्वस्त झाली, अशी माहिती नागरी उड्डयन प्राधिकरणाने दिली. अपघात होताच आरोग्य मंत्रालयाने कराचीतील सर्वच रुग्णालयांमध्ये आणिबाणी घोषित केली.