सावली होणार गायब

    दिनांक :22-May-2020
|
- दुपारी 12 वाजून 10 मिनिटांनी सावली सोडणार साथ
 
 

zero shadow day _1 & 
 
सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर दिसतो. आपली सावली आपल्यालाच दिसत नाही. यालाच शून्य सावली दिवस (झिरो शॅडो डे) म्हणतात. नागपूर जिल्ह्यातही या शून्य सावली दिवसाचा अनुभव 24 ते 28 या कालावधीत विविध तालुक्यांमध्ये अनुभवता येणार आहे, अशी माहिती पंचांगकर्ते जोतिष रत्न पंचांगभूषण पं. देवव्रत बूट यांनी सांगितली आहे.
 
 
पृथ्वीचा ध्रुव 23.5 डिग्री उत्तरेकडे कलला असल्याने परिभ्रमण करताना सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायण होते. म्हणूनच सूर्य विषुव वृत्तापासून दक्षिणेकडे 23.5 आणि उत्तरेकडे 23.5 डिग्रीपर्यंत भ्रमण करताना दिसतो. एखाद्या अक्षांशावर सूर्याचा कोनीय व्यास आणि अंशात्मक अंतर जुळते आणि शून्य सावली अनुभवता येते. तेथील कुठल्याही वस्तूची सावली दुपारी पडत नाही. त्यामुळे मे महिन्यात तीन ते 30 मे दरम्यान आणि 15 ते 22 उत्तर अक्षांशावर महाराष्ट्रातून शून्य सावली दिवस घडतो. ही खगोलीय घटना असली तरी शिकण्यासाठी खूप उपयोगी आहे.
 
 
पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडेच्या भागात तर कर्कवृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. तो सदैव क्रमशः उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे दिसतो. पण दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवयाला मिळतो. तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते व जणू काही सावली गायब होते, असे पं. देवव्रत बूट म्हणाले.
 
शून्य सावली दिवस कुठे आणि कधी?
 
 अनु. क्र.   शहर तारीख  वेळ
 1 भिवापूर 24 मे 12.08 मि
 2 उमरेड 24 मे 12.09 मि
 3 कुही  25 मे 12.09 मि
 4 मौदा 26 मे 12.09 मि
 5    कामठी 26 मे 12.10 मि
 6 कळमेश्र्वर 26 मे 12.11 मि
 7 नागपूर 26 मे 12.10 मि
 8 काटोल 27 मे 12.12 मि
 9 पारशिवनी 27 मे 12.10 मि
10 रामटेक 27 मे 12.10 मि
11 हिंगणा 27 मे 12.10 मि
12 सावनेर  27 मे 12.11 मि
13 नरखेड 28 मे 12.13 मि
 
पृथ्वी सुर्याभोवती भ्रमण करतांना आपल्या कक्षात साडेतेवीस अंश सूर्याकडे झुकते यामुळे सूर्योदय आणि सूर्यास्त प्रत्येक दिवशी स्थान बदलवून होत असतो. यामुळे उत्तरायण व दक्षिणायन होत असते. प्रत्येक वर्षी दोन दिवस सूर्य विषुव वृत्तावर असल्यामुळे रात्र व दिवस समान असतात. तसेच वर्षातून दोन वेळा सूर्य बरोबर डोक्यावर आल्यामुळे कोणत्याही वस्तूची सावली ही अगदी बरोबर तिच्या पायाखाली येते त्यामुळे ती दिसत नाही. यामुळे या दिवसाला जगभरात ‘झिरो शॅडो डे’ असे म्हटले जाते.
 
 
शून्य सावलीचा अनुभव उत्तर गोलार्धातील कर्कवृत्त आणि दक्षिण गोलार्धातील मकरवृत्त यामधील प्रदेशातच सूर्य आकाशात बरोबर डोक्यावर आल्याने वर्षातून दोन वेळा घेता येतो. आपण असतो, त्या स्थळाचे अक्षांश आणि सूर्याची क्रांती ज्या दिवशी सारखी होते. त्याच दिवशी दुपारी मध्यान्हाला सूर्य आकाशात ठीक डोक्यावर येतो. नागपूरचे अक्षांश उत्तर 21 अंश आहेत.
 
 
येथल्या मंगळवारी 26 मे रोजी सूर्याची क्रांती उत्तर 21 अंश होणार असल्याने सूर्य आकाशात ठीक डोक्यावर येणार असून नागपूरकरांना हे 26 मे ला शून्य सावलीचा अनुभव घेता येईल, अशी माहिती जोतिष रत्न पंचांगभूषण पं. देवव्रत बूट यांनी दिली.