जीवन जगायचे कसे?

    दिनांक :23-May-2020
|
 
joy_1  H x W: 0
 
-गजानन निमदेव
 
 
जीवन कसे जगायचे, हे ज्याचे त्यानेच ठरवायचे असते. अनेक जण आनंदाने जगत असल्याचा भास करवतात. पण, प्रत्यक्षात त्यांचे जीवन हे अधिक कष्टमय आणि दु:खी असते. आपल्याला कधी आनंद होतो, तर कधी दु:ख. कधी आपण आनंद मिळविण्यासाठी नाचतो, तर कधी आनंद झाल्याने नाचतो. आता झाडाचेच बघा ना, मुळांमध्ये जो उल्हास असतो, तो मुळांना प्रत्यक्षरीत्या व्यक्त करता येत नसल्याने फुलांच्या रुपाने तो व्यक्त होतो. मनुष्याचेही असेच आहे. थोडा फरक जरूर आहे. जे लोक आनंदी असल्याचे ढोंग करतात, त्यांना आंतरिक त्रासही खूप होतो आणि त्यामुळे त्यांना आजारही होतात. त्यामुळे आपण जसे आहोत, तसे जगण्यातच खरा आनंद आहे. आपल्याला जर सातत्याने रागच येत असेल तर येऊ द्या, आपल्याला जर प्रेम करायलाच आवडत असेल तर निरंतर करीत राहा. जे काही करू इच्छिता, ते नियमितपणे करा. मग बघा, तुम्हाला आनंदाची अनुभूती येते की नाही? आपल्याला ज्या दिशेने जायचे आहे, ती एकदाची निश्चित करा, त्या दिशेने निष्ठेने प्रवास करा. रोज रोज दिशा बदलण्याने प्रगती होत नाही आणि आयुष्य आनंदीही होत नाही.
 
 
आपल्या देशातील एका मोठ्या शहरात महेशने(बदललेले नाव) एक सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली होती. त्याला आता चाळीस वर्षे झाली. आपली ही कंपनी एक दिवस नावारूपास येईल आणि तिचा पसारा एवढा मोठा होईल, याची कल्पनाही महेशने कधी केली नव्हती. सगळ्यांनी मिळून निष्ठेने काम केले तर मोठे यश मिळू शकते, ही त्याची भावना जरूर होती. पण, पसारा एवढा मोठा होईल, असे त्याला कधीच वाटले नव्हते. काही वर्षांनी महेशने स्वत:ला कंपनीच्या कामापासून दूर केले आणि सगळी जबाबदारी काही निष्ठावान कर्मचारी आणि अधिकार्‍यांवर सोपविली. त्यामुळे आता सगळे काम हे महेशच्या डोक्याने नव्हे, तर कर्मचारी आणि विविध विभाग प्रमुखांच्या डोक्याने चालायला लागले. वर्ष-दोन वर्ष झाली असतील. महेश असाच कंपनीच्या कार्यालयासमोरून चालला होता. त्याला कंपनीच्या प्रवेशद्वारापाशीच कचर्‍याची मोठी पेटी दिसली. त्यातल्या कचर्‍याचा वासही येत होता. त्यामुळे न राहवून महेश आत गेला आणि चपराशाला कचर्‍याबाबत विचारले. चपराशी म्हणाला की, कचर्‍याची ती पेटी जड झाली आहे आणि मला एकट्याला ती उचलून नेता येणे शक्य नाही, म्हणून कचरा फेकला नाही. याबाबत मी साहेबांकडे मदत मागितली. पण, साहेब म्हणाले की, तू तुझे बघ. अन्य कर्मचार्‍यांची मदतही ते घेऊ देत नाहीत. त्यामुळे माझा नाईलाज आहे.
 
 
त्याचे हे बोलणे ऐकून महेश आत गेला आणि त्या ‘साहेबा’ला त्याने हटकले. साहेब समोर बघायलाही तयार नव्हता. मान वर न करताच साहेब महेशशी बोलत होता. आम्ही महानगरपालिकेला कळविले आहे. कचरा उचलण्याचे काम आमचे नाही. साहेबांचा उद्धटपणा महेशला खटकला होता. महेशने चपराशाला बोलावले, त्याच्या मदतीने कचर्‍याची ती पेटी उचलली आणि योग्य ठिकाणी नेऊन कचर्‍याची विल्हेवाट लावली. महेश त्याला घेऊन पुन्हा कार्यालयात आला. चपराशाला म्हणाला, तू कधीपासून कचरा साफ करण्याचे काम करीत आहेस? आता कंपनीतला सगळाच कचरा बाहेर फेकण्याची वेळ आली आहे. हे ऐकून साहेब आणि चपराशी दोघेही आश्चर्याने महेशकडे पाहात राहिले. महेशने चपराशाच्या मदतीने कचरा पेटी हटविली होतीच, आता साहेबालाही बाहेरचा रस्ता दाखविला होता. महेश कोण आहे हे जेव्हा साहेबाला कळले तेव्हा तो धावतच महेशकडे आला आणि क्षमायाचना करू लागला. यावर महेश त्याला म्हणाला, बाहेरचा कचरा एकवेळ साफ नाही झाला तरी चालेल पण, मनात जर कचरा साठला असेल तर नोकरीतही प्रगती होत नाही आणि व्यवसायही भरभराटीस येत नाही. साहेबाचे डोळे खाडकन उघडले अन क्षमायाचना करून तो पुढील कामाला लागला.
 
 
सुनीलचे सगळे काही ठीक चालले होते. वडिलांनी अपार कष्ट करून संसारवेल वाढविली होती. सगळे काही उत्तम सुरू असतानाच अचानक एक दिवस त्याच्या आईचे निधन झाले आणि घरातली रयाच निघून गेली. घर ओसाड झाल्यासारखे वाटत होते. घरी आता तो आणि त्याचे वडील शंकरराव असे दोघेच होते. पण, सुनीलचे त्याच्या वडिलांशी फार जमत नव्हते. त्याच्या वडिलांनी ऑटोरिक्शा चालवून घर उभे केले होते. अपार कष्ट करून त्यांनी सुनीलला डॉक्टर बनविले होते. सुनीलला त्यांना दवाखानाही थाटून दिला होता. त्याचा दवाखाना चांगला चालत होता. पण, त्याचे वडिलांशी काही जमेना. त्याच्या मनात वेगळे राहण्याविषयी विचार येऊ लागले. एक दिवस त्याने स्वत:साठी नवे घर खरेदी केले. सामान हलविण्याच्या दृष्टीनेही तयारी सुरू केली. पण, त्याआधी एक दिवस तो त्याचा मित्र मंगेशच्या घरी गेला. सुनीलला पाहताच मंगेशचे वडील म्हणाले, अरे तुझे वडील नाही आलेत? यावर सुनीलने सगळी कहाणी त्यांना सांगितली. आता पंधरा दिवसांनी मी माझ्या घरी राहायला जाणार आहे, तेव्हा माझा सगळा त्रास संपुष्टात येईल. हे ऐकून मंगेच्या वडिलांना दु:ख झालं. पण, ते त्यांनी चेहर्‍यावर दिसू दिलं नाही. ते सुनीलला म्हणाले, तू जरूर तुझ्या नव्या घरी जा. पण, त्यापूर्वी किमान आठ दिवस तुझ्या वडिलांसोबत कोणतीही तक्रार न करता राहा, त्यांना अजिबात दुखवू नकोस. मंगेशच्या वडिलांनी यासंदर्भात सुनीलकडून आश्वासन घेतले होते. सुनीलही विचार करीत होता की आता शेवटचेच तर आठ दिवस काढायचे आहेत, मग कशाला वडिलांसोबत कुरबूर करायची? तो मंगेशच्या वडिलांना आश्वासन देऊन घरी परतला. घरी येताच त्याने स्वत:च्या सामानाची आवरासावर सुरू केली. थोड्या वेळाने त्याने वडिलांच्या खोलीत जाऊन बघितले तर ते पेपर वाचत होते. दुसर्‍या दिवशी त्याची वडिलांशी बोलण्याची इच्छा झाली. तो त्यांच्या जवळ बसला असता त्यांच्या शरीरावरील सुरकुत्यांकडे त्याचे लक्ष गेले. त्यांच्याशी बोलता बोलता सुनीलला जाणीव झाली की आपण कित्येक वर्षे झालीत, वडिलांना बाहेर घेऊन गेलोच नाही. आईच्या निधनानंतर वडील कुणा नातेवाईकाकडेही गेलेले नव्हते. त्यांना एकाकीपणा आला होता. आपण वडिलांकडे लक्षच दिले नाही याचे त्याला आता वाईट वाटत होते. आता आपण आपल्या नव्या घरात वडिलांना घेऊन जाऊ असा विचार त्याने पक्का केला अन वडिलांना हे सांगण्यासाठी व त्यांची माफी मागण्यासाठी तो त्यांच्या खोलीत गेला. पाहतो तर काय, वडील पुन्हा कधीही न परतण्यासाठी इहलोकाच्या यात्रेला निघून गेले होते. आता रडण्यापलीकडे आणि पश्चात्तापदग्ध जीवन जगण्यापलीकडे सुनीलच्या हाती काहीही राहिले नव्हते.