लोप होत चाललेली वाचन संस्कृती...

    दिनांक :29-May-2020
|
 
 
akansha_1  H x
 
ग्रंथ साहित्य हे वाचन संस्कृतीचा मूलभूत पाया आहे. पूर्वीच्या काळात प्रत्येकाच्या घरात ग्रंथवाचन होत असे. त्यामुळे आसन धरून बसायची सवय लागत असे, मन एकाग्र होत असे, आध्यात्मिक विचारांचा प्रभाव असायचा. त्यामुळे व्यक्ती स्थिरपण राहात होत्या. जसजसा काळ बदलत गेला तसतशा व्यक्ती विज्ञानाकडे वळत गेल्या, भौतिक सुखाकडे वळू लागल्या. आधुनिक यंत्राने घरात थैमान घातले आणि हातातील पुस्तक कधी सुटले कळलेच नाही. वाचन संस्कृती आपल्यापासून दूर गेली, मोबाईल संस्कृती हातात आली.
 
 
अनादिकालापासून चालत आलेल्या आपल्या भारतीय संस्कृतीत ऋषी वाल्मिकी, महर्षी व्यास आदी गणमान्य ऋषी-मुनींनी ही ज्ञानाची परंपरा या मातीत इतकी खोल खोल रुजविली की, ती चिरकालीन ठरली. ज्ञानाची धारा अखंड निरंतर वाहते आहे. आदी शंकराचार्य वयाच्या बत्तिसाव्या वर्षी समाधिस्थ झाले. पण, आपल्या या छोट्याशा आयुष्यात त्यांनी अगणित अशा रचना केल्या, स्तोत्रे लिहिली, उपनिषदांवर भाष्यं लिहिलीत, गीतेवर भाष्य लिहिले, इतका स्वर्णिम असा भारताचा इतिहास राहिलेला आहे.
नालंदा नष्टचर्य
 
 
बिहार राज्यातील पाटण्यापासून आग्नेय दिशेस गंगा नदीच्या काठावर बडगाव नामक एका खेड्याच्या परिसरात नालंदा नामक शहर विद्यमान होते. लॉर्ड किंनगहॅम यांनी केलेल्या उत्खननात प्राचीन नालंदा शहराचे भग्नावशेष सापडले. जगाच्या पाठीवर कुठेही नसेल असं हे आंतरराष्ट्रीय ज्ञान विद्यापीठ होतं. ग्रंथालयासाठी 1000 खोल्या स्वतंत्र बांधलेल्या होत्या. या व्यतिरिक्त दहा मजली उत्तुंग विस्तीर्ण कक्षात स्वतंत्र असे एक ग्रंथागार होते. कित्येक राजे त्याला अर्थसाह्य देत. दहा हजार विद्यार्थी त्यात राहात. पण, इसवीसन 1202 च्या दरम्यान बख्तियार खिलजीने 55000 सैनिक बरोबर घेऊन नालंदा नष्टचर्य घडवून आणले. त्या वेळी पंधरा दिवसांत हजारो भिक्खूंचा संघ, श्रीलंका, ब्रह्मदेश, काश्मीर, जावा, तिबेट, नेपाळ तथा चीन या भागांत एक लाख ग्रंथ पाठविले. तसेच एक लाख 32 हजार हस्तलिखित ग्रंथ नालंदाबाहेर पाठवले. (संदर्भ- प्राचीन नालंदा नष्टचर्य पुस्तक युगारंभ, पान 124.)
 
 
यावरूनच भारतातील ग्रंथमाहात्म्य सिद्ध होते. आपल्याला माहिती आहे की, राम, कृष्ण हेसुद्धा गुरूकडे अध्यापनासाठी जात. गुरुकुल पद्धती इथे पूर्वापार चालत आलेली आहे. आश्रमात विद्यार्थी वेदाध्ययन करीत असत. ज्ञान संपादन करीत, ग्रंथसंपदा लिहीत. वाचनातून चिंतन  येते आणि चिंतनातून संस्कार येतात. विवेकानंद चरित्र वाचून कितीतरी जण आत्मविश्वासाने ध्येयाने जागे होतात. रामकृष्ण मिशन हे त्याचं बोलकं उदाहरण आहे.
 
 
जनाबाईचेच बघा ना. ज्या काळात स्त्री शिक्षणाचे नावही काढले जात नव्हते अशा साडेसातशे वर्षांपूर्वीच्या काळात ती लिहायला-वाचायला शिकली, अभंगरचना करू लागली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांचे वडील रामजी पुस्तक आणून देत, तेव्हा ते हरखून जात. पुढे पुढे तर बाबासाहेब वाचनात अठरा-अठरा तास बुडून जायचे. ज्ञानाचा प्रचंड सागर त्यांच्याकडे होता म्हणूनच त्यांनी संविधान निर्माण केले. वाचन संस्कृती ही माणसाला प्रगल्भता देते, विचारांची जाण देते, जीवनाची दशा आणि दिशा ठरविते. आईनंतर मुलांना सुसंस्कृत करण्याचं काम पुस्तकं करतात. पण, आता तर मुलांना जे हवं ते सहज नेटवर उपलब्ध असतं. जशी कष्टानं मिळवलेल्या भाकरीची गोडी निराळीच असते, तसेच कष्ट करून संपादन केलेले ज्ञान हे मनात पक्कं घर करून जाते.
 
 
 
लहानपणी शिकलेले शुभंकरोती, मनाचे श्लोक आपण विसरतो का? कधीच नाही ना! जे मनावर बिंबवले जाते ते नष्ट होत नाही. मग वाचनाचे महत्त्वही मुलांवर बिंबवणे आवश्यक नाही का? वाचन संस्कृतीवर होणारी मनोरंजनाची आक्रमणे थोपविणे अवघड आहे. एखादी मालिका सातत्याने पाहा आणि त्यातले सार जर तुम्हाला विचारले, तर दहा मिनिटांच्या वर सांगता येत नाही. पण, पुस्तक वाचलं की शब्दांचा, वाक्यांचा मोह अनावर होतो. आज आपल्याकडे प्रचंड ग्रंथसंपदा आहे, पण वाचक नाही. हे चिंताजनक आहे. वास्तविक पाहता ‘वाचाल तर वाचाल’ हे तितकेच खरे आहे.
 
 
 
आजकालच्या मुलांना साने गुरुजींची श्यामची आई कुठे मिळते? समजा आई-वडिलांनी पुस्तके उपलब्ध करून दिली, तरी मुले ती वाचतात का, हा मोठाच प्रश्न आहे. कारण आजच्या धकाधकीच्या जीवनात, स्पर्धेच्या युगात त्यांच्याकडे वेळच नसतो. ती गुरफटली गेली आहेत, फक्त शिक्षणाच्या चाकोरीत, अभ्यासात, तर कधी आई-वडिलांच्या इच्छापूर्तीसाठी. मग हे क्लास कर, ते क्लास कर, कधी इच्छेने तर कधी इच्छेविरुद्ध. पण, मुलांना जरा वेळ द्यायला हवा पालकांनी, आपल्याला आवडलेले काही संदर्भ त्यांना वाचून सांगितले किंवा वा मुखोद्गत सांगितले तर काय हरकत आहे. त्यानिमित्ताने संवादही होईल. आजच्या पिढीने इतिहास वाचला नाही, तर त्यांचे बाहू देशभक्तीने कसे स्फुरण पावतील?
 
 
 
आज मुले करीअरच्या मागे धावत आहेत, स्पर्धा मानगुटीवर बसली आहे. बेरोजगारी वाढत आहे. मुलांचा निर्धार ठाम असतो, काय बनायचं ते आणि त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा असते, मुलांची आणि सोबत आई-वडिलांचीही. आज आईचं बोट सुटत नाही तोच मुलांच्या नाजूक पाठी दप्तराचं ओझं येतं. शिक्षण झालं की नोकरी, जबाबदार्‍यांत गुंतत जातो आणि वाचन मागे सुटतं. पण, लेखक-कवी यांनी वाचन संस्कृतीचा सुकाणू वल्हवत ठेवला आहे. आज माणसाकडे वेळ कमी, काम जास्त आहे, एकदा माणूस घराबाहेर पडला की एकदम रात्रीच पाय घराला लागतात. दिवसभर कामाने थकलेला, दमलेला जीव, घरी आल्यावर अंग टाकताच त्याचा डोळा लागतो. मग कसलं वाचन?
 
 
 
गृहिणी असेल तर तीही व्यग्र असते आणि जेव्हा वेळ असतो तेव्हा सीरियल्स असतातच. पण, ही नुसती कारणे झालीत. आवड असेल तर सवड निघतेच निघते. ज्ञानाच्या या अथांग सागरातून, आपल्याला वाचनरूपी ओंजळ भरून घेता आली, तर जगण्याला नवे अर्थ प्राप्त होतील. ज्ञानाच्या परीसस्पर्शानं जीवनाचं सोनं होतं. आपल्या संस्कृतीत पहिलेपासूनच ज्ञानाला महत्त्व आहे. कालिदास हे चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या राजसभेमध्ये राजकवी होते. कालिदासांनी रघुवंशम्‌, कुमारसंभव यांसारखी कित्येक नाटके लिहिली. आजही त्यावर अभ्यास केला जातो. राजेशाहीत राजदरबारामध्ये बखरी लिहिल्या जात, स्त्रियांना, राणी, वंशाला शिकवण्यासाठी गुरू असायचे. त्या काळी रामदास स्वामींच्या शिष्य वेणाबाई एका मठाच्या मठाधिपती होत्या. त्या दासबोधावर निरूपण करायच्या, संत ज्ञानोबांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली; तर जाणत्या राजांचा जाणता पुत्र शिवबांचा छावा संभाजी वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारा! याच शंभूराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी ‘बुधभूषण’ हा संस्कृत ग्रंथ लिहिला, ‘नखशिखा’सारखी रचना केली.
 
 
 
अशी कितीतरी आदर्श आपल्या डोळ्यांसमोर आहेत. पण, आपली धरोहर जपण्यात, नव्या पिढीला काडीचाही इंटरेस्ट नाही. वास्तविक पाहता पुस्तकं माणसाचा खरा मित्र आहे. वाचनामुळे आपल्याला प्रेरणा मिळते, उद्दिष्ट मिळते. भव्य-दिव्यतेची ओळख होते. ज्ञान हे अनंत आकाशासारखे आहे, सागरासारखे आहे, जो ही ज्ञानाची कास धरतो त्याचं जीवन उजळून जाते. कारण ज्ञान हे माणसाला अंतर्बाह्य परावर्तित करते. माणूस हा आचारविचाराने उन्नत होत जातो.
 
 
 
पोवाडा वाचला की वीररस नसानसांतून प्रवाहित होतो. सावरकर वाचले की, मन देशभक्तीने उचंबळून येते, छावा वाचला तर मनात संभाजी कळतो. मृत्युंजय वाचले की कर्णासाठी मन सुपाएवढं होतं. पण, या सगळ्यांपासून नवीन पिढी आज वंचित होत चाललीय. हे दुर्दैवच ना! वाचनातून माणूस घडत जातो, वाचनातून चिंतन आणि चिंतनातून  संस्कार येतात आणि भारताजवळ जी ग्रंथसंपदा आहे, जे ज्ञान आहे, ते जगाच्या पाठीवर कुठेच नाही. आपले चार वेद म्हणजे विश्वाचे आधारस्तंभ आहेत. या ज्ञानानेच भारताची प्रतिमा तेजाळत ठेवली आहे. इथे प्रत्येक गोष्टीच्या मागे विज्ञान आहे शास्त्रीय कारणे आहेत, कितीतरी आदर्श मुलांसमोर आहेत. ज्ञानाच्या सागरातून मनचक्षूची तृप्ती झाली तर किती छान होईल. वाचन संस्कृतीचा लोप हे जणू सूर्यास लागलेले ग्रहणच!
 
मीनाक्षी गोरंटीवार
9767963938