एक वेगळे दाम्पत्य

    दिनांक :29-May-2020
|
akansha-1_1  H
भाजपचे चंद्रपूर शाखेचे उपाध्यक्ष आणि वरोरा येथे नगर परिषदेचे सेवक सुभाष भागडे हे आहेत. अर्थात सुभाष वरोर्‍यात बाबा भागडे म्हणूनच प्रसिद्ध आहेत. सुभाष म्हणजे बाबा माझा क्लासमेट होता. वरोर्‍याचा एक कडक नियम होता. तो नियम तेथील काही विशिष्ट लोकांनी बनवला होता. तो म्हणजे मुलगा आणि मुलगी एकमेकांशी बोलले तर त्यांचं नक्कीच काहीतरी प्रेमबीम आहे आणि ही बातमी गावभर पसरवीत. बदनामीच्या धाकाने मुलं-मुली एकमेकांशी बोलत नसत. बाबा मात्र याला अपवाद होता. आम्ही सर्व जण विद्यार्थी परिषदेचे सदस्य होतो. सगळ्याच मुली बाबाशी बोलायच्या. त्याला प्रॉब्लेम सांगायच्या. तो वयाने मोठा असला, तरी आम्ही त्याला सरळ ‘ये, जा’ म्हणत असू. मात्र, त्याचं व्यक्तिमत्त्व असं होतं की, याच्याविषयी कोणी ‘ब्र’सुद्धा काढत नसे. ते विशिष्ट लोक त्याच्याबद्दल काही बोलरण असे की बाबामॅच्युअर्ड वाटायचा. हेल्पिंग नेचरचा होता. बाबाच्या आईला माझ्या वडिलांनी बहीण मानले होते. जसं बाबाचं लग्न करायचं रलं तसं त्याची आई, माझे वडील (दादा) म्हणजे वसंतराव काकडे यांच्यापाशी बोलली. दादा आणि माझी आत्या अर्थात लीला आत्या पाध्ये हे दोघे म्हणजे चालत्या-बोलत्या विवाह संस्था. तिथे रजिस्ट्रेशन करायची गरज राहात नव्हती आणि फी द्यायचीपण आवश्यकता नव्हती. लगेच लग्नाची कार्यवाही सुरू झाली. नागपूरला आम्ही आलो असताना, पेठकर यांची मुलगी संध्या आपल्या आईसोबत आत्याकडे आली आणि आम्हाला सर्वांना ती आवडली.
 
 
वरोर्‍याला माझी दुसरी आत्या रहात होती ताई सरमुकदम. त्यांच्याशी भागडे लोकांचा घरोबा होता. लागलीच तिच्याकडे भागडे लोकांना संध्याला दाखवायचा कार्यक्रम झाला. दादांनी दोन्हीकडे शिष्टाई करून लग्न जमवले. संध्या पेठकर ही बाबाची अर्धांगिनी होऊन शुभांगी सुभाष भागडे म्हणून तिचे वरोर्‍यामध्ये 24 डिसेंबर 1968 ला पदार्पण झाले. 42 वर्षे त्यांच्या लग्नाला झालीत. संध्याला शुभांगी नावाने वरोर्‍यात कोणीच बोलवत नाही, तर संध्या म्हणूनच बोलवतात. अशी ही बाबा-संध्याची जोडी. खरेतर संध्याला नोकरी करणारा मुलगा हवा होता. बाबा कोर्टात पिटीशन रायटर होता. ती तसे आईला बोलली. पण, आईने तिची समजूत घातली आणि हे लग्न ठरले. बाबाला मी विचारले, संध्याला पसंत करताना तू कोणत्या गोष्टींचा विचार केला? तो म्हणाला, तिची आई समजूतदार वाटली. मुलीवर उत्तम संस्कार असणार. शिवाय अॅड. शंकरराव पाध्यांकडून हे स्थळ आले होते. त्यांच्या पाहण्यातली ती होती. त्यामुळे जास्त विचार करण्याची तशी गरज नव्हती. मी म्हटलं ओके
 
 
 
आणि मग संसाराला सुरुवात झाली आणि जोडी तुझी माझीचा कस लागला. संध्या ही सुटसुटीत परिवारातील आणि मोकळ्या वातावरणात राहत असलेली मुलगी होती. ती नागपूरला बालवाडीत नोकरी करायची. घरी अत्यंत मोकळे वातावरण होते. मात्र, इथे सगळेच विरुद्ध होते. संध्या सांगते, माझे सासर हे जुन्या विचारसरणीचे होते. लग्नाच्या आधी मी नोकरी करत असे. सासरीही नोकरी करावी वाटू लागले. परंतु, सासर्‍यांना तर मी घराबाहेर पडलेलीसुद्धा चालत नसे. सासूबाई स्ट्रिक्ट होत्या. मला काम करायची अजिबात सवय नव्हती. येथे संयुक्त कुटुंब होते. चार दीर, दोन नणंदा, सासू-सासरे, मी आणि माझे मिस्टर एवढे कुटुंबामध्ये सदस्य होते आणि मला घरकाम येत नव्हते. पोळ्या, स्वयंपाक काहीच जमत नसे. सासूबाईंची चिडचिड होत असे. या सर्व कारणांमुळे मतभेद व्हायचे. भांड्याला भांडे लागायचे. मात्र मला हे समजावून सांगत. त्यांच्या संसारात दोन वर्षे असे चालले आणि तो दिवस उगवला. संध्या म्हणते, परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे मी आणि हे घराबाहेर पडलो. आता रात्री कुठे जाणार? मी प्रेग्नेंट होते. मात्र, यांचे जिवाभावाचे मित्र बरेच होते. चंदू वैद्य यांच्याकडे आम्ही रात्री गेलो. त्यांच्या आईने कै. राधाकाकूंनी आम्हाला प्रेमाने ठेवून घेतले आणि तेथे आम्ही काही महिने राहिलो. अत्यंत आपुलकीने त्यांनी आमचे केले. त्यानंतर मी बाळंतपणासाठी नागपूरला आले. घरी गेल्यावर आईने मला खूप छान समजावले. ती म्हणाली, घाई करू नको. जसे दिवस जातील तसे सगळे छान होईल. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. त्यानंतर काही महिन्यांनी मला एक मुलगा (सागर) झाला. मला आणि ह्यांना खूप आनंद झाला. त्या बाळाला घेऊन मी काही महिन्यांनी वरोर्‍याला आली. बाबा म्हणाला, आम्ही किरायचं घर घेतलं. सर्व सामान जमवलं. शेजारच्या लोकांनी खूप प्रेम दिले. खूप मदत केली आणि आमचा संसार सुरू झाला. संध्या सांगते, या सगळ्यात माझी आणि ह्यांची मानसिक स्थिती फारच तणावाची होती. मात्र, आम्ही एकमेकांना मानसिक आधार दिला आणि त्यामुळेच आमचा संसार अक्षरशः फुलत गेला आणि आम्ही आनंदाने राहू शकलो.
 
 
 
मी सुरुवातीलाच सांगितले, बाबा विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता होता. तो संघाचा स्वयंसेवकही होता. त्याचप्रमाणे कॉलेजमध्येही तो निवडणुकी लढवायचा. समाजकार्य तो आवडीने करायचाच आणि याचाच परिणाम म्हणून आणिबाणीमध्ये तो आंदोलनात सहभागी झाला आणि चंद्रपूर जिल्ह्यात (मिसा बंदी नव्हता) सत्याग्रही म्हणून बंदिस्त होता. यानंतर जनता पक्षात बाबाचे पदार्पण झाले. पक्षाचे काम करण्याची जबाबदारी त्याच्यावर पडली. एकनिष्ठेने, इमानदारीने त्याने पक्षाला वाहून घेतले. पक्षाने जिल्हा सचिव, जिल्हा उपाध्यक्ष अशा जबाबदार्‍या त्याला दिल्या. आता तो भाजपाचा चंद्रपूर जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे. असे त्याचे व्यक्तिमत्त्व विकसित होत गेले. माझा क्लासमेट एवढ्या उच्च पदावर आहे याचा मला खरोखरच अभिमान वाटतो. बाबाच्या जीवनातली मजेदार घटना मला आठवली. नागपूरला आम्ही सर्व मैत्रिणी बाबाच्या लग्नाला गेलो होतो. आम्ही मैत्रिणी, सर्व वर्‍हाडी तयार झाले. बँड जोरजोराने वाजत होता. नवरदेवाला आणायला सांगत होते. आम्ही बाबाला बघायला गेलो. तर हा बसला होता सूट घालून. इकडे नवरदेव कुठे आहे? त्याला घेऊन या... म्हणून पुकारा सुरू झाला. आम्ही मैत्रिणी भराभर कामास लागलो. त्याला टोपी आणून दिली. मुंडावळ्या बांधल्या. त्याला उपरणे दिले. बूट घालायला लावले आणि नवरदेव तयार झाले. मारुतीच्या देवळात वर्धावा निघाला. माझ्या या आठवणीने सगळ्यांनाच हसायला आले. मी म्हटलं, मला पण माझ्या लग्नातली गोष्ट आठवते. 1981 साली माझं लग्न नागपुरला झालं. मला भाऊ नसल्यामुळे मॅन पॉवरचा थोडा प्रश्नच होता. मात्र तू आणि सुनील फरसुले विद्यार्थी परिषदेची गँगच घेऊन आले आणि भरभर कामं झालीत. सन्माननीय नितीनजी गडकरी त्या वेळी विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते होते. तेसुद्धा तुम्हाला जॉईन झाले आणि माझ्या लग्नात मदत केली. हे मला खूपच कौतुकास्पद वाटतं. मी बाबाला म्हटलं, तुझ्या जीवनातली एखादी आनंददायी गोष्ट सांग? 1994 साली मी अत्यंत आजारी होतो. त्याच वेळी संध्याची भद्रावती येथे बालवाडी शिक्षिका कोर्सकरिता निवड झाली. ती माझं आणि मुलांचं करून सकाळी आठला जायची आणि दुपारी तीनपर्यंत वापस यायची. सगळंच तिला करावं लागायचं. तिचा निकाल आला त्या वेळी ती मेरिटमध्ये आली. हा माझ्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे. तसेच गतवर्षी तिने वरोर्‍याच्या आठ महिलांसोबत एकनाथ महाराजांच्या पालखीसोबत जालना ते पंढरपूर अशी पायी वारी केली. हे तिचे कौतुकच वाटते. या वर्षी तर कोरोनामुळे अशक्य आहे.
 
 
बाबाच्या जीवनातली अत्यंत क्लेशकारक घटना म्हणजे तो म्हणाला, मला तीन बहिणी आहेत- कुसुम (कुंदा), किरण, वर्षा. आमच्या लग्नानंतर मोठी बहीण कुसुम मरण पावली. आजही ती घटना खूप दुःखदायक वाटते. संध्याने बराच मनस्ताप सोसला होता. मी तिला म्हटलं, जीवनातली आनंदाची घटना कोणती? तिने सांगितले, आम्ही भाड्याच्या घरात राहात असताना, यांनी मला एके दिवशी आनंदाची बातमी दिली. स्वतःच्या घरासाठी जागा घेतली. मला फारच आनंद झाला आणि त्याच वेळी दुसर्‍या दिवशी मला दुसरा मुलगा (आकाश) झाला. मी हा क्षण विसरू शकत नाही. बाबा म्हणाला, माझ्याजवळ अवघे 0000000000000 रुपये होते आणि मी घर बांधायला घेतलं. स्वामी समर्थांच्या कृपेने भराभर पैसे मिळत गेले आणि घर पूर्ण झालं! त्यावर संध्या सांगू लागली, आमच्या घरात आम्हाला खूप आनंद मिळाला. मी लोक शिक्षण संस्थेच्या वरोरा येथील बालवाडीत नोकरी करू लागली. आता सून आली. चार वर्षांचा नातू आहे. अजून काय हवं? फक्त यांनी वकील व्हावं असं वाटत होतं पण ते मात्र झाले नाही. लॉच्या दोन परीक्षा पास झाले, पण नंतर राहिले. खरेच तिची ही अपेक्षा पूर्ण करू शकलो ही, मात्र हिने समंजसपणे संसार केला. अजूनही कोर्टात पिटीशन रायटरचे काम चालू आहे. मी आनंदी आहे. मी आजच्या युवकांनाही हेच सांगेल की, समाजाप्रती भान ठेवा. समाजकार्य करा. पत्नीला समजून घ्या. नेहमी तिच्या पाठीशी उभे राहा. संसार मोडू नका, तर फुलवा! संध्या, तू काय सांगशील? तर ती म्हणाली, खरे सांगू का, आम्ही वेगळ्या घरात राहात असलो तरी एकत्रित राहण्यास जे सुख आहे, जो आनंद आहे तो वेगळ्या घरात नाही. त्यामुळे आताही आम्ही आमच्या मुख्य घरी सणावाराला एकत्र जमतो. मजा करतो. ते घरच आमचं आनंदाचं निधान आहे. भावांमध्ये आणि जावांमध्ये खूप प्रेम आहे. मुलींना हेच म्हणेल, नुसता नवरा नवरा करून चालत नाही, सगळ्यांशी प्रेमाने राहा. तेच खरे जीवन! दोघांचा संदेश ऐकून मी सुखावले.
 
वर्षा विजय देशपांडे