निसटून गेलेली स्वप्नं...

    दिनांक :29-May-2020
|
प्रॉक्सी थॉट
 पल्लवी खताळ-जठार 
 
 
आयुष्य काय आहे... ते किती सुंदर आहे... आयुष्य कधी जगण्यातील निरागसता आहे, तर कधी आनंद... वेगवेगळ्या माणसांची वेगवेगळी व्याख्या आहे आयुष्याची. जन्माला येतो माणूस काहीतरी नवीन करण्यासाठी. लहानपणी तो स्वप्न बघतो काहीतरी करण्याचे. त्यासाठी तो सदैव धडपड करीत असतो.
 
माणसाचे एक स्वप्न पूर्ण झाले की, दुसरे स्वप्न त्याला खुणावत असते. अरे, आपण असे करायला पाहिजे होते, तसे करायला पाहिजे होते, असे बरेच काही प्रश्न येतात मनामध्ये. माणसाचं आयुष्य जातं प्रश्न सोडवता सोडवता. न संपणार्‍या इच्छा, डोळ्याला खुणावणारे स्वप्न. मग अशात आपण काही विसरून तर नाही चाललो ना? हा प्रश्न मात्र या इच्छांच्या मागे धावताना या धुंदीत स्वत:ला विचारायचा माणूस विसरून जातो. तो जगतो आहे, खातो-पितो आहे, त्याचे सर्व स्वप्न पण पूर्ण करण्याचा ध्यास मनी बाळगून पुढे जातो आहे. हे सर्व करीत असताना आपल्याला वाटतं सर्व आपल्या सोबत आहेत; पण कधीतरी मागे वळून पाहिले तर कळते, काही तरी सुटते आहे. मग ते काय तर जगता-जगता आपण उद्याचा दिवस चांगला येईल, या उद्देशाने आजचे कित्येक दिवस जे पार जाऊन ज्याचा भूतकाळ झाला, असे निघून गेलेले असतात, जे पुन्हा कधीच परतून येत नाहीत. मग या दिवसांनी जणू आपली चेष्टा केली असं वाटतं. 

proxy thought_1 &nbs 
 
माणसाला हवे ते मिळवणे वाईट नाही. स्वप्न पूर्ण करणे वाईट नाही, पण आपल्या दिशेने जाताना आपली अनमोल नाती-गोती तर निसटून जात नाहीत ना, हा विचार पण व्हायला हवा. आयुष्याचं काय, आज आहे आणि उद्या नाही. अलीकडे तर फारच वाईट परिस्थिती झाली आहे आयुष्याची.. कोण कुठे, केव्हा जाईल, ही कोणाच्याच हातात नसलेली गोष्ट. त्याला कारणेही तशीच आहेत. माणसाची सदैव धडपड असते पटकन जाण्याची. वेळ वाचवता वाचवता कित्येकांच्या घोडचुकांमुळे कित्येक प्राण जात आहेत. रोजचेच. मग शेवटी प्रश्न तोच, मला न कळलेलं आयुष्य. खरंच मला काही नियम नाही कळत. माणसाची कशाला ही धडपड कोठे जाण्याची. जा तुम्ही, अवश्य जा, पण तुमच्यामुळे कोणाच्या आयुष्याचा प्रवास थांबता कामा नये. तुम्ही बघा स्वप्न, पण ते पूर्ण करताना आपल्या आई-वडिलांना विसरू नका.
 
कोणासाठी आयुष्य सुंदर असतं, सुखी-समृद्ध असतं, तर कोणासाठी हेच आयुष्य भाकरीचा तुकडा शोधण्यात निघून जातं. मग ज्यांच्याकडे आहे, त्यांनी माणसाला माणूस म्हणून आधी मदत करावी. कारण, आयुष्यात माणुसकीच मोठी आहे, पैसा नाही. पण आज जीवनात पैसा मोठा झाला आहे. माणूस मात्र शून्यवत वाटतो पैशापुढे. तुम्ही कितीही पैसा कमवा, धनदौलत कमवा, पण याचा उपयोग गरीब लोकांसाठी झाला नाही, तर काय फायदा? कित्येक लोकांना पैशाचा अहंकार असतो. अलीकडे तर माणसाचे राहणीमान, कपडेलत्ते या सर्व बाबींवर माणसाची प्रतिष्ठा तोलली जाते. माणूस जन्माला येतो तर काय घेऊन येतो, त्याला काहीच माहीत नसते. पैसा काय आहे आणि माणूसपण काय आहे, ते जर का त्याला लहानपणापासूनच समजावून सांगितले, नीतिमूल्ये शिकवली, तर त्याला माणूसपण मोठे वाटू लागेल, पैसा नाही. एका व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीच्या अडचणीत धावून गेले पाहिजे. आज असे लोक आहेत की, ज्यांच्यामुळे माणुसकी जिवंत आहे, परंतु ते बोटावर मोजण्याइतपत. रस्त्याच्या कडेला कुठे अपघात झाला असेल, तर जखमीला दवाखान्यात घेऊन जाणारे हात फारच कमी उठताना दिसतील. कोणी आंधळी व्यक्ती रस्ता ओलांडत असेल, तर रस्ता दाखवणारे फारच कमी लोक असतात. अशी मानवतेला लाजवणारी अनेक उदाहरणे सापडतील, पण आपण माणुसकी जपण्याचाच वसा घ्यायला हवा. कोण काय म्हणतो, याचा विचार न करता आपल्या मनाला योग्य वाटतील अशा चांगल्या गोष्टी करा.
 
ज्यामुळे तुमच्या चांगल्या कर्तृत्वाची ओळख निर्माण होईल आणि प्रत्येकाला तुमच्यासारखे व्हावेसे वाटेल. कुणाला आयुष्य स्पर्धा वाटते, तर कोणाला खेळ. अनेक माणसे अनेक भूमिका... परंतु, या आयुष्याच्या ओंजळीत चांगल्या कर्तृत्वाची फुले गोळा करीत राहा. माणूस म्हणून जगा आणि इतरांनाही जगण्यास प्रेरणा द्या.