‘हाता’ची ‘घडी’ आणि तोंडावर बोट...

    दिनांक :30-May-2020
|
मुंबई वार्तापत्र

नागेश दाचेवार

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या साथीच्या रोगाच्या काळात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे, असे म्हणणार्‍या भाजपाच्या महाराष्ट्रातील कुणी नेत्यानी नीट आकडेवारीसह स्पष्टीकरण दिले, तरी लोकांच्या मनातील शंका दूर होतील, अशापद्धतीचे आव्हान दिले जात होते. आणि जेव्हा फडणवीसांनी आकडेवारी सादर केली, तर सत्ताधार्‍यांची पुरती दाणादाण उडाली. संयम आणि संवेदनशीलतेचा प्रत्यय वेदेऊनही सत्ताधार्‍यांकडून केवळ राजकारण केले जात होते. सरकारला सहकार्य करूनही विरोधी पक्षाला आरोपीच्याच पिंजऱ्यात ठेवण्याचे काम करत, विरोधी पक्षनेते फडणवीसच राजकारण करीत असल्याचा डांगोरा पिटवला जात होता. त्यामुळे सरकारच्या नाकर्तेपणाला कंटाळून शेवटी फडणवीसांनी सौम्य हल्ला चढवला... त्यांनी एकाच हल्ल्यात राज्य सरकारला पूर्णतः उघडं पाडलं, नव्हे, तर धराशायी केलं. सरकारला खडबडून जागं केलं. किंबहुना सरकारला जाग व्हावं लागलं. अर्थात, विरोधी पक्षनेता म्हणून एकाच प्रयत्नात फडणवीसांची कामगिरी यशस्वी ठरली. फडणवीसांची ही कामगिरी म्हणजे, ‘एही मारा लेकिन, सॉलिड मारा...!’ अशीच म्हणावी लागेल...
 


mumbai wartapatra 30 may_
 
 
हलक्या धक्क्यातील संकेत पुरेसे सूचक ठरले. केंद्र सरकारकडून मदत मिळाली नसती, तर देवेंद्र फडणवीस हे त्या मदतीचा तपशीलच देऊ शकले नसते. एखादी गोष्ट जेव्हा प्रत्यक्षात मिळालेली असते, तेव्हाच आपण त्याविषयी बोलण्याच्या स्थितीत असतो. किंबहुना आजच्या माध्यमांपेक्षा प्रभावी असलेल्या सोशल माध्यमाच्या युगात असे धाडस कुणी सुज्ञ व्यक्ती करूच शकत नाही. मात्र, सत्तेसाठी डोळ्यांवर पट्टी बांधून आलेल्यांना काही दिसणे शक्यच नसते. सत्य तर अजिबातच नाही. त्यांची अवस्था धृतराष्ट्रासारखीच असते. त्यामुळेच फडणवीसांच्या सत्याच्या बाणांनी ही मंडळी तशीच घायाळ झाली, जशी हस्तिनापुरातील दिग्गज मंडळी, महामंत्री विदूर यांच्या सत्यवचनांमुळे घायाळ व्हायची.
 
फडणवीसांचे एक सत्य बरेच काही सांगून गेले आणि कोरोनाविरोधी लढ्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अपयशाचे पोलखोलही झाले. गोष्ट झोंबणारीच होती. त्रिकोणातील तिन्ही कोण एकमेकांच्या विरुद्ध दिशेने असतात, तसेच या महाविकास आघाडीतील तीन पक्षांचे आहे. एक काय करतो, हे दुसर्‍याला माहीत नसते आणि दुसर्‍याच्या मनात काय आहे, याची माहिती तिसर्‍याला नसते. कॉंगे्रसचे खासदार राहुल गांधी अलीकडेच याबाबत सत्य सांगून गेले असल्याने, यावर आणखी काही बोलण्याची गरज भासत नाही.
 
 
एवढे मात्र खरे की, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सौम्य धक्क्यांनी आघाडीत भूकंपाचे मोठे हादरे बसले. जणू धरती दुभंगली आणि आभाळ फाटले, वादळ आणि तुफानामुळे समुद्रात प्रचंड खळखळाटाचा उत्पात झाल्याने, जहाजच धोक्यात आले, हे ओळखून फडणवीसांचा वार परतवून लावण्यासाठी दिवसभर बैठका आणि चर्चा करून, होमवर्क करून, तिघांना यावे लागले. एकट्या फडणवीसांचा सामना करण्यासाठी तीन पक्षांत एक ताकदीचा माणूस मिळाला नाही. फडणवीसांचा हल्ला एवढाच जिव्हारी लागला होता, तर विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपाला किंवा हल्ल्याला परतवून लावण्यासाठी प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांनी यायला पाहिजे होते. नाहीच मुख्यमंत्र्यांची क्षमता, तर किमान उपमुख्यमंत्र्यांनी यायला काय हरकत होती? तसाही फडणवीसांचा हल्ला हा पूर्णपणे आकडेवारीचाच होता. मग आकडेमोड करायला अर्थमंत्र्यांनी यायला पाहिजे होते. मात्र, एरवी अधिकारात नसताना, मंत्रिमंडळाची बैठक घ्यायला सरसावणारे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आकडेमोड सादर करण्याऐवजी बोटं मोडण्यासाठी तिघांना पाठवून घरी ‘हाता’ची ‘घडी’ आणि तोंडावार बोट ठेवून बसले...
 
 
बरं, निवडून तीन मंत्री पाठवलेत खरे, पण तेदेखील कोणते तर परिवहन, महसूल आणि जलसंपदा. या खात्यांचा फडणवीसांनी केलेल्या दाव्यांचा अर्थाअर्थी संबंध नाही. येथे तोंडावर पडलेच, तर पुन्हा नवा दावा केला जाऊ शकतो, तो म्हणजे प्रदेशाध्यक्षांना पाठविल्याचा. प्रत्यक्षात ही पत्रपरिषद पक्षाची नव्हती ती सरकारची होती. आणि अनिल परब हे प्रदेशाध्यक्ष नाहीत... या दोन्ही वस्तुस्थितीनुसार प्रदेशाध्यक्षांना पाठविल्याचा जर दावा कुणी करत असेल, तर तो येथे तसाच निरर्थक ठरतो. शिवाय अत्यंत अभ्यासू आणि हुशार लोक पाठविल्याचा यांचा समज असेल, तर भर पत्रकार परिषदेत या तिघांनी तो समज खोडून काढत, तो खर्‍याअर्थाने गैरसमज होता हे कृतीने दाखवून दिले आणि ते अवघ्या महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी बघितले. या आघाडीच्या तीन नेत्यांनी एकदम एकत्र येऊन, घेतलेल्या तासाभराच्या पत्रकार परिषदेत कोरोनाच्या संकटकाळात, सरकार काय उपाययोजना करीत आहे आणि पुढे काय करणार आहे, याबाबतची माहिती दिल्याचे आठवत नाही. मात्र, फडणवीसांचे सत्य कसे असत्य आहे, हे पटवून देण्याचे त्यांच्या आलाकमांडनी दिलेले काम कसेबसे पूर्ण करायचे आहे, अशा मानसिकतेतून ते करून, आपला जीव वाचवून काढता पाय घ्यायच्या प्रयत्नात तेवढे ते दिसले.
 
 
फडणवीसांचा सामना करण्याची क्षमता कुण्या एकट्या येर्‍यागबाळ्याचे काम नाही, त्यासाठी आता संयुक्तपणेच लढा द्यावा लागणार आहे, हे त्यांनी नेमके ओळखले. फडणवीस खोटे बोलत आहेत, केंद्राकडून राज्याला काहीच मिळाले नाही, अशी ओरड करण्याच्या नादात आघाडीचे हे नेते मात्र, 6500 कोटी रुपयांची मदत मिळाल्याचे नकळत मान्यही करून गेले. फडणवीसांचा केवळ एक सौम्य बाण जर यांना इतका घायाळ करून गेला आणि असे हे सैरभैर झालेत, तर लक्षात घ्या, प्रभावी विरोधी पक्षनेत्याची भूमिका पार पाडताना त्यांनी जर एखादा मोठा प्रहार केला, तर यांचे काय होईल? सांगणे एकच, फडणवीसांना सत्तेचे डोहाळे लागले, असे आरोप करून, त्यांना डिवचण्यापेक्षा सत्तेत आपण काय करीत आहोत, याचा विचार करा. राज्यातील जनतेने ही सत्ता फडणवीसांनाच दिली होती, पण बाबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे, मी तसा शब्दच दिला आहे, असे सांगून विश्वासघात करणार्‍यांमुळे फडणवीसांना प्रमुख विरोधी पक्षनेत्याची भूमिका पार पाडावी लागत आहे. त्यांना त्यांचे काम करू द्या आणि तुम्ही संकटाचा धोका ओळखून सत्ताधार्‍यांनी जे करायला हवे, तेच करा. उगाच खोट्या आणि दिशाभूल करणार्‍या राजकारणात जाऊ नका.
 
 
मात्र, या संकटसमयी माझे ते तुझे असे करत कोणतेही राजकारण करायचे नाही, असा विरोधी पक्षाने ठाम निश्चय केला होता. सातत्याने सप्लाय लाईन नीट करा, रुग्णालयांमध्ये डॅशबोर्ड लावा, यासारख्या विविध उपयुक्त, व्यवहार्य अशा सूचना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला केल्या. मात्र, त्याकडे कानाडोळा करत उलट त्यांची कुचेष्टा केली. त्यामुळे सत्ताधार्‍यांनी विरोधी पक्षाला आव्हान देऊन, त्यांचा सामना करण्यापेक्षा, जर जबाबदार सत्तापक्ष म्हणून कामगिरी बजावली असती आणि योग्य सूचनांचा सन्मान, स्वीकार करून अंमलबजावणी केली असती, तर आज महाराष्ट्रावर ही गंभीर परिस्थिती ओढावली नसती आणि सरकारवर टीका करण्याची वेळदेखील विरोधी पक्षनेत्यांवर आली नसती. रोज नवे मुद्दे चर्चेत आणून आपले अपयश लपविण्यासाठी, लक्ष विचलित करण्यासाठी आघाडी सरकारने चालविलेले हे कव्हर फायर आता बंद करावे. अन्यथा आता दिलेला सौम्य डोस जर वाढवला, तर उघडंनागडं पडण्याची वेळ येईल, एवढं मात्र निश्चित...!
 
9270333886