हिंदूंचे प्रेरणास्थान - शिवराज्याभिषेक दिन

    दिनांक :31-May-2020
|
 

raja shivchahtrapati_1&nb 
 
 
रायगड हजारोंच्या गर्दीने गजबजून गेलेला होता. विद्वान, महापंडित, राजे-रजवाडे यांचे स्वागतसोहळे झडत होते. गडावर विलक्षण लगबग होती. पूर्वेला सूर्योदय होण्याच्या मार्गावर होता. राजसभा अद्भुत तेजाने तळपत होती. सर्वांच्या नजरा ठीक समोरच्या बाजूला खिळल्या होत्या. अष्टप्रधान आपापल्या जागी उभे होते. गागाभट्टांनी सिंहासनावर छत्र धरले व उच्च, धीरगंभीर स्वरात राजबिरुदावली उद्घोषित झाली- ‘‘महाराज प्रौढप्रतापपुरंधर क्षत्रियकुलवतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती की जय, राजा शिवछत्रपती की जय, राजा शिवछत्रपती की जय.’’ सारी राजसभा जयजयकाराने दणाणून गेली. हजारो बुलंद कंठांतून झालेला केवढा प्रचंड जयघोष असेल तो. कर्णे, नौबती, ढोल, ताशे, नगारे धडधडू लागले. स्वराज्यातल्या सर्व गडांवरून एकाच वेळी तोफांचा गगनभेदी दणदणाट सुरू झाला. रायगडाचे बाहू फुरफुरले, स्वराज्याचे रोमांच उभे राहिले अन्‌ तिकडे सुलतान, फिरंगी टोपीकर अशा शत्रूंच्या राजधान्या हादरल्या. या दणदणाटाने त्यांच्या कानठळ्या बसल्या, मती गुंग झाली, नजर सैरभैर झाली, दाही दिशा बधिर झाल्या, पायाखालची भूमी दुभंगली. विलक्षण दिवस, अद्भुत क्षण, हिंदुस्थानच्या इतिहासातील देदीप्यमान पर्व. एतद्देशीयांना अभिमान वाटावा व शत्रूला धडकी भरावी असा हा सोहळा म्हणजे शिवराज्याभिषेक दिन!
  
 
पण, अर्थात भारतवर्षाच्या नशिबात हा दिवस इतक्या सहजासहजी आला नव्हता. इ. स. 711 च्या मोहम्मद बिन कासिमच्या घुसखोरीपासून सुरू झालेली इस्लामी आक्रमकांची परंपरा लगातार बळावत असताना हिंदुस्थानच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या. एक एक सामर्थ्यशाली साम्राज्य कोसळत गेले. सिंध, पंजाब, काश्मीर, राजपूताना, माळवा, विजयनगर, वारंगळ, दौलताबाद अशा सिंहासनांच्या ठिकर्‍या ठिकर्‍या उडाल्या. सुलतानी आक्रमणाची रीतच निराळी होती. प्रस्थापित पायदळाच्या उलट त्यांचा सारा जोर जलद घोडदळावर होता. आपले राजे पारंपरिक शस्त्रांवर निर्भर होते, तर सुलतान तत्कालीन आधुनिक शस्त्रांचा वापर करत होते. आपण अजूनही प्रत्येक युद्ध धर्माने करत होतो, तर ते धर्मयुद्ध (जिहाद) करण्यास तयार होते. इथे शत्रूची तलवार पडली तर उचलून देणे, नि:शस्त्र व्यक्तीवर आघात न करणे, पाठीमागून वार न करणे ही नीतिमत्ता व मूल्ये जोपासली जात असताना, सुलतान मात्र उघड उघड अनितीने युद्ध करीत होते. दिलेले वचन मोडणे, नि:शस्त्रावर आघात करणे, विश्वासघात, पाठीवर वार, हेच सुलतानांच्या अंगवळणी पडलेले होते. पण, आम्ही मात्र शतकानुशतके यातून काहीही शिकत नव्हतो. वास्तविक, शत्रूशी कसे वागले पाहिजे, त्याला खोटी वचने कशी द्यावी, त्याला कसे बुडवावे, इत्यादी अनेक विषयांवर आपल्या शास्त्रांमध्ये सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे सांगण्यात आलेली आहेत. पण, त्याचेही वाचन दुरापास्त व्हावे किंवा ते दुर्बोध वाटावे इतके आपले अध:पतन झाले होते.
 
 
‘सेक्युलर’ शब्दाचा अर्थही न जाणणारे आजचे तथाकथित स्वयंघोषित विद्वान, इस्लामी आक्रमणे केवळ आर्थिक हेतूने झाली होती, असा केविलवाणा उद्घोष करताना दिसतात. पण, चौथा वर्ग उत्तीर्ण झालेल्या सामान्य वाचकाने इतिहास उघडून पाहिला, तर त्यालाही ते धडधडीत सत्य दिसायला वेळ लागणार नाही. इस्लामी आक्रमण केवळ आर्थिक नसून भौगोलिक, राजनैतिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक अशा राष्ट्राच्या सर्व अंगांना निर्णायक रीत्या प्रभावित करणारे होते. सतराव्या शतकात आसेतुहिमाचल संपूर्ण हिंदुस्थान परकीय शक्तींच्या अधीन होता. मोगलांचे जबरदस्त साम्राज्य पश्चिमेला पेशावर ते पूर्वेला कलकत्त्यापर्यंत व औरंगाबादपासून कश्मीरपर्यंत दक्षिणोत्तर अव्याहतपणे सुरू होते. दक्षिणेत बहामनी साम्राज्याची शकले होऊन पाच सुलतानशाह्या निर्माण झाल्या होत्या व त्यातही आता दोन बलशाली साम्राज्ये उरली होती. ती म्हणजे गोवळकोंड्याची कुतुबशाही व विजापूरची आदिलशाही. युरोपियन इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच हेसुद्धा होतेच. सतराव्या शतकापावेतो सारी हिंदुभूमी यवनाक्रांत झाली होती. महंमद घोरीने सोमनाथावर हल्ला केला असताना तेथील पुजारी म्हणाले की, सोन्याच्या राशी देतो, पण मूर्ती फोडू नका. यावर घोरीने उत्तर दिले की, लोकांनी मला बुतफरोश (मूर्तीचा व्यापारी) म्हणण्यापेक्षा बुतशिकन (मूर्ती विध्वंसक) म्हटलेले आवडेल. वर्षानुवर्षे संयमाने निर्माण केलेली हजारो मंदिरे फोडून टाकण्यात आली. काशी विश्वेश्वर फुटला. जबरदस्तीच्या धर्मांतरणाने कळस गाठला.
 
 
जवळपास सर्वच सुलतान क्रूर व लहरी होते. बल्बनने तर दिल्लीमध्ये एक लाख लोक ठार मारून टाकलेले होते. अल्लाउद्दीन खिलजीची दहशत तर महाराष्ट्र कधी उभ्या आयुष्यात विसरू शकणार नाही इतकी भयानक होती. मोहम्मद तुगलकने लहर आली म्हणून अख्खी राजधानी दिल्लीवरून दौलताबादला स्थानांतरित केली होती. मोरोक्कोहून आलेला इब्नबतूता याने याचे उल्लेख केलेले आहेत. या सर्वांनंतर हिंदूंचा कर्दनकाळ तैमूरलंग भारतावर येऊन थडकला. 1398 मध्ये त्याने हिंदुस्थानावर स्वारी केली. त्याचे आत्मचरित्र उपलब्ध आहे मुलफुतात-ए-तीमुरी. यात तो म्हणतो की, या काफर हिंदूंची देवळे पाडावी, संपत्ती लुटावी व यांची प्रचंड कत्तल करून गाझीपद प्राप्त करावे, अशी इच्छा आहे. याने दिल्ली पाच दिवस सतत रक्ताने धुऊन काढली. यानंतर बाबरापासून मोगलांचे रक्तरंजित शासन सुरू झाले. भारताचे उरलेसुरले चैतन्य नष्ट झाले.
 
 
इस्लामनुसार गादीवर बसणार्‍या कुठल्याही सुलतानाचे एकच कर्तव्य असते व ते म्हणजे दार-उल-हर्ब (काफरांचा देश)चे दार-उल-इस्लाम (इस्लामचा देश)मध्ये रूपांतर करणे आणि त्यासाठी काफरांचे समूळ उच्चाटन करणे. कुठल्याही आक्रमणामध्ये पहिली धाड पडत असे ती स्त्रियांवर. गावातील सर्व स्त्रियांना बळजबरीने उचलून नेले जात असे. त्यातील नितांत सुंदर स्त्रिया स्वतः बादशहासाठी, त्यानंतर त्याच्या मंत्र्यांसाठी, त्यानंतर साधारण सरदारांसाठी व उरलेल्या स्त्रिया सैनिकांमध्ये वाटून टाकण्यात येत असत. या महिलांचे उर्वरित संपूर्ण आयुष्य हे शब्दांत सांगू शकणार नाही इतके भयानक असे.
 
 
लोकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. मुळातच नापिकी, त्यात अठराविशे दारिद्र्य, त्यातच होणारे सुलतानांचे अत्याचार, याने प्रजा पिळवटून निघत असे. दुष्काळामुळे पीक निघाले नाही तरी सुलतान आपला सारा सोडत नसत. त्यासाठी बळजबरीने लोकांची घरे लुटून नेली जात. जिझियासारख्या प्रचंड करांनी शेतकर्‍यांचे व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले होते. 70 ते 80 टक्के उत्पन्न कराच्या स्वरूपात सरकारमध्ये जमा करावे लागत असे. विकृत धर्मांधतेला ऊत आलेला होता. दार-उल-इस्लाममध्ये रूपांतर करण्यासाठी म्हणून लोकांचे प्रचंड प्रमाणामध्ये बळजबरीने धर्मांतरण केले जात असे. इस्लामचा स्वीकार जो करणार नाही त्याला लगेच तलवारीला सामोरे जावे लागत असे. यावनी भाषेचा एवढा मोठा पगडा सामान्य जनमानसावर पडला होता की, मातृभाषेचा पुरता र्‍हास झाला होता. लोकांनी आपल्या मुलांची नावेसुद्धा सुभानराव, रुस्तुमराव, सुलतानराव, फर्जंद अशी ठेवायला सुरुवात केली होती. चारी बाजूंनी सार्वजनिक जीवन करपून गेले होते. सामान्य माणूस दोन वेळेच्या जेवणासाठी धडपडत असताना धर्म, संस्कृती, संघटन हे सर्व मुद्दे त्यांच्या दृष्टिक्षेपातही नव्हते.
 
 
अशा भयावह परिस्थितीत शिवाजीराजांनी स्वातंत्र्याचा उद्घोष केला. सामान्य जनतेमध्ये प्रचंड आत्मविश्वास जागवला. कलियुगामध्ये क्षत्रिय राहणार नाही, असा सर्वदूर झालेला गैरसमज आपल्या कर्तृत्वाने धुऊन काढला. ‘दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा’चे नारे पुसून टाकण्यासाठी ‘हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा’ असा विचार सामान्य जनतेमध्ये दृढमूल केला. एक वेळ उपाशी राहणार्‍या जनतेला स्वतःच्या मेहनतीने भाकरतुकडा खाण्याची सवय लावली. सारापद्धती, न्यायप्रक्रिया, स्त्रियांची सुरक्षा, शेतीला संरक्षण, व्यापार्‍यांचा उद्धार, देवळांना वर्षासन, दिवाबत्तीची सोय, अशा सर्व बाबतीत शिवाजीराजे अत्यंत सावध होते. यामुळे सामान्य जनतेची भराभरा प्रगती व्हायला लागली. सुलतानीमध्ये दुरापास्त झालेले सौख्य सामान्य जनता या छोट्याशा का होईना, पण स्वराज्यामधे अनुभवत होती. शिवाजीराजांनी आपल्या उदाहरणातून लोकांना लढण्याची प्रेरणा दिली. सुरुवातीच्या काळामध्ये फत्तेखान, अफजलखान, शाहिस्तेखान, सूरतवर आक्रमण इत्यादी लढायांमध्ये राजांनी स्वतः मोहिमांचे नेतृत्व केले. यातून प्रेरणा घेऊन सामान्य मावळा उठून उभा राहिला व पुढच्या काळामध्ये बुलंद कर्तृत्वाचे तानाजी, बाजीप्रभू, मुरारबाजी, बाळाजी आवजी, मोरोपंत पिंगळे पेशवा, अनाजीपंत सुरनीस, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, रामाजी पांगेरा अशी राष्ट्रनिष्ठांची मांदियाळी उभी राहिली. सामान्य दिसणार्‍या व सामान्य घरांमध्ये राहणार्‍या मराठ्यांनी तुफान उठवून दिले. मराठी फौजा पार तमिळनाडूपर्यंत जाऊन थडकल्या. संघटनकौशल्याचा हा आविष्कार होता. या लढायांद्वारे राजांनी भौगोलिक आक्रमणांना शह दिला.
 
 
शतकानुशतके आर्थिक लूट कारणार्‍या सुलतानांच्याच प्रांतांवर हल्ले करुन मराठे त्यांची आर्थिक लूट करू लागले. जुन्नर, नगर,  भिंगार, बसरूर, सूरत, कारंजा अशी अनेक नगरे व पेठा राजांनी फस्त केल्या. मोगलांची सर्वात मोठी बाजारपेठ सूरत तर केवळ दोन लुटींमध्येच डबघाईला आली. नगरांसोबतच महाराजांनी बहादूरखॉं, अफझलखॉं, कार्तलबखॉं अशा मोठमोठ्या सरदारांचे गोट साफ लुटून काढले. जी नीती अर्थकारणात तीच धर्मकारणात. बजाजी नाईक निंबाळकर व नेतोजी पालकर यांना सुलतानांनी बळजबरीने मुसलमान केले. शिवाजीराजे जर सर्वधर्मसमभावी असते तर राहू दिले असते या दोघांना इस्लाममध्ये. शेवटी सर्व धर्म समानच, नाही का? पण, मग हे राजांना माहिती नव्हते का? आपल्याकडे तशी पद्धत नसताना राजांनी या दोघांची घरवापसी करून का त्यांना हिंदू करवून घेतले? राजे पुरोगामी नव्हते का? असो. बरं, पण मग गोव्याच्या जेस्युईट पाद्रींनी एक कायदा पारित केला होता की, हिंदू धर्म सोडा आणि आपली जमीन वाचवा. अन्यथा गोवा सोडून जा. राजांना हे कळले तेव्हा त्यांनी या पाद्रींना गिरफ्तार केले व आमचा धर्म स्वीकारा, असे आवाहन केले. पाद्रींनी नकार दिल्यावर त्यांचे मुंडके मारून गोव्याला पाठविले. लगेच तिथल्या पोर्तुगीज विजरई (व्हायसरॉय)ने तो अध्यादेश मागे घेतला. आपली उद्ध्वस्त होऊन अतिक्रमित झालेली कल्याण, भिवंडी, पेरुमाळ (तमिळनाडू) अशी अनेक मंदिरे राजांनी पुन्हा बांधून काढली. मग महाराजांच्या या नीतीला काय म्हणावे? आपल्याच देशात आपल्या देवस्थानांची दुर्दशा होऊ नये व देवाला देवळाबाहेर ताटकळत बसावे लागू नये, हा त्यांचा दृष्टिकोन होता. ही महाराजांची धर्मनिष्ठा होती, जी सुलतानांच्या धार्मिक आक्रमणाला सडेतोड उत्तर होती. गेल्या शेकडो वर्षांत सुलतानांनी असे ठसठशीत प्रत्युत्तर पाहिलेच नव्हते. याचे अनेक पुरावे शिवभारत, पोर्तुगीज कागदपत्रे, मोगलांचे पत्रव्यवहार यात सापडतात.
 
 
राजनैतिकदृष्ट्या महाराजांनी केलेले कार्य शब्दातीत आहे. महाराजांचा अभ्यास, आकलन, निरीक्षण, गुप्तचर यंत्रणा या सर्वांमुळे त्यांची मुत्सद्देगिरी विलक्षण परिणामकारक होती. इस्लामी सत्तांचे आपापसातील संबंध, शिया-सुन्नी मतभेद, दक्षिणी-तुर्क मुसलमानांचे झगडे, तुर्क-पठाण वाद इत्यादीचा सूक्ष्म अभ्यास. शिवाय प्रत्येक सुलतानीमधील अंतर्गत कलह, महत्त्वाकांक्षा, कच्चे दुवे यांची माहिती, यामुळे मोगलांचे आक्रमण आले की, आदिलशाहची मदत घेणे, आदिलशाह उलटला की कुतुबशाहला मधे आणणे, दक्षिणी शाह्या मिळून उत्तरेविरुद्ध मोट बांधणे, सिद्दीला उधळून लावण्यासाठी मोगलांचा पाठपुरावा करणे, असे अद्भुत राजकारण महाराज नेहमी खेळले व बव्हंशी यशस्वी झालेत. परराष्ट्रीय शत्रूला गोंजारायचे नसते, त्याच्याशी त्याच्याच भाषेत उत्तर द्यायची तयारी ठेवावी लागते. शेजारी आमच्यावर आक्रमण करेल व आम्ही निमूट निषेध करू, ही सुदैवाने महाराजांची नीती नव्हती. त्यांनी आपल्या मुत्सद्देगिरीने भल्याभल्यांना पाणी पाजले. विशेषत: पुरंदरचा तह हा वरकरणी पाहता महाराजांचा पराभव वाटत असला, तरी सर्व दृष्टीने तो त्यांच्या सर्वोत्तम कूटनीतीचा नि:संशय विजयच होता.
 
 
मातृभाषेवरील आक्रमण मोडून काढताना रघुनाथपंतांकडून ‘राजव्यवहारकोश’निर्मिती हा तर मैलाचा दगड ठरला. किल्ला, तलवार, चिलखत अशा फार्सी, उर्दू शब्दांची जागा दुर्ग, खड्ग, कवच अशा संस्कृतप्रचुर शब्दांनी घेतली. आपला तोफखाना, आपले आरमार, आपली टांकसाळ उघडून स्वदेशी उत्पादने व्यवहारानुकूल केली. पोर्तुगीज व्यापारी मिठाचा व्यापार बळकवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्यावर जबर कर बसवून स्वदेशी व्यवसायाचे संरक्षण केले. सुरुवातीला जरी आरमाराच्या बाबतीत पोर्तुगिजांवर अवलंबून राहावे लागले, तरी लवकरच मराठ्यांनी स्वत:ची जहाजे स्वत: बांधली. आत्मनिर्भर स्वराज्याचे हे फार मोठे उदाहरण होते.
 
 
स्वत: राजा निगर्वी, नि:स्पृह, प्रसिद्धिपराङ्‌मुख, विनम्र, मेहनती, प्रजावत्सल होता. मदिरा, स्त्री, भ्रष्टाचार, पैसा याप्रती त्याला मुळातून द्वेष होता. त्याला स्वत:साठी काहीही नको होते. जे आहे ते सर्व समाजासाठी, अशी संन्यस्त वृत्ती होती. त्यामुळे जनतेला ते सदैव हवेहवेसे व विरोधकांना त्यांची धास्ती वाटे. अशा लोकोत्तर राजाने शतकानुशतकांची इस्लामी सुलतानांची मक्तेगिरी अवघ्या चव्वेचाळीस वर्षांत उधळून लावली. आकाराने लहान का असेना, पण एक सार्वभौम राज्य निर्माण केले. सरदारपुत्राचे बंड, धाडसी दरोडेखोर, नशिबाने यशस्वी झालेली टोळी, अशा विरोधी सत्तांनी केलेल्या शेरेबाजीकडे डोळेझाक करून एक समर्थ, सुसंस्कृत, भारतीय परंपरेला साजेसे, आर्थिक दृष्टीने अत्यंत बळकट, आत्मनिर्भर, विजिगीषू स्वराज्य शिवरायांनी उभे केले. दास्याचे स्तंभ फोडून स्वातंत्र्याचा पहिला पहिला हुंकार करणारे शिवराय कलियुगातले नरसिंह ठरले! स्त्रीच्या, देवतांच्या पुन:प्रतिस्थापनेसाठी यवनरूपी राक्षसांचा संहार करणारे मर्यादापुरुषोत्तम रामचंद्र ठरले. आपल्या करांगुलीवर स्वराज्यरूपी गोवर्धन उचलून सगळ्या गोकुळाला सुरक्षा व स्थैर्य देणारे बाळकृष्ण ठरले. शत्रूला कसे दगे द्यावे, रणांगणात चर्चा न करता कर्म करावे, शत्रूचा विश्वासघात कसा करावा, वेळप्रसंगी धर्मरक्षणासाठी आप्तस्वकीयांविरुद्ध तलवार कशी उचलावी, हे पुन्हा एकदा सांगणारे योगेश्वर श्रीकृष्ण ठरले. आणि सुलतानांच्या अत्याचारी गडद काळोखात हिंदूंना विजिगीषा, पराक्रम, नवचैतन्य, नवनवोन्मेषशालिनी स्फूर्ती देणारा शिवराज्याभिषेक दिन येणार्‍या असंख्य पिढ्यांसाठी हिंदुसाम्राज्यदिन ठरला!