पुढचा मार्ग

    दिनांक :31-May-2020
|
 
 
rss _1  H x W:
 
 
प्रारंभीची संघाची प्रार्थना तसेच संघकार्याच्या अनेक आयामांवर समर्थ रामदास स्वामींच्या कार्याचा सखोल प्रभाव आहे. ही प्रार्थना ‘भारत माता की जय’च्या घोषाने सुरू होत असे आणि ‘राष्ट्रगुरू स्वामी रामदास महाराज की जय’ या घोषाने समाप्त होत असे. यात मराठी व हिंदी कडवी होती. जसजसे संघाचे कार्य इतर प्रांतात वाढू लागले, तेव्हा संघाची प्रार्थना अखिल भारताची प्रातिनिधिक भाषा- संस्कृत भाषेत बदलण्यात आली आणि प्रार्थनेच्या शेवटी पुन्हा एकदा ‘भारत माता की जय’ म्हणणे सुरू झाले. 1940 पासून ही प्रार्थना सर्व भारतभर स्वयंसेवक उत्साहाने म्हणत आहेत.
 
 
हा बदल डॉक्टरजींच्या संमतीने करण्यात आला. त्यांचा रचनात्मक कार्यावलीवर (अजेंडा) अतिशय आग्रह होता. मग ती शब्दांची निवड असली तरी. हिंदीत एक लोकप्रिय प्रार्थना होती. त्यात म्हटले होते- ‘शीघ्र सारे दुर्गुणोंसे मुक्त हमको कीजिये।’ डॉक्टरजींना वाटले की यात नकारात्मक भावना आहे आणि म्हणून ही ओळ ‘सद्गुणों से पूर्ण हिंदू कीजिये।’ अशी बदलविण्यात आली. ते स्व-सचेत स्वयंसेवक होते. डॉक्टरजी म्हणायचे, ‘‘संघ जरी नागपुरातून सुरू झाला असला तरी, संपूर्ण भारतच संघाचे घर आहे आणि त्याचे कार्यक्षेत्र भारतातील एकूणएक खेड्यात आहे.’’ 1945 साली विजयादशमीच्या भाषणात गुरुजी म्हणाले, ‘‘संघाजवळ मूल्यरूपी अमृत आहे आणि त्याआधारे तो शांततापूर्वक आपल्या कार्यात मग्न आहे. संघाच्या विचारात कुठल्याही संकीर्णतेला थारा नाही. मानवी श्रेष्ठत्व विस्तारण्याचा संघ एक कारखाना आहे.’’
 
 
ॐ सच्चिदानंदरूपाय नमोऽस्तु परमात्मने हे एकात्मता स्तोत्र 33 कडव्यांचे आहे आणि संघाच्या सर्व कार्यालयात व एकत्रीकरणात ते म्हटले जाते. भारत मातेच्या सेवेत आपले जीवन समर्पित करणार्‍या सर्व महान लोकांची नावे यात आहेत. राजे, राण्या, योद्धे, संत, शास्त्रज्ञ, विद्वान, तत्त्वचिंतक, कलाकार, संगीतकार, कवी आणि भारतातील सर्व पवित्र भौगोलिक स्थानांचा समावेश असणार्‍या हजारो वर्षांच्या इतिहासाला हे स्तोत्र म्हणजे श्रद्धांजलीच आहे. याच्या दररोजच्या स्मरणाने मनामध्ये या राष्ट्राबद्दल अनुरक्ती वसते. ‘यं वैदिका मंत्रदृश: पुराणा...’ हा एकात्मता मंत्र आणि ‘ब्रह्मार्पणम्‌ ब्रह्महर्वि ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम्‌...’ हा भोजनमंत्र प्रत्येक स्वयंसेवकाच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. हे सदाचार त्याला समाजाच्या कल्याणासाठी प्रत्यक्ष कार्य करण्यास प्रेरित करत असतात.
 
 
एकात्मतेची परिसंस्था
संघटनात्मक दृष्टीने पाहिले असता, संघदृष्ट्या भारताचे 44 प्रांत आहेत. काही प्रांत मिळून एक क्षेत्र होते. प्रत्येक प्रांत जिल्ह्यांमध्ये विभाजित असतो, त्या एका जिल्ह्याला विभाग म्हणतात. प्रत्येक विभागातील शहरांना नगर आणि नगरातील वस्त्यांना बस्ती म्हणतात.
 
 
संघाचे मुख्य सक्रिय विभाग म्हणजे शारीरिक, बौद्धिक, प्रचारक, प्रचार, संपर्क, सेवा आणि व्यवस्था. काही गतिविधी संबंधित विभाग म्हणजे कुटुंब प्रबोधन, गौसेवा, ग्रामविकास, धर्म जागरण आणि समरसता. नियोजन, अंमलबजावणी आणि समीक्षा या सतत चालणार्‍या प्रक्रिया असतात. संघाचे सर्व स्थानिक, प्रांतीय आणि अखिल भारतीय अधिकारी सतत दौरे करत संघकार्याची प्रत्यक्षात माहिती घेत असतात.
 
 
संघ सहा उत्सव साजरे करतो : वर्ष प्रतिपदा (म्हणजे हिंदू नववर्ष दिन), हिंदुसाम्राज्य दिन (छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन), गुरू पौर्णिमा, रक्षाबंधन, विजयादशमी व संक्रांती.
 
 
संघाचे प्रशिक्षण वर्ग हे एकीकरणाची परिसंस्था (इकोसिस्टिम) असते. 25 दिवस शिक्षार्थी एकत्र राहतात. त्यांच्यात 18 जणांचा एक गट तयार केला जातो. शारीरिक कार्यक्रमासाठी या गटांना गण म्हटले जाते आणि जेव्हा ते बौद्धिक कार्यक्रमासाठी एकत्र येतात तेव्हा त्याला गट म्हणतात. या गणांना किंवा गटांना, विविध प्रांतातील प्रसिद्ध महापुरुष किंवा समाजसुधारकांची नावे दिली जातात. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील प्रशिक्षण वर्गातील गणाला नारायण गुरू अथवा संत रविदास यांसारख्या समाजसुधारकांचे नाव दिले जाते. या वर्गात वेगवेगळ्या भाषांमधील देशभक्तिपर गीते शिकविली आणि म्हटली जातात. अशा रीतीने स्वयंसेवकांना एक राष्ट्रीय दिशा दिली जाते. नागपूर येथे होणार्‍या तृतीय वर्षाच्या प्रशिक्षणात, एका गणात सुमारे दहा प्रांतातील स्वयंसेवक एकत्र असतात. यातून ‘आपण सर्व भारतीय आहोत’ हा संस्कार अंगी बाणविला जातो. एकात्मता आचरणात येते. प्रसिद्ध बंगाली कवी द्विजेंद्रलाल राय यांची मातृभूमीची कविता- शोकोल देशेर राणी शे जे, आमार जन्मभूमी’ सर्व स्वयंसेवकांना कंठस्थ करविली जाते आणि ती अतिशय आवडीने म्हटली जाते.
 
 
संघ प्रशिक्षण वर्गात विविध व्यवस्थेसाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. जसे- शिक्षार्थ्यांची संख्या व माहिती, देशभक्तिपर गीतांची निवड, ॲपची नोंदणी. असे असले तरी मुख्य भर परस्परातील संवादावरच असतो.
 
 
शाखा ते अखिल भारतीय स्तरापर्यंत संवाद, संपर्क आणि समाजातील सेवाकार्य यावर चर्चा होत असते. प्रत्येक खेडेगाव, शहर, जिल्हा आणि कुटुंब यांच्यापर्यंत कसे पोहचता येईल, याचा सतत विचार केला जातो. सध्या प्रत्येक अपार्टमेंट-ब्लॉकपर्यंत कसा संपर्क करता येईल, याचा विचार सुरू आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्याला यशवंतराव केळकर यांनी सुव्यवस्थित केले. त्यांच्या जीवन व कार्यावरील ‘मनुष्य निर्माणाकडे’ या पुस्तकात, चर्चा आणि विचारविमर्शाच्या माध्यमातून समाजाची जाणीच प्रशिक्षित करून संघटनेचा स्थायी विस्तार कसा करावा, याचे विवेचन आहे. याच विषयावर दत्तोपंत ठेंगडी यांचे ‘कार्यकर्ता’ नावाचे प्रसिद्ध पुस्तक आहे.
 
 
29 ते 31 ऑक्टोबर 2018 मध्ये झालेल्या संघाच्या बैठकीत, शाखास्थानाच्या आसपासचा परिसर कसा चांगला करता येईल, यावर सखोल चर्चा झाली होती. समाजातील स्व-व्यवस्थापन यंत्रणा विकसित केली पाहिजे, सर्वच काही सरकारी यंत्रणांमार्फत करण्याची गरज नाही. सत्याला कुठल्याही मुलाम्याची गरज नसते. म्हणून सध्याच्या जाहिरातबाजीच्या काळातही संघाचा जाहिरात करण्याकडे कल नसून, आपले कार्य आणि गुणवत्तेची हमी यावरच लक्ष केंद्रित असते.
 
 
आणिबाणीपासून धडा
स्वतंत्र भारतात, नागरी स्वातंत्र्यासाठी सर्वात मोठी लोकशाही चळवळ संघाने हाती घेतली होती. एक प्रकारे हुकूमशाहीचे सरकार चालविणार्‍या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लोकशाहीची हत्या करत, 1975 ते 1977 या काळात देशावर 21 महिन्यांची आणिबाणी लादली होती. भारताच्या संविधानाच्या अठराव्या भागात (कलम 352-360), संविधानाने स्थापित सामान्य सरकारी यंत्रणा आपले कार्य करण्यास असमर्थ ठरत असेल तर आणिबाणी लावण्याची तरतूद आहे. इंदिरा गांधींनी ‘देशांतर्गत गोंधळ’ असे कारण देत आणिबाणी लादण्याची घोषणी केली. या घोषणेच्या संदर्भातील प्रसिद्धिपत्रकात- ‘काही व्यक्ती पोलिस व लष्कराला, त्यांनी त्यांची नियमित कर्तव्ये आणि सामान्य कार्य करू नयेत, म्हणून चिथावत आहेत’ असे नमूद होते. ज्या वेळी इंदिरा गांधींच्या सरकारविरुद्ध सार्‍या देशात भ्रष्टाचारविरोधी व महागाईविरोधी आंदोलने जोरावर होती, तेव्हा आणिबाणीची ही घोषणा संविधानाच्या अनुच्छेद 352 अन्वये 25 जून 1975 ला करण्यात आली. इंदिरा गांधींना एकहाती नियंत्रण हवे होते. त्यांनी संविधानाच्या मूळ रचनेला नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि आणिबाणी लागू असताना 42 वा दुरुस्ती कायदा-1976 देशावर लादला. कालांतराने, या दुरुस्तीच्या तरतुदी 1980 साली मिनर्व्हा मिल प्रकरणातील निकालाने रद्द ठरविण्यात आल्या. 44 वी दुरुस्ती-1978 अन्वये, ‘देशांतर्गत गोंधळ’ या शब्दाच्या ऐवजी ‘सशस्त्र उठाव’ हा शब्द टाकण्यात आला. त्यामुळे 1978 नंतर आता सशस्त्र उठाव नसताना केवळ ‘देशांतर्गत गोंधळ’ या कारणावरून आणिबाणीची घोषणा करणे शक्य नाही. आजपर्यंत जवळपास हीच संविधानात्मक स्थिती आहे.
 
 
आणिबाणी लादल्यानंतर लगेचच, इंदिरा गांधी आणि कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष देवकांत बरुआ यांनी संघाला नष्ट करण्याचा आपला हेतू जाहीर केला. 27 जून 1975 रोजी केंद्रीय सचिवालय अधिकार्‍यांच्या बैठकीत इंदिरा गांधींनी, देशांतर्गत गोंधळासाठी रा. स्व. संघच मूळ कारण असल्याचे जाहीर केले. त्यानुसार, बरुआ यांनी युवक कॉंग्रेसच्या या मेळाव्याला संबोधित करताना म्हटले, ‘‘आम्हाला संघाला समूळ नष्ट करायचे आहे. पुन्हा संघटित होण्याची त्यांना कुठलीही संधी मिळता कामा नये.’’ इंदिरा गांधी सरकारने 4 जुलै 1975 रोजी रा. स्व. संघावर बंदी घातली. आणिबाणीत नागरिकांचे सर्व मूलभूत अधिकार निलंबित करण्यात आले होते; आपले हक्क बजावण्यासाठी न्यायालयात जाण्याचा अधिकारही निलंबित करण्यात आला होता. म्हणून मग, जनजागृती आणि संघर्ष हेच पर्याय उरले होते. आणिबाणीला विरोध करण्यासाठी, सर्व राजकीय पक्ष एकत्र आलेत आणि त्यांनी वयोवृद्ध गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वात लोक संघर्ष समितीची स्थापना केली. 15 ते 25 जुलै 1975 दहा दिवस देशव्यापी सत्याग्रह करण्याचे ठरले. या योजनेला कार्यान्वित करण्याची जबाबदारी त्या काळातील वरिष्ठ संघनेते नानाजी देशमुख यांच्याकडे देण्यात आली. स्वयंसेवकांच्या दृष्टीने, दडपशाही व कॉंग्रेस सरकारच्या अत्याचाराविरुद्ध लढणे हेच आता प्रथम कार्य झाले होते. या अत्यंत संकटाच्या काळात सरसंघचालक म्हणून बाळासाहेब देवरस यांनी संघाचे नेतृत्व केले.
 
 
बंदीमुळे भीती तर सोडाच, उलट स्वयंसेवकांची हिंमत वाढली आणि सामूहिक शक्तीचे भव्य प्रदर्शन करीत संघाने या आणिबाणीविरोधी आंदोलनाचे नेतृत्व केले. नानाजी देशमुख यांना अटक झाल्यानंतर या आंदोलनाची सूत्रे माधवराव मुळे यांनी हाती घेतली. 50 वर्षांच्या सातत्यपूर्ण कार्यामुळे आता स्वयंसेवकांचे उत्तम पीक आले होते. वरिष्ठ नेते तुरुंगात असले तरी, एक फार मोठी कार्यक्षम चमू उपलब्ध होती. त्या वेळी 1 हजार 356 प्रचारक होते. यापैकी 189 तुरुंगात गेले होते आणि उर्वरित सर्व भूमिगत राहून सक्रिय होते. इतरांच्या दृष्टीने आख्यायिका बनलेली संघाची कार्यविभागणी पद्धत सक्रिय करण्यात आली. नियोजनाच्या दृष्टीने संपूर्ण देशाचे सहा भाग किंवा क्षेत्र करण्यात आले, जे आणिबाणीच्या आधी चार होते. प्रचारकांपैकी, बाळासाहेब देवरस यांचे धाकटे बंधू, संघाचे वरिष्ठ अधिकारी आणि भाजपा समन्वयाचे प्रभारी भाऊराव देवरस व राममंदिर आंदोलनामागील ‘डोके’ असलेले मोरोपंत पिंगळे यांनी, लोक संघर्ष समितीची धुरा सांभाळत असलेल्या माधवराव मुळे यांच्यासोबत काम करणे सुरू केले.
 
 
संघाचे चतुर्थ सरसंघचालक प्रो. राजेंद्रसिंह उर्फ रज्जूभय्या यांच्या मार्गदर्शनात एक नागरिक स्वातंत्र्य मोर्चा तयार करण्यात आला. विदेशातील कार्य, संघाचे प्रचारक लक्ष्मणराव भिडे व चंपतलाल हे बघू लागले. आणिबाणीविरोधातील साहित्य तयार करण्याचे काम दिल्लीबाहेर नेण्यात आले आणि त्याची जबाबदारी, हिंदी साप्ताहिक- पाञ्चजन्यचे संपादक भानुप्रताप शुक्ल यांच्याकडे देण्यात आली. नागपुरात हे काम, अनंतकुमार गोखले आणि आणिबाणीविरोधी आंदोलनाचे एक समन्वयक व समाजवादी नेते मधू लिमये बघत. धार्मिक नेत्यांशी संपर्क ठेवण्याची जबाबदारी दादासाहेब आपटे यांना देण्यात आली.
 
 
आणिबाणीविरोधी आंदोलनातील संघाच्या भूमिकेची थोडक्यात माहिती ‘आपात्कालीन संघर्षगाथा’ या पुस्तकात आली आहे. याचे संपादन के. नागराज, प्रो. दासी देसाई व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्या वेळेस नरेंद्र मोदी व के. एस. नागराज प्रचारक होते आणि दासी देसाई मुंबईच्या कीर्ती कॉलेजचे निवृत्त प्राचार्य होते. संघाच्या शाखांवर बंदी असली तरी, शाखा-यंत्रणा व्यवस्थित व कार्यक्षमतेने कार्य करीत होती. स्वयंसेवकांना कवायत करणे, भगव्या ध्वजाला प्रमाण करणे तसेच बौद्धिक कार्यक्रमात भाग घेणे इत्यादींसाठी देशभरात शाखा लावणे शक्य नव्हते. परंतु, शाखा म्हणजे एखाद्या स्थानी भौतिकदृष्ट्या दिसणारी रचना नव्हतीच मुळी, ती रा. स्व. संघाच्या कार्याचे एक शास्त्र आणि कर्तव्याच्या आदेशांचे पालन करण्याची एक आचारसंहिता असल्याने, ही यंत्रणा खडकाप्रमाणे अभेद्य होती. या आचारसंहितेचा आणिबाणीविरोधी आंदोलनाच्या काळात पूर्णपणे वापर करण्यात आला. ज्या स्वयंसेवकांना तुरुंगात डांबले होते, त्यांनी तुरुंगातही शाखा सुरू केली होती आणि सर्व तुरुंग हे शाखास्थान झाले होते. खरे म्हणजे, अनेकांना तर तुरुंग ही एक विशेष सोयच वाटली. कारण, दररोज सकाळी ते तिथे मोठ्याने ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे’ ही संघ प्रार्थना म्हणू शकत होते.
 
 
तुरुंगातच संघ प्रशिक्षण शिबिरे भरविली गेली. जे तुरुंगाबाहेर होते ते तुरुंगात असलेल्यांचे पालक झाले होते. त्यांच्या कुटुंबांची आणि कोर्टातील खटल्यांची काळजी घेत होते. स्वयंसेवकांनी एकमेकांना सांभाळून घेतले आणि भारताचे अधिकार व सामान्य जीवन पुनर्प्रस्थापित करण्यासाठी अत्यंत अत्याचारी राजवटीचा सामना केला.
 
 
अभाविपने या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली होती. समाजातील आक्रोश विद्यार्थिजगताने प्रकट केला. स्वातंत्र्याच्या आंदोलन काळातील विद्यार्थी-चळवळीची ही पुनरुक्ती होती. गुजरातमधील विद्यार्थी आंदोलनानंतर बिहारमधील चळवळीने, लोकशाहीसाठी भारतातील तरुणांचा निर्धार दाखवून दिला. गुजरातमधील आंदोलन, वसतिगृहातील भोजनाचे दर वाढविण्यावरून सुरू झाले होते. ते लवकरच बिहार व इतर राज्यांमध्ये, तांदळाच्या वाढत्या किमतीच्या विरोधाच्या रूपात तसेच कॉंग्रेस सरकार व त्याच्या दडपशाही धोरणाविरुद्ध भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या रूपात पोहोचले. गुजरात आणि बिहार दोन्ही आंदोलनात अभाविपने महत्त्वाची भूमिका बजावली. मुळाशी संघ असल्याने, अभाविपने आपले विद्यार्थी संघटना म्हणून वैशिष्ट्य जपले आणि त्या काळात बहुतेक सर्वच विद्यार्थी संघटनांचा कल पक्षीय राजकारणाकडे असतानाही, अभाविप त्या दिशेकडे फिरकलीही नाही.
 
 
आणिबाणीविरोधी आंदोलनाने भविष्यासाठी फार मोठी उदाहरणे घालून दिलीत. कितीही खडतर काळ असला तरी संघ आपल्या सामाजिक उद्दिष्टांपासून भरकटत नाही, हे दाखवून दिले. आज अनेक स्वयंसेवक एका राजकीय पक्षात म्हणजे भाजपात दिसत आहेत. त्यामुळे संघाची मूल्ये भारतीय राजकारणाच्या वृत्ती-प्रवृत्तीवर निश्चितच प्रभाव टाकणार आहेत. राजकारण आणि उत्तम राजकीय पक्षांच्या संदर्भात संघाची एक कल्पना आणि स्वप्न आहे, परंतु संघ स्वत: राजकारणात गुंतत नाही. भारताच्या राजकीय भवितव्याविषयी संघाला वाटते की, देशात अनेक राजकीय पक्ष असतील, परंतु ते सर्व भारताचा प्राचीन वारसा आणि प्रतीकांच्या बाबतीत अभिमानी असतील. मूलभूत मूल्ये तसेच हिंदू संस्कृतीच्या वारशाबाबत, त्यांच्यात एकमत असेल. त्यांच्यात मतभेद असतील; परंतु ते मतभेद संकल्पना व देशाच्या विकास-मॉडेलच्या संदर्भात व तपशिलाबाबत असतील.
 
 
21 व्या शतकातील शाखा-व्यवस्था
संघाचा गणवेश हा नेहमीच चर्चेचा विषय होता आणि आहेही. आता तो बदलण्यात आला आहे. उदाहरणार्थ, खाकी हाफ पँटच्या जागी फुलपँट आली आहे. संघ शाखेसाठी गणवेश आवश्यक असतो, असा सर्वप्रचलित समज आहे. खरेतर गणवेश आवश्यक नसतो. फक्त उत्सव व एखाद्या विशेष प्रसंगी गणवेेश घातला जातो. इतर दिवशी नेहमीचे कपडे घालून कुणीही शाखेत येऊ शकतो. हाफ पँट घालण्याचे कारण, त्या शारीरिक कार्यक्रमासाठी सोयीच्या असतात. गणवेशात बदल झाल्यानंतरदेखील, मूळ अपेक्षा कायमच आहे व ती म्हणजे घातलेला वेश, कार्यक्रमांसाठी सोयीचा असावा.
 
 
शाखेची वेळ ठरविताना, लवचीकता आणि स्थानिक सोय विचारात घेतली जाते. पहाटे 5 वाजता सुरू होणार्‍याही शाखा आहेत. परंतु, सकाळच्या बहुतेक शाखा 6 ते 8.30 या कालावधीत लागतात, तर सायम्‌ शाखा 6 ते 8.30 आणि रात्र शाखा 10 वाजेपर्यंत लागतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळापत्रकाप्रमाणे कुठल्या शाखेत जायचे ते ठरवून दिले जाते. वेळापत्रक लवचीक असले, तरी शाखेची वेळ एकदा निश्चित केली की मग ती सकाळची असो की रात्रीची, ती वेळ आणि शाखेतील शिस्त कटाक्षाने पाळली जाते.
उत्सवाच्या कार्यक्रमात विशेषत: शारीरिक कार्यक्रम आणि कवायती बघण्यासाठी अतिथी म्हणून महिला उपस्थित राहू लागल्या आहेत. ही उपस्थिती मोठी असते. काही वेळा, संघ मंडली व साप्ताहिक मिलनमध्ये महिलांचा सहभाग असतो.
 
 
संघाच्या वेबसाईटमध्ये ‘जॉईन आरएसएस’ नावाची लिंक आहे आणि तिला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या लिंकच्या माध्यमातून सुमारे 50 हजार लोक दर महिन्याला संघाशी जुळले जात आहेत. या लिंकद्वारे जुळल्या गेलेल्यांशी संपर्क करण्यासाठी स्थानिक स्वयंसेवकांना या नवागतांची माहिती पुरविण्यात येते. तसेच त्यांना संघाशी ओळख व्हावी म्हणून संघ परिचय वर्गाचे आयोजनही करण्यात येते. बंगळुरूत अशाच एका संघ परिचय वर्गात आयटी उद्योगातील 3 हजाराहून अधिक लोक सहभागी झाले होते. मुंबई, बंगळुरू, पुणे, हैदराबाद आणि दिल्लीसारख्या महानगरात संघ आयटी मिलनचे आयोजन करतो. व्यावसायिकांनी तंत्रज्ञानाचा वापर करून, वेळेची कमतरता आणि ट्रॅफिक जामसारख्या समस्यांवर उपाय म्हणून ई-शाखेच्या माध्यमातून चर्चा आणि संवाद करण्यासाठी शाखेचे नेटवर्क तयार केले. हा एक अनोखा अनुभव होता. भारताचा इतिहास आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्यांवरील मजकूर प्रसारित केला गेला. देशभक्तिपर गीतेदेखील पाठविण्यात आली. अशाप्रकारचे अनेक अभिनव प्रयोग सुरू असतात. समाजाच्या सर्व स्तरांतील लोक ‘जॉईन आरएसएस’ बटन दाबत आहेत. 2012 सालापासून आतापर्यंत 6 लाख 1 हजार 950 लोकांनी हे बटन दाबले आहे.
 
 
नारी शक्तीची पुनर्व्याख्या
शाखेमध्ये महिलांचा सहभाग नसतो हे जरी खरे असले, तरी संघात अनेक महिला आहेत. डॉक्टरजींनी राष्ट्र सेविका समिती सुरू करण्यास प्रेरणा दिली आणि ही संघटना संघस्थापनेनंतर लवकरच सुरू झाली. कार्यक्रम, प्राधान्य आणि विविध विभागांच्या दृष्टीने राष्ट्र सेविका समिती संघाची आरशातील प्रतिमाच आहे. फाळणीच्या हिंसक दिवसांमध्ये, गुरुजी कराचीमधील स्वयंसेवकांना प्रेरित करीत होते, तेव्हा राष्ट्र सेविका समितीच्या मावशी केळकर लाहोरच्या दौर्‍यावर होत्या. हिंदूंना संरक्षण देण्याच्या कामात समिती व संघ परिवारातील अनेक महिला कार्य करीत होत्या.
 
 
संघातील सेवा, संपर्क आणि प्रचार इत्यादी संघाचे प्रमुख विभाग तसेच ग्रामविकास, गौसेवा, धार्मिक कार्यक्रम, कुटुंब प्रबोधन इत्यादी कार्यांमध्ये आज महिला सहभागी होत आहेत. ही क्षेत्रे महिलांच्या व्यापक कार्यशक्तीला संधी देणारी आहेत. संघात स्त्री-शक्ती ही केवळ महिलांसाठीच असलेली एक संघटना आहे. अभाविपसारख्या महत्त्वाच्या अनेक संघटनांमध्ये बर्‍याच महिला नेतृत्वपदी आहेत. संघाच्या अखिल भारतीय पदाधिकार्‍यांमध्ये गीताताई गुंडे यांचा समावेश आहे. 1984 साली ग्लॅक्सोसारख्या नामांकित कंपनीतील प्रतिष्ठेची नोकरी सोडून गीताताई पूर्णवेळ कार्यकर्ती बनल्या. त्यांनी अभाविपमध्ये बरीच वर्षे कार्य केले आणि त्या या संघटनेच्या उपाध्यक्ष झाल्यात. सध्या त्या, महिलासंबंधी सर्व उपक्रम व कार्याच्या प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळीत आहेत. संघ परिवारातील सर्व संघटनांमधील विद्यार्थिनी, महिला कार्यकर्त्या आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधणे तसेच त्यांच्यातील नेतृत्वाचा विकास यावर सध्या त्यांचे कार्य केंद्रित आहे. ही जबाबदारी त्या गेली पंधरा वर्षे सांभाळीत आहेत. सरसंघचालक व सरकार्यवाह दोघेही या कार्याला सहकार्य करीत असतात आणि सामाजिक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा म्हणून संघ क्रमबद्ध रीतीने कार्य करीत आहे.
 
 
परदेशातील संघाच्या शाखा, हिंदू स्वयंसेवक संघामार्फत संचालित केल्या जातात. या कौटुंबिक शाखा असतात आणि त्यात महिला व पुरुष दोघेही सहभागी असतात. या शाखा साप्ताहिक असतात आणि एका तासाहून अधिक काळ चालतात. पुरुष आणि महिलांचे गट तयार केले जातात. दोन्ही गटांसाठी शारीरिक प्रशिक्षण व बौद्धिक समान असतात. एकत्रितपणे करता येतील असे सामान्य कार्यक्रमही या शाखांमधून घेतले जातात.
 
 
येणार्‍या काळात संघ, उपयोगकर्ता संचालित (युझर ड्रिव्हन) नेटवर्क होईल. शाखेत हजर असलेले त्यांच्या आवश्यकतेनुसार व प्राधान्यानुसार; परंतु मूलभूत स्वभाव काटेकोरपणे कायम ठेवून तात्पुरती व्यवस्था उभी करतील. जिथे आपण राहतो, तिथल्या समाजाशी शाखेला जोडण्याचे कार्य करणारी ही मंडळी आहेत. लोकांनीच शाखेला आपली मानायची आणि ती चालवायची.
 
 
पुढचा मार्ग
समकालीन मुद्यांचा विचार केला, तर 21 व्या शतकातील पृथ्वीची स्थिती, संघाच्या दृष्टीने अत्यंत काळजीचा विषय आहे. पर्यावरण, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष, ग्लोबल वॉर्मिंग, सुदृढ जीवनशैली इत्यादी महत्त्वाचे विषय आहेत. समाजशास्त्रीय मुद्यांमध्ये आधुनिक काळातील विवाह, कुटुंबातील स्त्रीचे स्थान, मुलांचे पालनपोषण, परंपरा व आधुनिकतेचा संगम इत्यादींची चर्चा होते. भारतातील शिक्षणाचा केंद्रबिंदू विज्ञान आहे. भारताची तंत्रज्ञानातील महान सफलता, भविष्यातील वाटचाल, राष्ट्रीय सुरक्षेची आव्हाने, समकालीन चौकटीत हिंदुत्वाची संकल्पना, सरकारची आर्थिक धोरणे व कार्यक्रम, रोजगार, गुंतवणूक, दारिद्र्य निर्मूलन आणि सर्वांना प्राथमिक गुणवत्तापूर्ण शिक्षण, ही 21 व्या शतकासाठी संघाची कृतिशील विषयसूची आहे.
 
 
परिश्रमशीलता, सदाचरणाची अत्यावश्यकता, रचनात्मक कार्य, खर्चाचे उत्तरदायित्व, कमीतकमी खर्चात उत्कृष्ट कार्यक्रमांची अंमलबजावणी, खर्चाची बचत आणि एखाद्याच्या व्यवस्थापकीय शिष्टाचारातून समाज व देशासोबतचे ऐक्याचे प्रकटीकरण इत्यादी वैयक्तिक गुणवत्तापूर्ण संघाचे प्रशिक्षण, व्यक्तिगत स्तरावर चालूच राहील. सदाचार आचरणात आणलाच पाहिजे. तुम्ही स्वत: उन्नत असाल तरच दुसर्‍याची उन्नती करू शकता. म्हणूनच, व्यक्तिनिर्माण हे जे संघाचे स्थापनेपासूनचे ध्येय आहे, ते 21 व्या शतकातही तितकेच प्रबळ राहणार आहे.
 
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी अखिल भारतीय संघटन मंत्री व रा. स्व. संघाचे विद्यमान अखिल भारतीय सह प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी लिहिलेल्या ‘द आरएसएस रोडमॅप्स फॉर द ट्‌वेन्टीफर्स्ट सेंचुरी’ या पुस्तकाचा क्रमश: भावानुवाद