ड्रॅगनच्या कुरापती...

    दिनांक :31-May-2020
|

xii_1  H x W: 0
 
 
- डॉ. परीक्षित स. शेवडे 
 
‘‘ही तुमची जमीन नाही. हा भूभाग भारताच्या सीमेत नाही. त्यामुळे इथून तातडीने परत जा...’’
उत्तर सिक्कीममधील नाकू ला सेक्टरमधील मुगुथांग व्हॅलीमध्ये गस्त घालणार्‍या भारतीय सैनिकांना चिनी जवानांनी भारतीय सीमेत घुसखोरी केल्याचे लक्षात आले. हे लक्षात येताच आपल्या जवानांनी चिनी सैन्याला मागे हटण्यास सांगितले. त्यावर पीपल्स लिबरेशन आर्मीच्या अधिकार्‍याने वरीलप्रमाणे उर्मट प्रत्युत्तर दिले. इतकेच नाही तर तो अधिकारी भारतीय सैन्याच्या एका मेजरच्या दिशेने हल्ला करण्याच्या आविर्भावात पुढे सरसावला. हे पाहताच भारतीय सैन्यातील एका लेफ्टनंटचा पारा चढला. एकतर आपल्या हद्दीत येऊन आपल्यावरच अरेरावी आणि त्यातच आपल्या वरिष्ठ अधिकार्‍यांवर गुंडाप्रमाणे हल्ला करायला जाण्याचा चिनी अधिकार्‍याचा उद्दामपणा त्याला अजिबात सहन झाला नाही.
 
 
‘‘ही आमची भूमी आहे. आमची भूमी नाही हे बोलण्याची हिंमतच कशी होते?’’
 
 
लेफ्टनंट गरजले आणि त्यांनी त्या चिनी मेजरच्या नाकावर इतका जोरदार ठोसा लगावला की, तो हेलपाटला आणि त्याच्या नाकातून रक्ताची धार लागली. स्वाभाविकपणे या कृत्याने तणाव निर्माण होऊन काही काळ भारत-चीन सैन्यात मुष्टियुद्ध रंगले! यात दोन्ही बाजूच्या सैनिकांना दुखापती झाल्या. पुढे हा वाद शिष्टाचारसंमत चर्चेतून मिटविण्यात आला आणि दोन्ही देशांचे सैनिक परत माघारी आपल्या चौक्यांवर परतले. भारतीय लेफ्टनंटला वरिष्ठांनी कानपिचक्या जरूर दिल्या; मात्र मनातून त्याचे कौतुकच झाले असणार, हे नक्की. त्याने आपला रोखठोक बाणा दाखवून दिला. ही घटना फार जुनी नसून मे 2020 च्या दुसर्‍या आठवड्यातील आहे! चीनने भारताच्या कुरापती काढण्यास सुरुवात केलेली असून, गेल्या दोन वर्षांत तब्बल एक हजाराहून अधिक वेळेस भारतीय सीमारेषेपलीकडे चिनी सैन्याने घुसखोरी केली आहे, जी अद्यापही सुरूच आहे. याच प्रसंगाच्या जेमतेम चार दिवस आधी लडाखमध्येही चिनी सैनिकांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. पॅगोंग सरोवराच्या उत्तरेकडे पूर्व लडाखमध्ये 5 मे रोजी दोन्ही सैन्याचे जवान आमनेसामने उभे ठाकले होते. येथेही भारतीय सैनिकांनी चिनी जवानांना माघारी जाण्यास भाग पाडले होते. लेख लिहून होईपर्यंत चीनने आपल्या सैन्याला सीमेवर तयार राहण्याचे आदेश दिल्याचे वृत्त आहे.
 
 
चीनमधूनच बाहेर पडलेल्या कोरोना नामक राक्षसाच्या तडाख्यात अवघे जग सापडलेले असताना, स्वतः लाल्या ड्रॅगनला मात्र युद्धखोरी सुचत आहे. याचे कारण अन्य काही नसून जागतिक व्यापारात आपल्याला निर्माण झालेल्या अडचणींपासून आपल्या नागरिकांचे लक्ष हटविणे इतकेच दिसते. अमेरिकेने चीनविरुद्ध आर्थिक युद्ध पुकारले आहेच. भारतानेही आत्मनिर्भरचा नारा बुलंद केल्याने लाले चवताळले आहेत, हे तर स्पष्ट आहेच. यासाठीच या कुरापती सुरू झाल्या आहेत. चीनने केवळ सीमेवर अस्थिरता निर्माण करण्यास सुरू केली असे नसून, टीचभर नेपाळलादेखील कळसूत्री बाहुली करून भारताविरुद्ध वक्तव्ये करण्यास भरीस घातले आहे. नेपाळमधील खड्गप्रसाद सरकार हे कम्युनिस्टांचे असून ते चिनी आशीर्वादाने निर्माण झालेले आहे, हे उघड गुपित आहे. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी धारचूला ते लिपुलेख अशा नव्या रस्त्याचं उद्घाटन केलं होतं. संरक्षणदलाच्या मदतीने बांधण्यात आलेल्या या नव्या मार्गामुळे कैलास-मानसरोवर तीर्थयात्रेसाठी लागणारा कालावधी लक्षणीय रीत्या घटणार आहे. हे वृत्त समोर येताच नेपाळने सदर भागावर आपला अधिकार सांगून विरोध करण्यास सुरुवात केली. नेपाळमध्ये भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा यांना नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप कुमार ग्यावली यांनी बोलावून विरोध दर्शवला. हे प्रकरण इथेच थांबले नाही, तर नेपाळ सरकारने लगोलग आपल्या देशाचा वादग्रस्त नकाशा प्रसिद्ध केला. या नकाशामध्ये लिपुलेख, कालापानी, लिंपियाधुरा हा भारतीय भाग नेपाळचा असल्याचे दाखवण्यात आले आहे. या घटनेचे सूतोवाच, नेपाळचे राष्ट्रपती बिध्यादेवी भंडारी यांनी त्यांच्या संसदेच्या संयुक्त सत्राला संबोधित केले होते. लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा नेपाळचा अविभाज्य भाग आहे. तो पुन्हा मिळवण्यासाठी ठोस प्रयत्न केले जातील. नेपाळच्या सगळ्या क्षेत्रांचा नकाशात समावेश केला जाईल. नेपाळ आंतरराष्ट्रीय सीमांच्या सुरक्षेसाठी प्रतिबद्ध आहे. भारतासोबतच्या सीमावादावर इतिहास, मानचित्र, तथ्य आणि साक्ष यांच्या आधारे उपाय काढला जाईल, असे त्यांचे विधान होते. यानुसार तयार झालेल्या नवीन नकाशावर भारताने तीव्र नापसंती दर्शवली.
 
 
नेपाळ कोणत्या मुद्यावरून विरोध करत आहे ते मला माहिती नाही. या आधी कधी अशी समस्या आली नव्हती. दुसर्‍याच्या इशार्‍यावर नेपाळ हे करत असण्याची शक्यता आहे. अशी प्रतिक्रिया भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी दिली. स्वतः लष्करप्रमुख इतर कोणाच्या इशार्‍यावर हे सुरू असल्याचे मत व्यक्त करतात, तेव्हा त्यांचा रोख कोणाकडे आहे हे वेगळे सांगावयास नकोच! 1816 साली झालेल्या ईस्ट इंडिया कंपनी आणि नेपाळ यांतील सुगौली करारानुसारवरील प्रदेश भारताचाच आहे. मात्र, यात काही गैरसमज असल्याचे नेपाळच्या काही वरिष्ठ अधिकार्‍यांचे मत आहे. मजेची बाब म्हणजे आजही नेपाळकडे नकाशे तयार करण्याचे स्वतःचे असे तंत्र नाही. त्यामुळे त्यांना प्रत्यक्षात कोणताही ठोस दावा करण्यास वावच नाही. तरीही ही अरेरावी पाहता हे उसने अवसान चीनच्या जिवावर आहे, हे स्पष्टच आहे. नेपाळने अशी भूमिका घेण्याची गेल्या काही दिवसांतील ही दुसरी वेळ.
 
 
चीन व इटलीतून आलेल्या विषाणूपेक्षा भारतातून आलेला विषाणू अधिक घातक आहे, असे वादग्रस्त विधान पंतप्रधान खड्गप्रसाद शर्मा ओली यांनी थेट नेपाळच्या संसदेत केले. भारतामधून अनेक लोक अवैधपणे नेपाळमध्ये आले आहेत आणि तेच कोरोना विषाणूची साथ पसरवत असून त्याला स्थानिक नेते व प्रतिनिधी जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. काठमांडूमध्ये टेस्टची संख्या वाढवल्यावर रुग्णसंख्या वाढल्याने वर गेलेला आकडा पाहून ओली यांनी अतिशय बेजबाबदार आणि आक्षेपार्ह असे वरील विधान करत, स्वतःची जबाबदारी झटकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. प्रत्यक्षात काठमांडूमध्ये आढळलेल्या एकूण रुग्णांत केवळ दोन भारतीय असून; ते गेले चार महिने नेपाळमध्येच आहेत. त्यांनी भारतात प्रवास केल्याचा कोणताही इतिहास नाही. ओलींच्या वक्तव्यामागे केवळ चिनी लाले नसून त्यांच्या स्वतःच्या सरकारमधील बंडखोरीदेखील आहे. शासन चिनी असो वा नेपाळी; जागतिक संकटात असे गलिच्छ राजकारण हे खरा चेहरा उघड करत असते!