जगाचे भवितव्य काय?

    दिनांक :31-May-2020
|
 
trees _1  H x W 
 
 
- सुधीर मुनगंटीवार  
 
 
दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी काय काय केले पाहिजे, यावर चिंतन केले जाते, चर्चा होते. प्रसार माध्यमांतून बातम्या प्रकाशित होतात आणि मधल्या काळात पुढल्या वर्षीचा पर्यावरण दिन येईपर्यंत आपण सगळे विसरून जातो. वास्तविक, असे व्हायला नको. पर्यावरणाप्रति आम्ही सदासर्वकाळ जागरूक राहायला हवे. कारण, गेल्या दोनतीन दशकांत पर्यावरणाची जी हानी झाली आहे, ती अल्पावधीत भरून निघणारी नाही. पर्यावरण दिनी केवळ कार्यक्रमांचे आयोजन करूनही काम भागणार नाही. पर्यावरण संतुलन राखले गेले नाही, तर काय उत्पात होतो, याचा अनुभव सध्या संपूर्ण जग घेत आहे. कोरोना हा कृत्रिम विषाणू आहे. तो अदृश्य आहे. या अदृश्य शत्रूने जगभरात जो धुमाकूळ घातला आहे, तो विनाशकारी आहे. हा विनाशकारी शत्रू जगाचे किती नुकसान करणार, हे येत्या काळात दिसेलच. त्यातच, येत्या 5 जून रोजी आपण सगळे पर्यावरण दिन साजरा करणार आहोत. पण, यंदा त्यावर कोरोनाचे सावट आहे. या सावटात भौतिक दुरत्वाच्या नियमाचे पालन करीत आपल्यापैकी प्रत्येकाने पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली पाहिजे, एक तरी झाड आपल्या अंगणात वा परिसरात लावून ते जगवण्याचा संकल्प सोडला पाहिजे. कारण, पर्यावरण रक्षण ही केवळ सरकारची नव्हे, तर एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी आहे. आज आपण झाडं लावलीत आणि जगवलीत तर आपल्यासह पुढच्या पिढ्यांना त्याचा मोठा लाभ होणार आहे.
 
 
मी पाच वर्षे महाराष्ट्राचा वनमंत्री होतो. माझ्याकडे अर्थ आणि नियोजन हे अतिशय महत्त्वाचे खातेही होते. पण, वन खात्यात काम करताना मी अतिशय नियोजनपूर्वक योजना आखल्या. पाच वर्षांत पन्नास कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आणि ते महाराष्ट्राचे वनखाते, विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये आणि या राज्यातील समस्त जनतेच्या सक्रिय सहकार्याने यशस्वीरीत्या गाठलेसुद्धा. त्याचा मला मनापासून आनंद आहे. त्यातील बहुतांश झाडं ही जगली आहेत. प्रयत्नपूर्वक जगवली आहेत. पण, केवळ पन्नास कोटी वृक्षलागवड करून काम भागणार नाही. वृक्षलागवड ही एक चळवळ बनवावी लागणार आहे. मी मंत्री असो अथवा नसो, वृक्षलागवड हा माझा प्राण आहे, तो माझा श्र्वास आहे आणि ध्यासही आहे. आपल्या महाराष्ट्रात सगळीकडे मोठ्या प्रमाणात झाडं लागली पाहिजेत आणि पर्यावरणाचा संतुलित विकास झाला पाहिजे, पर्यावरण हे आरोग्यपूरक असले पाहिजे, असे मला प्रामाणिकपणे वाटते. सध्या कडक उन्ह तापत आहे. उन्हाच्या तीव्र झळांनी विदर्भ तापला आहे, खान्देश तापला आहे, मराठवाडाही याला अपवाद नाही. वाळवंटात जिथे हिरवळ असते ना त्याला 'ओसिस' असे म्हणतात. त्याचप्रमाणे आपण रस्त्याने जाताना ज्या भागात मोठ्या प्रमाणात झाडे असतात, त्याठिकाणी आल्हाददायक गारवा जाणवतो. याचा अर्थ हाच की झाडांमुळे गारवा मिळतो. हा गारवा सगळीकडे अनुभवायचा असेल तर नुसता जागतिक पर्यावरण दिन साजरा करून चालायचे नाही. पर्यावरण दिन साजरा करण्याला प्रत्यक्ष कृतीची जोड देणे आवश्यक आहे. अशी कृतीची जोड मिळाली आणि प्रत्येकाने दरवर्षी एक झाड लावून ते जगविले तर फार मोठी क्रांती होणार आहे.
 
 
आज जे जागतिक संकट आले आहे, ते सगळ्यांसाठीच वेदनादायी आहे. मनुष्यासाठी तर फारच वेदनादायी आहे. पशूपक्षी, प्राणी जंगलांमध्ये मुक्तसंचार करीत आहेत आणि मनुष्य मात्र स्वत:ला घरात कोंडून बसला आहे. आपली दैवतं देवळात बंद आहेत. त्यांचीही आपल्याला दर्शन देण्याची इच्छा नसावी कदाचित! कारण? आपण गेल्या कित्येक वर्षांत पर्यावरणाची जी ऐसीतैसी केली आहे ना, त्यामुळे निसर्ग देवतेसोबतच आपली ही दैवतंही नाराज झाली आहेत आपल्यावर. त्यांची ही नाराजी दूर करून पर्यावरण सुदृढ आणि सशक्त करण्याची चांगली संधी आपल्याला ईश्र्वरानेच उपलब्ध करून दिली आहे आणि ही आपत्ती नसून इष्टापत्ती आहे, असे मानले पाहिजे. असे मानले आणि प्रत्यक्ष कृती केली तर पुढला काळ पर्यावरणासाठी आणि आपल्यासाठीही सोनेरीच असेल, यात शंका नाही. आज कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. चारपाच दिवसांपूर्वी विमानं सुरू झाली असली तरी त्यांची संख्या मर्यादित आहे. रस्त्यांवर मर्यादित संख्येत वाहनं धावताहेत, रेल्वेगाड्याही पूर्णपणे सुरू झालेल्या नाहीत. पेट्रोल-डिझेलवर धावणारी चारचाकी वाहनं पार्किंगमध्येच असल्याने मधल्या काळात या वाहनांमधील कार्बनडाय ऑक्साईड वातावरणात मिसळला नाही. कारखाने बंद असल्याने हवेत विषारी धूर मिसळला नाही. त्यामुळे पर्यावरण एकदम शुद्ध झाले. आकाश निळेशार दिसले, नद्यांचे पाणी शुद्ध झाले, पिण्यायोग्य झाले. हे सगळे चित्र मनाला कमालीचा आनंद देणारे होते आणि आहे. लॉकडाऊनच्या काळात पर्यावरण शुद्ध आणि स्वच्छ झाले याचाच दुसरा अर्थ असा की पर्यावरणाच्या असंतुलनाला, बिघडण्याला आम्हीच जबाबदार आहोत. लोक लॉकडाऊन संपण्याची प्रतीक्षा करीत आहेत. चौथ्या लॉकडाऊनचा आज 31 मे रोजी शेवटचा दिवस आहे. पाचवा लॉकडाऊन लागतो की आपल्याला पुन्हा आधीसारखी मोकळीक मिळते, याची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. लॉकडाऊन कायम राहो अथवा हटवला जावो, आपल्याला सगळ्यांना येत्या काळात अधिक सतर्क, सावध राहायचे आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाला तरीही भौतिक दुरत्वाचा, साबणाने हात धुण्याचा नियम कटाक्षाने पाळायचाच आहे. त्याला पर्याय नाही. आपण सुरक्षित तर आपले कुटुंब सुरक्षित, आपला समाज आणि आपला देश सुरक्षित राहील, हे लक्षात घेतले पाहिजे. कोरोनाने आपल्या जीवनात दहशत निर्माण केली असली तरी एक शिस्तही सगळ्यांना लावली आहे. ही शिस्त पुढेही पाळली तर त्यात आपले आणि आपल्या देशाचे हित आहे. त्यामुळे या आपत्तीचे इष्टापत्तीत, संधीत कसे रूपांतर करता येईल, यादृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचे आहेत.
 
 
पर्यावरणाचा समतोल राखला गेला तर पावसाचे जे चक्र आहे ते संतुलित राहील. पण, दुर्दैवाने गेल्या काही वर्षांत पावसाचे चक्र असंतुलित झाले आहे. ऋतुमान बदलल्याने पाऊस केव्हाही पडतो. शेती आणि शेतकर्यांचे पर्यायाने संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान करतो. पावसाचा लहरीपणा वाढल्याने शेतीची उत्पादकताही अनिश्र्चित झाली आहे. कधी प्रचंड उत्पादन होते तर कधी अत्यल्प. दोन्ही प्रसंगात नुकसान होते ते शेतकर्यांचेच. दरवर्षी आपण हे अनुभवत आहोत. हे कधीतरी थांबले पाहिजे असे प्रत्येकाला वाटते. कधी थांबणार, याची आपल्याला प्रतीक्षा आहे. पण, कसे थांबवायचे, यावर कुणी काही बोलायला तयार नाही, कृती करायला तयार नाही. जगातील अनेक देशांमध्ये आज पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. या समस्येतून बाहेर कसे निघावे अशी चिंता आताच सतावू लागली आहे. कदाचित तिसरे महायुद्ध पाण्यावरून होईल असे भाकित फार पूर्वी करण्यात आले आहे. सगळी परिस्थिती लक्षात घेतली तर संकट गंभीर आहे याचा आपणही आता गांभीर्याने विचार केला पाहिजे. पाच जूनला पर्यावरण दिन साजरा केला म्हणजे झाले पर्यावरण संरक्षण, असे समजण्याचे काही कारण नाही. पर्यावरण दिनी आपण कुठे वृक्षारोपण करतोे, तर कुठे प्लॅस्टिक गोळा करण्याचा कार्यक‘म करतो. पर्यावरण दिनानिमित्त व्याख्यानेही आयोजित करतो. काही ठिकाणी पर्यावरण दिंड्या काढतो. पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृती करतो. जागतिक पर्यावरणाला असलेले धोके अधोरेखित करतो. पर्यावरण वाचविण्यासाठी काय केले पाहिजे याबाबत मार्गदर्शनही करतोे. गेल्या कित्येक वर्षांपासून दरवर्षी हेच केले जाते. पण, प्रत्यक्षात कृती करताना कोणी दिसत नाही.
 
 
दरवर्षी 5 जून येतो आणि आपण पर्यावरण दिन साजरा करून पुढच्या कामाला लागतो. 6 जूनपासूनच आपल्याला पर्यावरणाचा विसर पडतो. प्रत्येक जण पर्यावरण संरक्षणाबद्दल बोलत असतो. अगदी गंभीरपणे बोलत असतो. आपण झाडे लावली पाहिजेत, ती जगवली पाहिजेत, जलसंवर्धन केले पाहिजे असं सगळेच बोलतात. तिसरे जागतिक युद्ध हे पाण्यासाठी होईल, असे भाकीत करण्यात आले तेव्हा त्याची टिंगलटवाळी करण्यात आली होती. परंतु, आजची परिस्थिती लक्षात घेतली तर हे भाकीत खरे ठरू शकते असे चित्र नाही का? भविष्यात पर्यावरण संरक्षणासोबतच पाणी हा प्रश्र्नही फार महत्त्वाचा राहणार आहे. कारण, पाण्याशिवाय पर्यावरण ही कल्पनाही केली जाऊ शकत नाही. गेली काही वर्षे आपण सगळेच वातावरणातील बदल अनुभवतो आहोत. पावसाळ्यात पाऊस पडत नाही, उन्हाळ्यात जरा जास्तच उन्ह तापतं आणि हिवाळ्यात अनेकदा थंडीच पडत नाही. पावसाळ्यात कमी पडणारा पाऊस गरज नसताना दुसर्या ऋतूत पडतो. त्यामुळे पिकांची नासाडी होते. अन्नधान्याच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. हवामानात झालेला बदल हा आता केवळ भारताच्या चिंतेचा विषय राहिलेला नाही. संपूर्ण जगाला याचा फटका बसलेला असल्याने हा जागतिक चिंतेचा मुद्दा बनला आहे. भारताने 2015 साली सर्वाधिक भीषण उन्हाळा अनुभवला. देशाच्या विविध भागात तापमानाच्या आकड्यांचे नवनवे विक्रम नोंदविले गेले. यंदा उन्ह उशिरा तापले. पण, 25 मे पासूनचे तापमानाचे आकडे तपासले तर गांभीर्य आपल्या सहज लक्षात येईल. दोनतीन वर्षांपूर्वी आंध्र आणि तेलंगणात तर दोन हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू हा उन्हामुळे झाला होता. उष्माघाताने देशाच्या अन्य भागातही लोक मृत्युमुखी पडले होते. वातावरणातील हा मोठा बदल आपल्याला म्हणजे मानवजातीला काहीतरी संकेत देण्याचा प्रयत्न करीत आहे. पण, तो संकेत समजून घेण्याची आपली तयारी नाही असे समजावे लागेल किंवा मग त्या संकेताचा अर्थ समजून घेण्याची आपली कुवत नाही असे म्हणावे लागेल. नेपाळमध्ये विनाशकारी भूकंप आला, त्यात आठदहा हजार लोकांचा मृत्यू झाला होता. या भूकंपात नेपाळ उद्ध्वस्त झाले होते. जनजीवन उद्ध्वस्त झाले होते. तिथे जी हानी झाली होती, त्यामुळे नेपाळ किमान 25 वर्षे मागे गेले. भूगर्भात ज्या हालचाली सुरू आहेत, त्या वेगळे संकेत देत आहेत.
 
 
या भूतलावर हवामानात झालेल्या बदलांचा संकेत समजून घेणे आवश्यक आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. पृथ्वीच्या जन्मापासून तर आजपर्यंत जे बदल झाले आहेत, त्यांचा तुलनात्मक अभ्यास करून आताचे बदल काय संकेत देत आहेत, ते जाणून घ्यावे आणि योग्य त्या उपाययोजना कराव्यात. जगभरातील शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन असा अभ्यास केला तर त्याचा ठोस लाभ जागतिक समुदायाला होऊ शकतो. पृथ्वी आणि पृथ्वीवर निर्माण झालेली मानववस्ती ही तशी निसर्गाची जटिल समस्या झाली आहे. निसर्गाच्या कोट्यवधी वर्षांच्या तपस्येमुळेच आज या भूतलावर जीवन टिकू शकले, हे मान्य करावे लागेल. आज पृथ्वीवर जे जीवन दिसते आहे, त्याचे श्रेय निसर्गाला म्हणजेच सृष्टीला आहे. निसर्गाने आपल्याला सगळे काही दिले असतानाही आपले समाधान झाले नाही. आपली हाव अधिकच वाढत गेली आणि दिवसेंदिवस ती वाढतच चालली आहे. निसर्गाचे अतिरिक्त दोहन करून एकप्रकारे मानवाने निसर्गावर अन्यायच केला आहे आणि या अन्यायाचे परिणाम आता माणसालाच भोगावे लागणार आहेत. पृथ्वीचे जे आवरण आहे त्यालाच आपण पर्यावरण असे म्हणतो. हे पर्यावरण निसर्गाने आश्रयाच्या रुपात प्राणीजगताला जीवनासाठी भेट दिले आहे. याबदल्यात निसर्गाचे मानवाकडे काहीच मागणे नव्हते. अपेक्षा एवढीच होती की निसर्गाच्या संवेदना आणि सीमा सुरक्षित ठेवल्या जाव्या. निसर्गाची ही अपेक्षाही स्वत:साठी नव्हतीच मुळी. निसर्गाने तर मानवी जीवन सुरक्षित राहावे असेच चिंतन केले होते. पण मानवालाच ही गोष्ट कळली नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. पर्यावरण संरक्षण ही आपल्या हातातली गोष्ट आहे. प्लॅस्टिकचा वापर करू नये, झाडे जास्तीत जास्त लावावीत, भूगर्भातील पाण्याचा साठा वाढवावा, भूगर्भावर पाणीसाठे तयार करून दैनंदिन कामांसाठी ते पाणी वापरावे असे अनेक उपाय आपण केले तर त्याचा लाभ आपल्यालाच मिळणार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
(लेखक हे महाराष्ट्राचे माजी अर्थ-नियोजन आणि वन मंत्री आहेत)