यंदा सरासरीच्या 102 टक्के पाऊस!

    दिनांक :01-Jun-2020
|
- केरळात मान्सून दाखल 
- मुंबई किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका
 
नवी दिल्ली/मुंबई, 
नैर्ऋत्य मान्सून केरळात दाखल झाला असल्याची घोषणा भारतीय हवामान खात्याने आज सोमवारी केली. यावर्षी सरासरीच्या 102 टक्के पाऊस पडेल, असा अंदाजही या विभागाने व्यक्त केला. सोबतच, अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा भीषण चक्रीवादळाचे रूप धारण करीत असून, उद्या मंगळवारी सायंकाळपर्यंत तो मुंबईच्या किनारपट्टीला धडक देणार आहे, असा इशाराही हवामान खात्याने दिला.
 
 
 
rainfall_1  H x
 
आज सकाळी मान्सून केरळा दाखल झाला. सलग तीन दिवसांपासून केरळच्या किनारपट्‌टी भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसला. त्याचे निकष तपासून पाहण्यात आल्यानंतर मान्सूनसंदर्भातील घोषणा करण्यात आली, असे हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी आज जाहीर केले.
 
 
यावर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात सरासरीच्या 102 टक्के पाऊस पडेल, असा समाधानकारक अंदाजही मोहपात्रा यांनी व्यक्त केला आहे.
 
महाराष्ट्रात सर्वदूर मान्सूनपूर्व सरी
राज्यात सर्वदूर मान्सूनपूर्व सरी कोसळत असून, अनेक भागांमध्ये वादळी वारे आणि गारपिटीसह पाऊस होत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, त्याच्या प्रभावाने रविवारपासूनच राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे.
 
 
तीन दिवस मुसळधार पावसाचे
हवामान खात्याने, राज्यातील पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचे राहणार असल्याचे म्हटले आहे. 2 जून रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. याशिवाय 3 आणि 4 जूनला उत्तर कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातही वादळी वार्‍यासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, िंसधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते.
 
चक्रीवादळाचे नाव ‘निसर्ग’
या कमी दाबाच्या पट्ट्यापासून तयार होणार्‍या चक्रीवादळाचे ‘निसर्ग’ असे नामकरण करण्यात आले आहे. ते उत्तर दिशेकडे प्रवास करून, 3 जूनला उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या दिशेने प्रवास करणार आहे. परिणामी किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता आहे.