नियंत्रण रेषेजवळ 13 अतिरेक्यांचा खातमा

    दिनांक :01-Jun-2020
|
- मोठ्या प्रमाणातील घुसखोरीचा प्रयत्न उधळला
 
श्रीनगर,
जम्मू-काश्मीरमध्ये राबवल्या जाणार्‍या दहशतवादविरोधी अभियानाला मोठे यश प्राप्त झाले. सुरक्षा दलाच्या जवानांनी राजौरी जिल्ह्यातील मेंढर आणि पूंछमध्ये झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत गुलाम काश्मिरातून घुसखोरीचा प्रयत्न करणार्‍या 13 सशस्त्र अतिरेक्यांचा आज सोमवारी खातमा केला.
 
 
loc_1  H x W: 0
 
 
राजौरी जिल्ह्यात आज सकाळी तीन अतिरेक्यांना जवानांनी ठार केले, तर नियंत्रण रेषेलाच लागून असलेल्या मेंढर भागात 10 अतिरेक्यांना जवानांनी अचूक टिपले, अशी माहिती लष्करी प्रवक्त्याने दिली. गेल्या 28 मेपासून या सीमेवरून अतिरेक्यांच्या घुसखोरीचे प्रमाण वाढले असल्याने लष्करी जवानांनी व्यापक मोहीम उघडली आहे. या काळात काही अतिरेक्यांना ठार मारण्यात आले, तर काहींना जिवंत पकडण्यात आले.
 
 
आज सकाळी राजौरीत तीन अतिरेक्यांना टिपल्यानंतर मेंढर सेक्टरमधूनही घुसखोरीचा मोठा प्रयत्न झाला. तो हाणून पाडताना जवानांनी 10 अतिरेक्यांचा खातमा केला. या दोन्ही भागांतील गावांमध्ये जवानांनी व्यापक शोधमोहीम राबवली आहे.
 
 
जैशच्या सहा हस्तकांना अटक
 दरम्यान, अमली पदार्थांची आणि शस्त्रास्त्रांची तस्करी करणार्‍या प्रतिबंधित जैश-ए-मोहम्मदच्या सहा हस्तकांच्या मुसक्या सुरक्षा दलाने आवळल्याची माहिती अधिकार्‍यांनी आज दिली. अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी करणार्‍या जैशच्या सहा हस्तकांना बडगाम जिल्ह्यात अटक करण्यात आली. ते पाकिस्तानातील जैशच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या संपर्कात होते. जम्मू-काश्मिरातील सक्रिय अतिरेक्यांना मदत करणे, त्यांना शस्त्रास्त्र पुरवठा करणे आणि अमली पदार्थांच्या तस्करीत हे सहा जण गुंतले होते, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. या हस्तकांबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस, लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाने (सीआरपीएफ) बडगाम जिल्ह्यातील चादूरा येथे संयुक्त कारवाई केल्याची माहिती पोलिस अधिकार्‍याने दिली.
 
 
मुदस्सिर फयाझ, शाबिर गनी, सागर अहमद पोसवाल, इसाक भट, अर्शिद ठोकर, अशी अटक केलेल्या हस्तकांची नावे असून, सहावा हस्तक अल्पवयीन आहे. त्यांच्याकडून आक्षेपार्ह साहित्य, चिनी बनावटीचे पिस्तूल, एक ग्रेनेडसह शस्त्रास्त्र दारुगोळा आणि एक किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे अमली पदार्थांचे तस्कर आणि अतिरेक्यांमधील संबंध उघडकीस आले आहेत, असेही अधिकार्‍याने सांगितले.
 
 
पूंछमध्ये शोधमोहीम सुरू
अतिरेक्यांच्या एका गटाने पूंछ जिल्ह्यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळताच, सुरक्षा दलाने नियंत्रण रेषेजवळील जवळपास सहा वस्त्यांमध्ये शोधमोहीम सुरू केल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. मेंढर तहसीलमधील सहा ते सात वस्त्यांमध्ये ही शोधमोहीम सुरू आहे.