अजयने पुरवली कोरोना रुग्णासाठी मदत

    दिनांक :01-Jun-2020
|
मुंबई, 
सध्या देश कोरोना व्हायरसशी लढा देत आहे. दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. याचा सर्वात मोठा फटका मुंबईला बसलेला दिसतो. शासकीय यंत्रणा यावर नियंत्रण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. मात्र रोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान, अनेक बॉलिवूड स्टार्सनी आर्थिक तसेच आवश्यक ती सर्व मदत केली आहे. अशात काही स्टार असेही आहेत जे समाज सेवा करत असताना त्याचा बोलबाला कुठे होऊ नये याची काळजी घेत आहेत. यातलंच एक नाव म्हणजे अभिनेता अजय देवगणचे.
 

ajay devgan_1  
 
अजयने धारावी झोपडपट्टीतील ७०० कुटुंबियांची जबाबदारी स्वीकारल्याचं आधीच सांगितलं होतं. आता त्याने एक पाऊल पुढे टाकत तिथल्या रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडर आणि व्हेन्टिलेटरची सोय केली आहे. विशेष म्हणजे याबद्दल कोणाला कळू नये याची खबरदारी त्याने घेतली आहे. मुंबई मिररने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, अजयने २०० बेड, ऑक्सिजन सिलेंडर आणि व्हेन्टिलेटरची सोय केली आहे.
 
त्याच्या या मदतीमुळे बीएमसीने अवघ्या १५ दिवसांमध्ये धारावीतील रुग्णांसाठी वेगळं इस्पितळ सुरू केलं आहे. नक्की यासाठी अजयने किती किंमत मोजली ते मात्र कळू शकले नाही. अजय देवगण फिल्म्स फाउण्डेशनच्या वतीने ही मदत करण्यात आली आहे. याच फाउण्डेशनकडून धारावीतील ७०० कुटुंबांना अन्नधान्य देण्याचं काम अजयने केलं होतं.
 
कुठे आहे इस्पितळ-
धारावीतील ४ हजार स्क्वेअर फूटाच्या परिसरात हे इस्पितळ तयार करण्यात आलं आहे. ही जमीन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) आहे. याचा उपयोग याआधी महाराष्ट्र निसर्ग उद्यानाच्या पार्किंगसाठी व्हायचा. पण आता इथे इस्पितळ उभारण्यात आलं आहे. या इस्पितळात फक्त धारावीतील रुग्णांना भरती करण्यात येणार आहे. असं असलं तरी गंभीर रुग्ण या इस्पितळात भरती करण्यात येणार नाहीत.
 
 
जी-उत्तर वॉर्डच्या सहाय्यक मनपा आयुक्त किरण दिघावकर म्हणाले की, 'धारावीतील वाढत्या रुग्णांची संख्या पाहता तिथे एक इस्पितळ तयार करण्याची आवश्यकता जाणवत होती. जेव्हा इथे इस्पितळ तयार होत होतं तेव्हा अजयने आम्हाला संपर्क केला. काही मदत लागली तर नक्की कळवा असंही तो म्हणाला. यावेळी आम्ही त्याला सांगितलं की, २०० बेडसाठी ऑक्सिजन सिलेन्डर आणि पोर्टेबल वेन्टिलेटरची आवश्यकता आहे. त्याने लगेच या सर्व गोष्टींचा खर्च उचलण्याची तयारी दाखवली.'
या इस्पितळात चार डॉक्टर, १२ नर्स आणि २० वॉर्ड बॉय असतील. इस्पितळाशिवाय महाराष्ट्र राष्ट्रीय उद्यानात एक क्वारन्टीन सेन्टरही तयार करण्यात आलं आहे. याशिवाय राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सजवळ एक आयसोलेशन सेन्टरही तयार करण्यात आलं आहे. ३१ मेपर्यंत धारावीत १ हजार ७७१ करोनाचे रुग्ण आढळले असून त्यातील ७१ रुग्णांचा मृत्यू झाला. ही संख्या रोखण्यासाठीच प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण पाऊलं उचलली जात आहेत.