MHT-CET परीक्षांचे केंद्र बदलवून द्या

    दिनांक :01-Jun-2020
|
- अचलपूरच्या विद्यार्थी व पालकांची मागणी 

cet_1  H x W: 0 
 
 
तभा वृत्तसेवा
अचलपूर, 
मुंबई, पुणे, नागपूर व अन्य शहरात असलेले परीक्षांचे केंद्र बदलवून स्थानिक केंद्र देण्याची मागणी एमएचटी-सीईटी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी उपविभागीय अधिकार्‍यांकडे केली आहे.
 
 
राज्यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी 12 वी नंतर होणार्‍या इंजीनिअर व वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा अभ्यास करण्याकरिता आपल्या गावात या अभ्यासाची सोय नसल्यामुळे नागपूर, अकोला, पुणे, मुंबई, नांदेड या शहरामध्ये प्रवेश घेतला होता, म्हणून विद्यार्थ्यांनी याच शहरांमध्ये परीक्षेचे सेंटर घेतले होते. परंतु, अचानक कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थी या विविध शहरातून आपआपल्या गावी परत आले व आता ही शहरे रेड झोन झाल्यामुळे परीक्षेला जाणे शक्य नाही. ही अडचण लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या अखत्यारित येणार्‍या जेईई इंजिनिअर, नीट वैद्यकीय परीक्षा यांचे सेंटर बदलवून देण्यात आले. याच धरतीवर महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारित येणार्‍या परीक्षांचेही सेंटर बदलून मिळतील, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा होती. परंतु याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. महत्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांनी आपल्या भाड्याने घेतलेल्या खोल्यासुद्धा सोडल्या आहेत. त्यामुळे रेड झोन असलेल्या शहरात कसे जावे, केव्हा जावे, आदी गंभीर प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाले आहेत. एकट्या अचलपूर तालुक्यात जवळपास 300 विद्यार्थी एमएचटी -सीईटी परीक्षेला बसलेले आहेत. या सर्व पालकांनी सोमवार, 1 जून रोजी उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्याकडे निवेदन दिले. पालक संजय सुरजुसे, सुरेंद्र घाटे, राजू पाळेकर, सरोया आदी यावेळी उपस्थित होते.
 
 
राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने तालुका स्तरावर एमएचटी -सीईटीचे परीक्षा केंद्र द्यावे, म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाचा धोका टळू शकेल व त्यांची मुख्यत: सोय होईल. विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकार नियम बदलवू शकते तर राज्य सरकार का नाही, असा सवाल पालक संजय सुरजुसे यांनी केला आहे.