विलगीकरण कक्षात आढळला कोरोना रुग्ण

    दिनांक :01-Jun-2020
|
- काकडा येथे दहशतीचे वातावरण 

janabai _1  H x 
 
 
तभा वृत्तसेवा
पथ्रोट, 
अचलपूर तालुक्यातील पथ्रोट प्रा. आरोग्य केंद्र व पोलिस ठाण्याअंतर्गत परसापूरनंतर काकडा येथेही कोरोना रुग्ण सापडल्याने नागरिकात दहशत पसरली असून प्रशासनासह आरोग्य विभाग काकडा येथे दाखल झाले.
 
 
प्राप्त माहतीनुसार सदरर्हु व्यक्ती आपल्या भावासह 21 मे ला गावात पोहचला असता स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीने त्यास क्वारंटाईन करुन गावातील विलगीकरण कक्षात दाखल केले. 27 ला त्याला ताप आला असता अमरावती येथे पाठवले होते. तेथे थ्रोट स्वॅब घेतला असता कोरोना सकारात्मक अहवाल आल्याने प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. आजपर्यंत काकडा येथे 25 व्यक्ती परराज्यासह मुंबई व पुणे येथून आले असून त्यांचे संस्थात्मक विलगीकरण केले आहे. ज्यांचा अवधी पूर्ण झाला त्याना घरी पाठवले असून 9 जण विलगीकरण कक्षात असल्याची माहिती सरपंचासह ग्रामविकास अधिकारी व्ही. आर. कोठवार यांनी दिली. गावात फेरफटका मारला असता कुठेच ग्रामसफाई नसल्याचे दिसून आले. रुग्णाचा सकारात्मक अहवाल प्राप्त होताच तडकाफडकी गावातील कचरा उचलण्यास सुरवात झाली.
 
 
शिंदी, पथ्रोट येथे काकडा येथून बरेच नागरिक आवागमन करीत असल्याने परिसरातील नागरिक दहशतीत आहे. संपूर्ण पथ्रोट परिसरात शिंंदी येथे स्टेट बँकेची एकच शाखा असल्याने सर्व ग्राहक तेथेच गोळा होत असल्याने याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. तसेच मुंबई किंवा पुणे येथून परतणार्‍यांच्या सक्षम आरोग्य प्रमाणपत्रावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. काकडा येथे गटविकास अधिकारी जयंत बाबरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण शिंदे, डॉ. स्वाती खडसे आपल्या पथकासह दाखल झाले असून तहसीलदार मदन जाधव घटनास्थळी दाखल झाले. काकडा गाव सिल करण्यात आले असून विलगीकरणात असणार्‍यांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालय येथे तपासणीकरिता पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे. पुढील कारवाई काय करणार याकडे सर्व ग्रामवासीयांचे लक्ष लागून आहे.