यवतमाळात संचारबंदी रात्री 9 ते सकाळी 5; काही भाग वगळता प्रतिबंध हटविलेे

    दिनांक :01-Jun-2020
|
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
महाराष्ट्र राज्यात संचारबंदीची मुदत 30 जून 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा दंडाधिकारी यांनी यवतमाळ जिल्ह्याकरिता टाळेबंदीचा कालावधी 30 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत वाढविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच 31 मे 2020 च्या मु‘य सचिवांच्या आदेशातील मार्गदर्शक सूचनेनुसार टाळेबंदीच्या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातील दुकाने व इतर बाबी सुरू ठेवण्याबाबत स्वतंत्र सूचना निर्गमित करण्यात येतील. तोपर्यंत जिल्हाधिकार्‍यांच्या 20 मे 2020 च्या आदेशात नमूद केल्यानुसार दुकाने व इतर बाबी सुरू राहणार आहेत.
 
 
res _1  H x W:
 
जिल्ह्यात आता रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत आहे. या कालावधीत कोणीही विनाकारण बाहेर फिरू नये. मात्र यामधून अत्यावश्यक सेवेकरिता नेमण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी यांना व वैद्यकीय कारणास्तव रुग्ण व त्यांच्यासोबत असलेले नातेवाईक यांना मुभा राहील. या वेळेत विनाकारण फिरणार्‍या व्यक्तींच्या विरोधात कलम 144 अन्वये कारवाई करण्यात येईल. तसेच घराच्या बाहेर पडताना मास्कचा वापर व सामाजिक अंतर नियमाचे काटेकोरपणे पालन करावे. दुकानात एकाच वेळी पाचपेक्षा जास्त व्यक्ती राहणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. असे आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच घरातील 60 वर्षांवरील व्यक्ती आणि 10 वर्षांखालील मुलांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी देवेंद्र िंसह यांनी केले आहे.
 
 
 
वरील आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रकि‘या संहिता 1973 चे कलम 144 आणि भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधित कायदे आणि नियमांनुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशात नमूद आहे.
नेर आणि धानोरासुद्धा प्रतिबंधमुक्त
यवतमाळ शहरातील इंदिरानगर येथे कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर येथील नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. शहरातील इतर भागात हा संसर्ग होऊ नये, यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने 9 एप्रिल 2020 च्या आदेशान्वये या भागाच्या 3 किमी परिघीय क्षेत्राच्या सीमा बंद केल्या होत्या. आता मात्र इंदिरानगरचा काही भाग वगळता बहुतांश भागातील प्रतिबंध काढण्यात आले आहेत.
 
 
शहरातील इंदिरानगर परिसरात शेवटचा कोरोना संक‘मणाचा रुग्ण बुधवार, 20 मे 2020 रोजी आढळला आहे. हे क्षेत्र प्रतिबंधित असल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे. शहरातील इंदिरानगर परिसर मोठा आहे. 20 मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या घराशेजारील भाग प्रतिबंधित ठेवण्यात आला आहे. यात इंदिरानगर मशीद चौक ते नेहा प्रोव्हिजनपर्यंत, नेहा प्रोव्हिजन ते हनुमंत कटरे यांच्या घरापर्यंत, कटरे यांचे घर ते आरीफ किराणा पर्यंतचा परिसर वगळून इंदिरानगर येथील उर्वरित भागाच्या सीमा 1 जूनपासून प्रतिबंधमुक्त करण्यात आल्या आहेत.
 
 
तसेच नेर येथील वलीसाहब नगर प्रोफेसर कॉलनी प्रतिबंधीत क्षेत्रातून कोरोना संसर्गाचे नवीन रुग्ण आढळून आलेले नाहीत. त्यामुळे त्या भागाच्या सीमा बंद ठेवण्याची आवश्यकता नसल्यामुळे नेर येथील या भागाच्या बंद करण्यात आलेल्या सीमासुद्धा मुक्त करण्यात आल्या आहे. तसेच उमरखेड तालुक्यातील धानोरा या प्रतिबंधित क्षेत्रातसुद्धा कोरोनाचे नवीन रुग्ण आढळलेले नाही. त्यामुळे धानोरा या गावाच्या बंद करण्यात आलेल्या सीमा सोमवारपासून प्रतिबंधमुक्त करण्याचे आदेश आहेत. या तीनही क्षेत्रांतून प्रतिबंध काढण्यात आले असले तरी या भागांमध्ये नागरिकांची आरोग्य तपासणी आणि फिवर क्लिनिक पुढील आदेशापर्यंत सुरू राहणार असल्याचे आदेशात नमूद आहे.