अखेर ट्रॅपमध्ये अडकलेल्या बिबट्याचा मृत्यू

    दिनांक :01-Jun-2020
|
- वनविभागाची दिरंगाई की अपयश? 
 
bibtya_1  H x W
 
 
तभा वृत्तसेवा
धारणी, 
सिपना वन्यजीव विभागाच्या देखरेखीत असलेल्या बिबट्याचा सोमवारी पहाटेच्या वेळी मृत्यू झाल्याने टी.टी.सी. व उपवन संरक्षक शिवबाला एस. यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत परतवाड्यावर मृत बिबट्यावर अग्निसंस्कार करण्यात आले.
 
 
मेळघाटच्या सीमेवर वसलेल्या खैरी गाव शिवारातून 25 एप्रिल रोजी हा बिबट जंगलात जखमी अवस्थेत सापडलेला होता. मध्यप्रदेश बनावटीच्या लोखंडी ट्रॅपमध्ये हा बिबट्या अडकलेला होता. हा ट्रॅप शिकार्‍यांनीच लावल्याचेही उघड झाले होते. या बिबट्याला वनविभाग व वन्यजीव विभागाने सुरक्षितपणे पकडून परतवाडा येथील सिपना वन्यजीव विभागाच्या ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर ( टी. टी. सी.) मध्ये ठेवले होते. 36 दिवसापर्यंत शिवबाला एस. यांच्या देखरेखीत बिबट्यावर औषधोपचार करण्यात आले. मात्र, सोमवार, 1 जून रोजी पहाटेच्या वेळी त्याचा मृत्यू झाला. या बिबट्याला दोन दिवसांपासून ताप होता. त्यामुळे पशु वैद्यकीय अधिकार्‍याच्या नेतृत्वात एक विशेष पथक दिमतीला होते. सिपनाचे उपवन संरक्षक, परिक्षेत्र अधिकारी, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय घटाळे, डीएफओ अविनाश कुमार यांच्यासह अनेक अधिकार्‍यांच्या उपस्थितीत दुपारी बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
 
एका माहितीनुसार, अडीच ते तीन वर्ष वयोगटातील हा बिबट टीटीसी मध्ये अनेक वेळा अस्वस्थ झाला होता. सुरूवातीला त्याने अनेक वेळा काहीच खालले नव्हते. 36 दिवसांत सहा वेळा त्याचा आजार बळावला होता. तरीही शिवबाला यांनी या बिबट्याला नागपूरला न पाठविता परतवाड्यातच ठेवले. अखेर त्याचा मृत्यू झाला. बिबट्याचे खाणेपिणे बंद झाले तेव्हाच त्याला पुढील उपचारासाठी नागपूरला पाठवायला पाहिजे होते. आता मुख्य आरोपी आत्माराम भोसले या मृत्यूसाठी जबाबदार आहे की, सतत 36 दिवस ज्यांच्या देखरेखीत तो होता, ते जबाबदार आहेत, असा प्रश्‍न नव्याने निर्माण झाले आहे.