जाणून घ्या! नागपुरात काय सुरु होणार, काय बंद राहणार?

    दिनांक :01-Jun-2020
|
- मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश
- प्रतिबंधित क्षेत्रात पूर्वीप्रमाणेच नियम 

tukaram mundhe_1 &nb 
 
 
नागपूर, 
केंद्र शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनलॉक घोषित केल्यानंतर राज्य शासनाने काही नवीन नियम लागू केले. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत राज्य शासनाने काढलेले आदेश नागपूर महानगरपालिकेने कायम ठेवले असून प्रतिबंधित क्षेत्र वगळता तीन टप्प्यात काही गोष्टींमध्ये शिथिलता देण्यात येणार आहे. 3 जूनपासून हे आदेश लागू होणार असून नागपुरात 30 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम राहतील.
 
 
नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 1 जून रोजी जाहीर केलेल्या आदेशानुसार, 3 जून पासून नागपूर शहरात काही गोष्टींमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. हे करताना नागरिकांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या कोव्हिड-19 संदर्भातील सर्व दिशा-निर्देशांचे पालन करायचे आहे. ‘मिशन बिगीन अगेन’चा प्रारंभ होत आहे.
 
 
पहिला टप्प्यात हे सुरू होतील
  • सायकलिंग, जॉगिंग, धावणं, चालणं यासाठी सार्वजनिक ठिकाणी, बगीचांमध्ये, खाजगी मैदानांवर, सोसायटी तसंच संस्थात्मक मैदानांवर, बगीचे या ठिकाणी सकाळी 5 ते 7 या वेळेत परवानगी. मात्र इन्डोअर स्टेडियम किंवा बंदिस्त ठिकाणी यापैकी कशालाही परवानगी नाही.
  • कोणत्याही प्रकारे एकत्र येऊन व्यायाम, जॉगिंग, सायकलिंग अशा कोणत्याही उपक्रमाला परवानगी नाही.
  • प्लंबर, इलेक्ट्रिशिअन, पेस्ट कंट्रोल, तंत्रज्ञ यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून काम करण्याची परवानगी
  • गॅरेज तसंच वर्कशॉप यांना अपॉइंटमेंट पद्धतीने काम करण्याची परवानगी
  • सर्व सरकारी कार्यालयांमध्ये 15 टक्के कर्मचारी वर्ग अथवा 15 कर्मचारी यापैकी जे अधिक असेल अशा उपस्थितीत कार्य सुरू करता येईल.
5 जूनच्या दुसर्‍या टप्प्यात हे सुरू होतील
  • सर्व मार्केट, दुकानं यांना सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत परवानगी. मात्र शॉपिंग मॉल आणि मार्केट संकुलं यांना समविषम पद्धतीने उघडण्यास परवानगी.
  • कपड्यांच्या दुकानांमध्ये ट्रायल रुमची व्यवस्था उपलब्ध असणार नाही. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच खरेदी केलेली वस्तू परत घेण्याची व्यवस्था अंमलात असणार नाही.
  • सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जातील याची जबाबदारी संबंधित दुकानदाराची असेल. त्याकरता फूट मार्किंगसारखी व्यवस्था करावी.
  • लोकांनी जवळच्या मार्केटमध्ये चालत किंवा सायकलवर जाऊन खरेदी करावी. मोटाराईज्ड गाड्यांद्वारे शॉपिंग करण्याला अनुमती नाही.
  • सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नसल्याचं प्रशासनाच्या लक्षात आल्यास ते दुकान तात्काळ बंद करण्यात येईल.
  • वाहनांमध्ये खालील पद्धतीने लोकांची ने-आण करता येईल (टॅक्सी तसंच कॅब- 1+2, रिक्षा-1+2, चारचाकी- 1+2, दुचाकी- केवळ एका व्यक्तीला जाण्यायेण्याची परवानगी )
टप्पा तीनची सुरुवात 8 जूनपासून
खाजगी ऑफिसेस 10 टक्के उपस्थितीत सुरू राहू शकतात. सर्व कर्मचार्‍यांना स्वच्छतेसंदर्भात माहिती देणं अनिवार्य राहील. या आदेशानुसार परवानगी असलेल्या बाबींना पुन्हा वेगळ्या परवानगीची गरज नाही.
हे पाळणे अनिवार्य
  • सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी आणि प्रवासादरम्यान मास्क घालणं बंधनकारक
  • सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग म्हणजेच सहा फूटांचं अंतर पाळणं आवश्यक
  • लग्नासाठी 50 हून अधिक लोकांना परवानगी नाही
  • अंत्यसंस्कार विधींसाठी 20 हून अधिक लोकांना परवानगी नाही
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकणं हा गुन्हा असेल.
  • सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखू यांच्या सेवनावर प्रतिबंध
  • ज्यांना शक्य आहे त्यांनी ’वर्क फ्रॉम होम’ करावं. कार्यालयं, कामाच्या ठिकाणी, शॉप, मार्केट, औद्योगिक केंद् याठिकाणी गर्दी किंवा एकत्र येण्यास मनाई
  • कामाच्या ठिकाणी नियमितपणे सॅनिटायझेशन करणं अनिवार्य. डोअर हँडल्ससारख्या सर्वाधिक व्यक्तींचा संपर्क होणार्‍या ठिकाणी नियमित स्वच्छता
  • कामावर असणार्‍या लोकांनी एकमेकांदरम्यान, लंचब्रेकदरम्यानही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणं आवश्यक
कोणत्या गोष्टी बंद राहतील?
  • शाळा, महाविद्यालयं, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास
  • आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक
  • मेट्रो रेल्वे
  • ट्रेन्सची नियमित वाहतूक
  • सिनेमाघरं, जिम, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, थिएटर, बार आणि ऑडिटोरियम, असेंब्ली हॉल आणि तत्सम ठिकाणं.
  • कोणत्याही स्वरुपाचा सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, अभ्यासविषयक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम
  • विविध धर्मियांची प्रार्थनास्थळे
  • सलून, स्पा, ब्युटी पार्लर
  • शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट तसंच अन्य हॉस्पिटॅलिटी केंद्र
  • सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन कोणताही कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी नाही.

रात्री 9 ते 5 पर्यंत संचारबंदी
या संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात काही गोष्टींना शिथिलता देण्यात आली असली तरी रात्री 9 ते सकाळी 5 या काळात अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त पूर्णपणे संचारबंदी लागू राहील. 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता आणि 10 वर्षांखालील मुले यांनी अत्यावश्यक कार्य अथवा वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त बाहेर पडू नये, घरातच राहावे, असेही आदेशात नमूद केले आहे.नागपूर शहरातील प्रतिबंधित भागात जीवनावश्यक वस्तूंशिवाय अथवा सेवांव्यतिरिक्त काहीही सुरू ठेवण्यास परवानगी नाही.