साधेपणाने आयोजित करणार जगन्नाथ रथयात्रा

    दिनांक :01-Jun-2020
|
अहमदाबाद,
गुजरातच्या अहमदाबादमध्ये गेल्या 143 वर्षांपासून निघणारी जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ रथयात्रा यंदा कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे अतिशय साधेपणाने निघणार आहे. दरवर्षी रथयात्रेत मोठ्या प्रमाणात चित्ररथ सहभागी होतात. तसेच भाविकांचीही प्रचंड गर्दी असते. मात्र, यंदा लोकांचा सहभाग या रथयात्रेत राहणार नाही.
 

jagannath_1  H  
 
‘आषाढी बीज’च्या अनुषंगाने मंदिरातील विश्वस्त आणि पुजारी यांच्या उपस्थितीत केवळ तीन रथ बाहेर काढले जातील व त्यांना प्रत्येकी 30 भाविक ओढून नेतील, असे मंदिराचे विश्वस्त महेंद्र झा यांनी सांगितले. 143 वर्षांच्या इतिहासात प्रथमच केवळ तीन रथच सहभागी होणार आहेत. कोरोना विषाणू महामारीमुळे भक्त, आखाडे, गायक, भजनी मंडळी, देखावे घेऊन जाणारे ट्रक यांचा समावेश राहणार नाही. अतिशय साधेपणाने रथयात्रा निघेल, असे झा यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. लोकांनी घरीच बसून रथयात्रेचे थेट प्रक्षेपण पाहावे, असेही ते म्हणाले.
 
 
परंपरागत भगवान जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्या रथांची मिरवणूक 400 वर्षे जुन्या मंदिरातून पहाटेपासून सुरू होते आणि संध्याकाळी उशिरा परत येते. मार्गात प्रचंड संख्येने भाविक रथयात्रेचे स्वागत करतात. सुशोभित हत्ती, विविध चित्ररथ, गायक, आखाडे यांच्यासह 100 ट्रक यात सहभागी होतात.