कोरोनानंतरचे जीवन वेगळे असेल

    दिनांक :01-Jun-2020
|
- पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन
 
नवी दिल्ली,
कोरोनाविरोधात लढा सुरू करण्यापूर्वीचे जीवन आणि कोरोनानंतरचे जीवन अतिशय वेगळे राहणार आहे. यापुढे जगातील सर्वच देशांना आरोग्य क्षेत्रावर विशेष भर द्यावा लागणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी केले.
 
 
modi_1  H x W:
 
बंगळुरू येथील राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाला मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी कोरोनामुळे जगभरात निर्माण झालेल्या संकटावर गंभीर चिंता व्यक्त केली. दुसर्‍या महायुद्धानंतर जगावर आलेले हे सर्वांत मोठे संकट आहे. महायुद्धानंतर जसे जग बदलले होते, तसेच कोरोनानंतर जग पूर्णपणे बदललेले असेल, असे ते म्हणाले.
 
 
यापुढे आरोग्य हेच प्राधान्याचे क्षेत्र ठरणार आहे. यासाठी आपण इतर कोणत्याही देशावर अवलंबून राहणे परवडणारे ठरणार नाही. स्वदेशी औषधे, स्वदेशी आरोग्य सेवा आणि इतर स्वदेशी उपकरणांवरच भर द्यावा लागणार आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
 
 
अनेक मोठ्या देशांनी एकमेकांवर आपला अधिकार सिद्ध करण्यासाठी अत्याधुनिक शस्त्र व अस्त्रांची निर्मिती केली, पण कोरोनाच्या संकटात संपूर्ण जग आज फक्त डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी आणि वैज्ञानिक समुदायाकडे मोठ्या अपेक्षेने पाहात आहे. आपली शस्त्रे व अस्त्रे कोरोनापुढे विफल ठरली, हे त्यांना समजले. त्यामुळे आता संपूर्ण जगाने मानवतेवर आधारित विकासाच्या क्षेत्रात एकत्र यायला हवे. जागतिक आरोग्य क्षेत्र कसे मजबूत होईल, कोरोनासारख्या अचानक येणार्‍या संकटावर तातडीने मात कशी केली जाईल, याकडे आपले लक्ष केंद्रित करावे लागणार आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
 
 
आरोग्य कर्मचार्‍यांवरील हल्ले मान्य नाही. डॉक्टर आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी हे वर्दी नसलेले सैनिकच आहेत. त्यांच्यावर हल्ला कदापि मान्य केला जाणार नाही, असा इशारा पंतप्रधानांनी दिला. कोरोनाविरूद्धच्या युद्धात भारत नक्कीच िंजकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.