मारुती सुझुकीला फटका; विक्रीत 86 टक्के घसरण

    दिनांक :01-Jun-2020
|
नवी दिल्ली,
कोरोना विषाणूचा उद्रेक आणि लॉकडाऊनचा फटका ऑटोमोबाईल क्षेत्राला बसला आहे. पण कंपन्यांनी पुन्हा एकदा व्यवसाय सुरू केला आहे. देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुतीनेही 12 मेपासून काम सुरू केले आहे. पण, मारुती सुझुकी इंडियाला मोठा झटका बसला आहे. कंपनीच्या मे महिन्याच्या विक्रीमध्ये 86 टक्के घसरणीची नोंद झाली आहे. मेमध्ये मारुती सुझुकीने 18,539 युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात कंपनीने 1,34,641 युनिट्सची विक्री केली होती.
 
 

maruti suzuki_1 &nbs
 
खाजगी कारच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता
कंपनीने गेल्या महिन्यात 4651 वाहनांची निर्यात केली होती. तर मे 2019 च्या तुलनेत ही विक्री 48.82 टक्के कमी आहे. कंपनीने 12 मेपासून मानेसरमध्ये तर 18 मेपासून गुडगावमध्ये, सरकारी नियमांचे पालन करीत वाहन निर्मितीचे काम सुरू केले. 25 मेपासून गुजरातमध्ये उत्पादन सुरू करण्यात आले. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र आणि राज्य सरकारच्या गाईडलाईन्सनुसार, शहरांतील विविध शोरूमही टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यात येत आहेत.
 
 
देशातील अनेक कंपन्या ऑनलाईनच कारची विक्री करीत आहेत. ज्या लोकांना मारुती सुझुकीची कार खरेदी करायची आहे, त्यांना कंपनीच्या वेबसाईटवरून कारची नोंदणी करता येऊ शकते. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरच खरेदीचे आवश्यक कागदपत्र जमा करता येणार आहेत. त्यानंतर कंपनी जवळच्या डीलरच्या माध्यमातून कार घरी पोहोचवून देईल. कार घरी पोहचविण्यावेळी कारच्या सॅनिटायझेशनची काळजी घेण्यात येत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.