खेळाडूंनी कामगिरी उंचाविण्यात हे व्यायाम करा; फायदा नक्की होईल

    दिनांक :01-Jun-2020
|
- डॉ. केविन अग्रवाल यांचे प्रतिपादन 
 
kevin _1  H x W
 
 
नागपूर,
खेळाडूंनी नेहमीचा सराव करतांना आणि प्रत्येक स्पर्धेच्या वेळीही उष्मीकरण आणि शिथलीकरण व्यायाम व्यवस्थितपणे करावेत. प्रशिक्षकांनी व्यक्तीभिन्नतेच्या आधारावर विशिष्ठ खेळात त्या खेळाडूंचे स्थान काय आहे यावरुन त्याचे उष्मीकरण आणि शिथलीकरण व्यायामाचे नियोजन करावे. सर्वच खेळाडूंना एक सारखेच उष्मीकरण आणि शिथलीकरण व्यायाम देवू नये. आहारामतील कमतरता, थकवा न जाता परत सराव करणे, झोप व्यवस्थीत न होणे, चुकीच्या पद्धतीने खेळणे, सरावातील व्यायामाची वारंवारिता अनावश्यक वाढविणे, वयापेक्षा जास्त अधिभाराचे प्रशिक्षण घेणे आदी कारणांमुळे खेळाडूंना दुखापती होवू शकतात असे प्रतिपादन डॉ. केविन अग्रवाल यांनी केले.
 
 
क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग, रातुम नागपूर विद्यापीठाच्या वतीने आयोजित मेकिंग ऑफ चॅम्पियन्स या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादात वेबीनारच्या चौथ्या दिवशी ते बोलत होते.
 
 
यावेळी पुढे बोलतांना डॉ. अग्रवाल म्हणाले, दुखापत झाल्यास प्रशिक्षकांने खेळाडूला खेळण्यास मनाई करावी. त्याला त्वरीत आराम करावयास सांगावा. प्रथमोपचार म्हणून बरफाचा व क्रेप बॅण्डेजचा वापर सुद्धा होवू शकतो. पायाला दुखापत असेल तर पाय उंचावर ठेवावा. मात्र नेहमीच एकाच ठिकाणी स्नायू दुखत असेल तर त्या ठिकाणी गरम पाणी व थंड पाण्याचा वापर करावा. खेळाडूंनी त्याची कामगिरी उंचाविण्यासाठी उष्मीकरण व शिथलीकरण व्यायामासोबतच शरीरात लवचिकता येणारे व्यायाम करावेत. शरीराचे सांधे क्रियाशील राहावेत याकडे लक्ष द्यावे. खेळाच्या अनुरुप आहार घ्यावा. खेळाच्या आवश्यकतेनुसार खेळाडूंचा बुट व इतर खेळण्याचे साहित्य उच्च दर्जाचे असावे. पुरेशी झोप आणि शिथलीकरण व्यायामाच्या शेवटी ध्यान धारणा फायद्याची ठरु शकते. नियमित मसाज शरीराचा थकवा घाविण्यात मोठी मदत करतो असेही त्यांनी सांगितले.
 
 
उद्याला २ जून रोजी क्रीडा आहार तज्ञ डॉ. मेघाना कुमरे यांचे योग्य आहाराद्वारे कामगिरीत सुधारणा या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहे.