चांदीमध्ये तेजी कायम, सोन्याच्या किमतीवर दबाव

    दिनांक :01-Jun-2020
|
-औद्योगिक क्षेत्रातील मागणी वाढल्याचा परिणाम
 
मुंबई, 
सोन्याचा भाव सोमवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (एमसीएक्स) 0.21 टक्क्यांनी घसरला असून, सोन्याचा दर 47 हजार सात रुपये प्रती दहा ग्रॅम आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये तेजी असली तरी देशांतर्गत कमॉडिटी बाजारात सोन्याच्या किमतीवर दबाव असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच, चांदीच्या भावातील तेजी कायम असून, चांदी 50 हजार रुपयांवर गेली आहे.
 
 
silver_1  H x W
 
मागील दोन महिन्यांपासून देशभरात सुरू असलेली टाळेबंदी अर्थात लॉकडाऊन शिथिल करण्याची घोषणा कें द्र सरकारने केली आहे. त्यानुसार अनलॉक-एकमध्ये निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले जाणार आहे. उद्योगधंदे सुरू झाल्याने चांदीची मागणी वाढली असून, आज भावात 0.6 टक्के इतकी वाढ झाली. चांदीचा भाव किलोला 50 हजार 409 रुपये इतका झाला, तर शुक्रवारी 1600 रुपयांची वाढ झाली होती. आज जागतिक बाजारात सोन्याचा भाव 0.4 टक्क्यांनी वाढला. सोन्याचा भाव प्रती औंस 1,733 डॉलर्सपर्यंत पोहोचला. चांदीचा भाव दोन टक्क्यांनी वाढून तो 18 डॉलर्स प्रती औंस झाला आहे.
 
 
दरम्यान, मे महिन्यात एमसीएक्सवर चांदीच्या दरात 23 टक्के वाढ झाली आहे. मागील 12 मे रोजी सोन्याचा भाव 45 हजार 300 रुपये इतका होता. 20 मे रोजी सोने 47 हजार 600 रुपयांच्या उच्चांकी स्तरावर गेले होते. जगातील सर्वात मोठ्या गोल्ड ईटीएफचे व्यवस्थापन करणार्‍या एसपीडीआर गोल्ड ट्रस्टचा ईटीएफ 0.3 टक्क्याने वाढून 1123.14 टनांवर गेला आहे. हा मागील सात वर्षांतील हा नवा उच्चांक मानला जात आहे. औद्योगिक क्षेत्रातील मागणी वाढल्याने चांदीमधील तेजी आणखी काही काळ कायम राहील, अशी माहिती कमॉडिटी विश्लेषक जिगर त्रिवेदी यांनी दिली.