‘त्या’ बिबट्याने केली काळविटाची शिकार

    दिनांक :01-Jun-2020
|
- अचलपूर शेत शिवारातील घटना
- वनविभागा विरोधात संताप 

achalpur_1  H x 
 
 
तभा वृत्तसेवा
अचलपूर,
रविवारी सकाळच्या सुमारास साहेबराव पोटे यांच्या अजितपूर येथील टरबुजाच्या शेतात बिबट्याने काळविटाची शिकार केली. दोन साळींदर व एका काळविटाची शिकार करून सुद्धा पंधरा दिवसात तीन वेळा फक्त पंचनामे करून आणि तो बिबट नरभक्षी नाही एवढे सांगत वनविभागाचे अधिकारी आपले हात झटकत असल्याचे परिसरातील शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.
 
 
गेल्या दोन आठवड्यापासून अचलपूर शेतशिवारात बिबट्याची दहशत निर्माण झालेली आहे. आठ दिवसापूर्वी नगरसेविका सुशीला इंगळे यांच्या केळीच्या शेतात बिबट्याने दोन साळींदरची शिकार केली होती. वन विभागाने त्यावेळी पंचनामा करत नर बिबट्या आहे, कॅमेरे लावावे लागेल, केळीच्या शेतात थंडावा व पाण्याची सोय असल्यामुळे तो भटकला असेल, तो नरभक्षी नाही, अशी कारणे सांगून वेळ निभावून नेली. 31 मे रोजी सकाळच्या वेळी पोटे यांना त्यांच्या टरबुजाच्या शेतात एक काळवीट मृतावस्थेत दिसले. त्यांनी इंगळेच्या मार्फत वनविभागाला सांगितले. वनविभागाने पंचनामा करीत बिबट्यानेच शिकार केली असल्याचे घटनास्थळावरील पुराव्यावरून सांगितले. पंचनामा करण्यास संध्याकाळ झाली असल्याने वरिष्ठांना घटना सांगून कॅमेरे लावण्याचे बघू, असे सांगून कर्मचारी निघून गेले.
 
 
सोमवार, 1 जून रोजी सकाळी पोटे शेतात गेले असता त्या काळविटाचे उर्वरित शरीरही बिबट्याने फस्त केलेले दिसले. वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लावले असते तर नक्कीच ते बिबट दिसले असते. मान्सून आठ दिवसावर येऊन ठेपला आहे. पेरणीपूर्व मशागतीही व्हायच्या आहे, आणि आता बिबट्याची दहशत वाढली असून वन विभागाने त्वरित हालचाल करावी, अन्यथा तो बिबट नरभक्षी झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.