#AtmanirbharBharat : युवकाने शोधला पेट्रोलविरहित दुचाकीचा मार्ग

    दिनांक :01-Jun-2020
|
- आरोग्य आणि पर्यावरणाचे रक्षण
 
 
रुपचंद धारणे
भद्रावती,
आपल्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी अनेक जण विविध उपाय करत असतात. कोणी योगा, प्राणायाम, ‘मॉर्निंग वॉक, इव्हनिंग वॉक’ करतात. तर, कोणी ‘सायकलिंग’ करून व्यायाम करतात. तर कोणी बॅडमिंटन, क्रिकेट, व्हॉलीबॉल खेळून किंवा पेाहण्याचा व्यायाम करून आपल्या शरीराला सुद्दढ ठेवतात. मात्र, भद्रावती येथील एका 37 वर्षीय युवकाने आपल्या आरोग्यासोबतच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी चक्क पेट्रोलविरहित दुचाकीचा वापर करणे पसंत केले.
 
 
येथील गुरुनगर वॉर्डातील रहिवासी युवक नितीन विठ्ठल डोंगरे हे येथील चांदा आयुध निर्माणीमध्ये डी.बी.डब्ल्यू. या पदावर कार्यरत आहे. दहावीचे शिक्षण झाल्यानंतर राजुरा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत त्यांने जोडारी हा व्यवसाय घेवून प्रशिक्षण पूर्ण केला. त्यानंतर चार वर्षांनी चांदा आयुध निर्माणीत नोकरीवर रूजू झाला. त्याचे वडील आयुध निर्माणीतच नोकरीला असल्याने त्यांचे भद्रावतीतच वास्तव्य होते. नोकरीवर रूजू होवून दहा वर्षे झाली. या काळात आयुध निर्माणीत कर्तव्यावर जाताना ते पेट्रोलवर चालणार्‍या दुचाकी वाहनाने जायचे. दरम्यान, अलिकडे ‘अ‍ॅन्ड्राईड मोबाईल’चे फॅड आले. त्यात गुगल, यु-ट्युबवर विविध विषयाची माहिती मिळू लागली. मुळातच काहीतरी नवीन तांत्रिक बाब शोधून नवीन आगळेवेगळे करण्याची प्रवृत्ती असलेल्या नितीनने यु-ट्युबवर बिना पेट्रोलची दुचाकी तयार करता येईल का, याचा शोध घेतला आणि त्यात तो यशस्वीही झाला.
 
atmanirbhar_1
 
 
चार महिन्यापूर्वी त्यांनी चंदीगढ येथून जी. के. कंपनीची रेंजर सायकल ‘ऑनलाईन’ बोलाविली. या सायकलला नितीनने एक 48 व्होल्ट पॉवरची मोटर लावली. या मोटरला उर्जा पुरविण्यासाठी 48 व्होल्टचीच बॅटरी लावली. समोर हॅन्डलला एक्सलेटरचे कनेक्शन दिले. त्यामुळे ती सायकल खर्‍या अर्थाने मोटरसायकल झाली. ही मोटर सायकल बटन दाबली की स्कुटी, मोपेडप्रमाणे धावायला लागते. अशाप्रकारच्या मोटरसायकलने नितीन डोंगरे रोज 14 किलोमीटर अंतर घर ते आयुध निर्माणी जाणे-येणे करतात. त्यात ते रस्त्यात चढ भाग आला, तर मोटरचा वापर करतात. नाही तर ते पायडलचा वापर करतात. 30 किलोमीटर अंतर चालून झाल्यावर ते बॅटरी 4 तासापर्यंत चार्ज करतात. या मोटरसायकलची 350 किलो वजन वाहून नेण्याची क्षमता आहे.
 
 
सर्वप्रथम नितीनने पेट्रोलवर चालणार्‍या दुचाकीला मोटर लावून पेट्रोलविरहित दुचाकी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, जर बॅटरीची चार्जिंग संपली, तर धक्का मारत आणण्याशिवाय पर्याय नाही, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे पायडलची व्यवस्था असलेली सायकल बरी असा विचार करून त्यांनी सायकलवर प्रयोग केला आणि प्रदूषणविरहित मोटर सायकल तयार केली. नितीन रोज याच मोटरसायकलने आयुध निर्माणीत कर्तव्यावर जातात. तसेच शहरात कुठेही जायचे असेल, तर याच मोटरसायकलने जातात. त्यामुळे जवळपास दर महिन्याला येणारा 1500 रुपयांचा पेट्रोल खर्च वाचतो. तसेच बॅटरी चार्ज करायला जास्त वीज लागत नाही. पेट्रोलचा वापर नसल्यामुळे प्रदूषण नाही.
 
 
विशेष म्हणजे, पायडल मारून सायकल चालविल्यामुळे शरीराचा व्यायाम होतो. असे या मोटरसायकलचे फायदे आहेत. ही मोटरसायकल पर्यावरणपुरक असून, ती तयार करण्याकरिता मोटर, एक्सलेटर, कंट्रोलर यांची एक किट विकत घ्यावी लागते. ही मोटरसायकल तयार करण्याकरिता नितीन यांना 40 ते 42 हजारांचा खर्च आला. परदेशात अशाच प्रकारच्या मोटरसायकलचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, असे नितीन यांचे म्हणणे आहे. व्यायामासाठीही या मोटरसायकलचा वापर होत असल्याने नितीन यांची शरीरयष्टी सुदृढ आहे. नितीनला प्रदूषणमुक्त मोटरसायकल तयार करण्यात वडील विठ्ठल डोंगरे व यशवंत तडसे यांनी सहकार्य केले.