काश्मिरात तीन अतिरेक्यांचा खातमा

    दिनांक :01-Jun-2020
|
-जैशच्या सहा हस्तकांना अटक
- पूंछमध्ये शोधमोहीम सुरू
 
श्रीनगर, 
जम्मू-काश्मीरमध्ये राबवल्या जाणार्‍या दहशतवादविरोधी अभियानाला मोठे यश प्राप्त झाले. सुरक्षा दलाने राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये तीन सशस्त्र अतिरेक्यांचा आज सोमवारी खातमा केला. अमली पदार्थांची आणि शस्त्रास्त्रांची तस्करी करणार्‍या प्रतिबंधित जैश-ए-मोहम्मदच्या सहा हस्तकांच्या मुसक्या सुरक्षा दलाने आवळल्याची माहिती अधिकार्‍यांनी आज दिली. पूंछ जिल्ह्यात अतिरेकी दडून बसल्याची माहिती मिळाल्यावर या भागात सुरक्षा दलाने शोधमोहीम सुरू केली आहे.
 
 

militants_1  H  
 
अतिरेक्यांचा एक गट आज पहाटे गुलाम काश्मिरातून कालल गावात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, सजग असलेल्या सुरक्षा दलाने रोखले असता, त्यांनी गोळीबार सुरू केला. यावेळी झडलेल्या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाले.
 
 
अतिरेक्यांच्या एका गटाने पूंछ जिल्ह्यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळताच, सुरक्षा दलाने नियंत्रण रेषेजवळील जवळपास सहा वस्त्यांमध्ये शोधमोहीम सुरू केल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. मेंढर तहसीलमधील सहा ते सात वस्त्यांमध्ये ही शोधमोहीम सुरू आहे.
 
 
अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी करणार्‍या जैशच्या सहा हस्तकांना बडगाम जिल्ह्यात अटक करण्यात आली. ते पाकिस्तानातील जैशच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या संपर्कात होते. जम्मू-काश्मिरातील सक्रिय अतिरेक्यांना मदत करणे, त्यांना शस्त्रास्त्र पुरवठा करणे आणि अमली पदार्थांच्या तस्करीत हे सहा जण गुंतले होते. या हस्तकांबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस, लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाने (सीआरपीएफ) बडगाम जिल्ह्यातील चादूरा येथे संयुक्त कारवाई केल्याची माहिती पोलिस अधिकार्‍याने दिली.
 
 
मुदस्सिर फयाझ, शाबिर गनी, सागर अहमद पोसवाल, इसाक भट, अर्शिद ठोकर, अशी अटक केलेल्या हस्तकांची नावे असून, सहावा हस्तक अल्पवयीन आहे. त्यांच्याकडून आक्षेपार्ह साहित्य, चिनी बनावटीचे पिस्तूल, एक ग्रेनेडसह शस्त्रास्त्र दारुगोळा आणि एक किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे अमली पदार्थांचे तस्कर आणि अतिरेक्यांमधील संबंध उघडकीस आले आहेत, असेही अधिकार्‍याने सांगितले.