कोरोनाचा विषाणू होतोय निष्प्रभ

    दिनांक :01-Jun-2020
|
-इटलीच्या डॉक्टरांचा दिलासादायक निष्कर्ष
रोम,
कोरोनाच्या नवीन विषाणूची शक्ती आणि घातकता दिवसेंदिवस कमी होत असून हा विषाणू हळूहळू निष्प्रभ होत असल्याचा असल्याचा दावा इटलीमधील एका वरिष्ठ डॉक्टरने केला आहे. क्लिनिकली हा विषाणू आता इटलीमध्ये अस्तित्वात नाही, असा दावाही इटलीतील सॅन रफाईल रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर अल्बार्टो झांग्रिलो यांनी केला आहे. 
 
 
italy_1  H x W:
 
 
गेल्या दहा दिवसांमध्ये करण्यात आलेल्या स्वॅब चाचण्यांमध्ये विषाणूचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. हेच प्रमाण एक ते दोन महिन्यांपूर्वी अगदी प्रचंड होते. सध्याच्या स्वॅबमधील विषाणूचे प्रमाण हे तुलनेने खूपच कमी आहे, असा निष्कर्ष समोर आल्याची माहिती अल्बार्टो यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. रविवारी त्यांनी देशातील कोरोना विषाणूच्या वैज्ञानिक घडामोडींसंदर्भात एक मुलाखत दिली. त्यावेळीच त्यांनी कोरोनाचा परिणाम कमी होत असल्याचे दिसून येत आहे असा दिलासा देणारा निष्कर्ष नोंदवला आहे. डॉक्टर अल्बार्टो हे इटलीमधील आघाडीच्या डॉक्टरांपैकी एक मानले जातात. त्यामुळे त्यांनी केलेला हा दावा कोरोनामुळे सध्या भितीचे वातावरण असणाऱ्या देशांमधील नागरिकांसाठी आशादायक आहे.
 
काही आरोग्य तज्ञ कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेसंदर्भाच्या संभाव्यतेबद्दल खूपच गोंधळ आहेत. त्यामुळे राज्यकर्त्यांनीच आता नवीन वास्तव विचारात घेण्याची गरज असल्याचे मतही झांग्रिलो यांनी व्यक्त केले आहे. आम्हाला हळू हळू सर्व काही सुरु करून सामान्य आयुष्य जगाणारा देश बनायचे आहे. मात्र, देशात दहशत निर्माण करण्याची जबाबदारी कुणाला तरी घ्यावी लागेल, अशा शब्दात त्यांनी दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवणाऱ्यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.
 
 
केवळ डॉक्टर झांग्रिलोच नाही तर उत्तर इटलीमधील इतर डॉक्टरांनीही राष्ट्रीय वृत्तसंस्था असणाऱ्या एएनएसएशी बोलताना कोरोना विषाणूची शक्ती कमी होताना दिसत असल्याचे म्हटले आहे. जेनोवा शहरामधील सॅन मार्टिनो रुग्णालयामधील संसर्गजन्य रोग्य विभागाचे प्रमुख मॅटिओ बासेट्टी यांनीही यासंदर्भात आपले मत व्यक्त केले आहे. हे स्पष्ट आहे की आजचा कोविड-१९ हा आजार वेगळा आहे. दोन महिन्यापूर्वी या विषाणूची शक्ती जितकी होती तितकी आता आहे, असे म्हणता येणार नाही, असे डॉ. बासेट्टी यांनी सांगितले आहे.