अमेरिकेतील ४० शहरांमध्ये संचारबंदी लागू

    दिनांक :01-Jun-2020
|
मिनीयापोलिस,
अमेरिकेतील मिनीयापोलिस शहरात पोलिसांमुळे जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दिवसेंदिवस हे आंदोलन वाढतच चालले आहे. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष होत आहे. आंदोलकांविरोधात पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर करण्यात येत असून रबरी गोळ्याही झाडण्यात आल्या आहेत. दरम्यान, अमेरिकेतील जवळपास ४० शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
 
 
Curfew _1  H x
 
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, नॅशनल गार्डचे जवळपास ५००० जवान १५ राज्यांमध्ये पाठवण्यात आले आहेत. त्याशिवाय आवश्यकता भासल्यास दोन हजार जवानांना तैनात करण्यात येणार आहे. अनेक राज्यांमध्ये आंदोलकांना पिटाळून लावण्यासाठी रबरी गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये अनेक आंदोलक जखमी झाल्याचे वृत्त आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रेन यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना पोलिस दलात वर्णद्वेष असल्याच्या आरोपाचे खंडन केले आहे. अमेरिकन पोलिस दल आणि इतर यंत्रणांमध्येही ९९.९ टक्के हे चांगले अमेरिकन नागरीक आहेत. यामध्ये आफ्रिकन-अमेरिकन, आशियाई सर्वच वर्णाच्या सदस्यांचा समावेश आहे. त्यामुळे वर्णभेद असल्याचा आरोप चुकीचा असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
न्यूयॉर्क ते टु्ल्सा, लॉस एंजलिसपर्यंत हे आंदोलन पेटले आहे. अनेक दुकांनाची लुट सुरू आहे. तर, वाहनांना आगी लावण्यात येत आहे. फिलाडेल्फियामध्ये तीव्र आंदोलनामुळे कमीत कमी १३ पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत. न्यूयॉर्कमध्ये आंदोलकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. लॉस एंजलिसमध्येही आंदोलनकर्त्यांवर रबरी गोळ्या झाडण्यात आल्या आणि लाठीचार्ज करण्यात आला.