आखाती देशातील भारतीयांच्या मदतीसाठी सरसावले धनंजय दातार

    दिनांक :01-Jun-2020
|
- घरवापसीसाठी केली विमानांची व्यवस्था
दुबई,
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात विविध ठिकाणी अडकून पडलेल्या लोकांची मोठ्या प्रमाणात फरफट होत आहे. स्थलांतरित मजुरांप्रमाणेच नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने आखाती देशात गेलेल्या भारतीयांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा भारतीय नागरिकांना आणि अनिवासी भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी मराठी उद्योगपती धनंजय दातार यांनी पुढाकार घेतला आहे.

Gulf_1  H x W:  
 
दुबईस्थित धनंजय दातार यांनी आखाती देशात आपले अफाट उद्योगविश्व निर्माण केले आहे. ‘मसाला किंग’ या नावाने ते ओळखले जातात. दरम्यान, कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आखाती देशांमध्ये राहणारे भारतीय मायदेशी परतण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भारतात जाण्यासाठी परतीचे तिकीट मिळवण्यासाठी हजारो भारतीय नागरिक भारतीय दूतावासासमोर रांगा लावत आहेत. अशा लोकांच्या मदतीसाठी दातार पुढे सरसावले आहेत. 
 
 
कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटामुळे आखाती देशातील अनेक भारतीयांना आपल्या नोकर्‍या गमवाव्या लागल्या आहेत. तसेच त्यांना भाड्याची घरे सोडून रस्त्यावर राहावे लागत आहे. त्यामुळे अशा लोकांसमोर भारतात परतण्यावाचून दुसरा पर्याय राहिलेला नाही.
 
याबाबत धनंजय दातार म्हणाले की, आखाती देशांमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांमध्ये गरोदर महिला, लहान मुले, पर्यटक आणि अल्पकालीन व्हिसा घेऊन आलेल्यांचा समावेश आहे. अशा अडकून पडलेल्या तीन हजार भारतीयांच्या केरळ, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, लखनौ, गोवा आणि चंदीगड येथे जाण्याची व्यवस्था मी केली आहे.
 
दरम्यान, मुंबई आणि महाराष्ट्रामधील सुमारे 60 हजार लोक इकडे अडकून पडले आहेत. त्यांच्याबाबत मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच याबाबत केंद्राला पत्र लिहून या भारतीयांच्या मायदेशी परतण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे.
 
मुंबई आणि महाराष्ट्रातील या नागरिकांच्या मायदेशी परतण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वैयक्तिक रीत्या पुढाकार घेऊन विमानांना ‘वंदे भारत’ मोहिमेंतर्गत मुंबईत येण्याची परवानगी देतील, अशी अपेक्षा धनंजय दातार यांनी व्यक्त केली.