जुळ्या बहिणींची भारताला मदत

    दिनांक :01-Jun-2020
|
सॅक्रॅमेन्टो,
सध्या संपूर्ण जगावर कोरोना विषाणूचे संकट ओढावले आहे. या संकटाचा सर्वाधिक फटका अनेक देशातील गरजू व गरिबांना बसला आहे. या लोकांच्या मदतीसाठी जगभरातून अनेक हात समोर येत आहे. दरम्यान, सातासमुद्रा पार असलेल्या जुळ्या बहिणी भारतातील मजुरांच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत. जरी या दोघींचा जन्म भारतात झाला नसला, तरी एनआरआय आई-वडिलांच्या पोटी जन्मलेल्या या मुलींना भारताबद्दल तितकचे प्रेम आहे. त्यामुळे भारतापासून हजारो किमी दूर असूनही देशातील मुजरांच्या व्यथा त्यांना त्रासदायक ठरत आहेत.
 
 
sisters_1  H x
 
भारतीय मूळ असलेले यशवंत आणि त्यांची पत्नी शिल्पा २००२ च्या सुरुवातीला अमेरिकेत वास्तव्यास गेले. ऑक्टोबर २००२ मध्ये शिल्पाने अमेरिकेत जुळ्या मुलींना जन्म दिला. आरुषी आणि अविषी असे या मुलींचे नाव आहे. कॅलिफॉर्नियाच्या मोंटा विस्का स्कूलमध्ये त्या अकरावीत शिक्षण घेत आहेत.
 
 
भारताच्या कानपूर शहरात राहणारे त्यांचे आजोबा बीएसएनएल सेवानिवृत्त अखिलेश कुमार आणि आजी माजी कॉलेज प्राध्यापिका डॉ. हेमलता यांच्याकडे दरवर्षी सुट्टीला येतात. या जुळ्या मुलींचे आजी-आजोबा समाजसेवा करणाऱ्या विष्णपुरी असोसिएशनशी जोडले आहेत. दोन्ही मुली भारतात येतात तेव्हा त्याही समाजसेवेत सहभागी होतात. दरम्यान, डॉ. हेमलता यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी या मुलींनी फोन करून भारतातील स्थलांतरित मजुरांबद्दल चर्चा केली. या मजुरांचे व्हिडीओ आणि फोटो पाहून त्या व्यथित झाल्या. या दोन्ही मुलींनी अमेरिकेत या मजुरांसाठी फंड गोळा करण्यासाठी साइट बनवली. त्यानंतर १ लाख रुपये पाठवून या मजुरांच्या जेवणाची व्यवस्था केली. सध्या दर शुक्रवारी या मुलींने पाठवलेल्या रक्कमेतून स्थलांतरित मजुरांना जेवण, पाणी देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.