पैशानेच सर्वकाही साध्य होते? नाही...!

    दिनांक :02-Jun-2020
|
माझे मत
 संजय अलकरी
 
गेल्या काही वर्षांत भारतीय जीवनपद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. संयुक्त कुटुंबपद्धती जवळजवळ संपलेलीच आहे. कुटुंब चौकोन किंवा त्रिकोणातच सामावले. मुला-मुलींचे शिक्षण व त्याला प्रामुख्याने प्राधान्य, त्यासाठी लागणारा मोठा खर्च हे सर्व दिव्य पार पाडण्यासाठी आई-वडील दोघेही नोकरी करीत आहेत. स्पर्धेचे युग आहे, पण स्पर्धासुद्धा जीवघेणी झालेली आहे. मुले-मुली शिक्षणासाठी कुठेही पाठवायची तयारी आई-वडिलांनी चालविली तीसुद्धा स्पर्धेमुळेच. आपण स्पर्धेत राहिलो पाहिजे किंवा स्पर्धेतून बाहेर फेकले न जावो, यासाठी जिवापाड धडपड सुरू असते. अशातच संस्कृती वगैरे सर्व धाब्यावर बसवून आत्मकेंद्रित झालेली आहे.
 

money_1  H x W: 
 
बाहेर जगात काय चालले, काय योग्य अन्‌ काय अयोग्य याकडे बघायलासुद्धा सवड राहिली नाही. स्पर्धा ही मुलांच्या शिक्षणाबाबतच नाही तर घर, गाडी, कपडे, दागदागिने, सौंदर्य या सर्व बाबतीत न संपणारी झालेली आहे. पहिले एकाच वाड्यात राहणारे वेगवेगळ्या समाजाचे आठ-दहा कुटुंब एका घरात फ्रीज असला, तरी सर्व वाड्यातल्या कुटुंबांना आनंद. कारण, तो सार्वजनिक असल्यासारखा सर्व वापरायचे. टेलिफोनसुद्धा सर्व वाड्यासाठी असायचा. एवढेच काय, नंतर टीव्ही आला तर वाड्यातील सर्व हक्काने बघायला यायचे. रामायण, महाभारत तर सर्वांनी याच शेअरिंगपद्धतीने बघितले. पैशाचे कामसुद्धा कुणाचे अडत नव्हते. वाड्यामध्ये मोजक्या सायकल्स होत्या, त्यासुद्धा उभ्या दिसल्या तर हक्काने नेणारे होते. कुठेच असूया नव्हती उलट अभिमान होता. पुढे स्पर्धेचे युग आले. आपोआप एकमेकांविषयी असूया वाढली. सर्व स्वतंत्र जगण्यात आनंद मानायला लागले. स्वतंत्र झाले, पण मन अस्वस्थ झाले.
 
 
 
वाडा संस्कृती लोप पावली. मोबाईल आलेत. दूरचे जवळ आलेत, पण जवळचे दूर झालेत. जीवनात निरसता आली. मग उत्साह, आनंद भरण्यासाठी विदेशी संस्कृतीसारखे बर्थ डे साजरे व्हायला लागले. आठ दिवसांतून एक दिवस शॉिंपग आले व आठ दिवसांतून एकवेळ हॉटेिंलग आले. आठ दिवससुद्धा फार मोठा काळ वाटायला लागला तेव्हा होम डिलिव्हरीने बाहेरचे जेवण मागविणे सुरू झाले. घरात गृहिणींना करमेनासे झाले म्हणून वर्षातून एक मोठा टूर लांबचा काढणे व मधामधात दोन-तीन दिवस सलग सुट्या आल्या की, एखादा छोटा टूर केल्याशिवाय मनाला समाधान नाही. मोबाईलमुळे फेसबूक, इन्स्टाग्रामवर टूरचे फोटो टाकण्याचे सर्वांनाच वेड लागले. त्यात मित्र-मैत्रिणी प्रतिक्रियेमध्ये जरी एन्जॉय लिहीत असले, तरी जीव चरफडत असतो. आपणसुद्धा पुढील वेळी येथेच यापेक्षा जास्त आनंद लुटल्याचे फोटो टाकायचे. येथेच पुढच्या टूरची नीव रचली जाते. महिलावर्गाला फोटो म्हटले व सहल म्हटली की चार-पाच नवीन ड्रेस, जीनपॅण्ट लागणारच व ब्युटीपार्लर वारीसुद्धा आली.
 
 
 
हे सर्व कशासाठी? तर मन आनंदी करण्यासाठी! मात्र, खरा आनंदच लोप पावलेला असल्यामुळे या सर्व आनंद मिळविण्याच्या साधनातून आनंद मिळतो तो क्षणिकच असतो. पुन्हा घर, पुन्हा तोच तोपणा दुसर्‍या दिवशीपासून अस्वस्थ करतो. घरात आर्थिक सुबत्ता आली, पण आनंद घेऊन गेली. यावरही आणखी मात करण्यासाठी महिलांनी महिला भिशी पार्ट्या सुरू केल्या. मग पुरुषसुद्धा कुठे मागे राहणार? गल्लोगल्लीतले बार भरभरलेले दिसायला लागले. कुणी बारमध्ये कायम वाहवत गेले, तर कुणी आठवड्यातून काही दिवस जायला लागले. ही कथा एका घरची नाही तर बहुतांश घरची, थोड्याफार फरकाने सारखीच आहे. मुला-मुलींना शिक्षण म्हणजे स्पर्धा हेच कळले. तेसुद्धा धावताधावता कुठेतरी विरंगुळा शोधतात. त्यापैकी काही व्यसने, तर काही आपल्याच विश्वात रममाण असतात. पालकसुद्धा स्पर्धेच्याच गोष्टी करतात, त्यामुळे घरच्यांशी म्हणावा तसा या पिढीतला सुसंवाद राहिलेला नाही.
 
 
 
अशातच कोरोना- एक नवा ईश्वरी कोप- जन्माला आला. जीव वाचविण्यासाठी या कोरोनाने एकच मंत्र दिला तो म्हणजे- घरात राहा. दोन चाकी, चार चाकी गाड्यांवाले घरी कसे राहणार? त्यांना तर घटकाभराची चैन नसते जिवाला. यावर सरकारने उपाय योजला तो म्हणजे लॉकडाऊन, तेही संपूर्ण देश... एवढेच काय, हा कोरोना, जनतेला असूया निर्माण होऊ नये म्हणून सर्व देशांना लॉकडाऊन करायला लावतो. सलग एकवीस दिवस देश बंद झाला. सर्व घरात दडून बसले पण, पैशाच्या जोरावर सर्व कामाला बाया जुंपणारी स्त्री मात्र या कोरोनाने कामावर जुंपली. धुणेभांडी करणार्‍या महिला यासुद्धा घातक ठरू शकतात, हे ऐकल्यामुळे या महिलांना आराम मिळाला. सर्व कामे घरी व्हायला लागली. किती वर्षे झाले जिथे धुणे, भांड्यांना हात लावावे लागले नाही, तिथे या माउलीला मुकाट्याने कामे करावी लागत आहेत.
 
 
 
स्वयंपाकसुद्धा बर्‍याच वर्षाने करण्याची वेळ आलेली आहे. तक्रार करा अथांग प्रेमाने, पण महिलांना सर्व कामे करावीच लागणार. महिना झाला ब्युटीपार्लरचे तोंड बघितले नाही. घराघरांत पुस्तकांना हात न लावणारी पिढी वाचायला लागली आहे. पुरुषसुद्धा घोट्याशिवाय न राहणारे, पानठेले बंद असल्यामुळे गुपचुप आहेत. बार वगैरे बंद असल्याने बसणे-उठणेसुद्धा बंद आहे. भयावह वातावरणात सकारात्मक म्हणजे कित्येकांचे व्यसन सुटते की काय, अशी अवस्था आलेली आहे. कोरोनाने सर्वांना आत्मिंचतन करणे शिकविले. महिला, मुली स्वयंपाक करायला शिकत आहेत. काही घरात चवीचे पण घरचे पदार्थ व्हायला लागले. यामुळे चवीचा स्तर वाढतो आहे, कुटुंबं एकत्र बसायला लागली. चांगल्या विचारांचे आदानप्रदान वाढले, मन खर्‍या अर्थाने आतून आनंदित झाले म्हणून की काय, अन्य आजारांचे कित्येक दवाखाने ओस पडले आहेत.
 
 
 
या काळात आत्महत्येचे प्रमाण कमी झाले. हृदयविकारसुद्धा खूप कमी झाले. प्रदूषण एकदम कमी झाले. आरोग्य स्वस्थ होण्यात स्वच्छ वातावरणाचीसुद्धा मोठी भूमिका असते. एकमेकांशी चर्चा वाढल्या, त्यासुद्धा आपुलकीच्या. पशुपक्षीसुद्धा जवळ यायला लागले. त्यांची किलबिलसुद्धा ऐकायला मन आतुर झाले. एवढे सर्व विस्कटलेले एका कोरोनाने काही दिवसांत जागेवर आणले. ज्यांना, आपल्याकडे पैसा आहे, मला आता कुणाची गरज नाही म्हणणारे शेजारीसुद्धा आस्थेने बोलायला लागले. गरीब-श्रीमंत सारखेच जीवनावश्यक गोष्टी मिळविण्यासाठी धडपड करताना दिसू लागले. सुखसोयीच्या, चैनीच्या वस्तू सर्व मागे पडल्या. ज्यांना पैशाने सर्वकाही मिळते असे वाटायचे, त्यांना आज जाणीव झाली की, पैशाने भौतिक सुख मिळते, पण मानसिक आनंद दुरावतो... एवढे फक्त एका कोरोनाने सिद्ध करून दाखविले.
 
9028227580