सात शब्दांचा तारक महामंत्र...

    दिनांक :02-Jun-2020
|
अध्यात्म
वसंत मोरेश्र्वर दिढे (मामा) 
 
श्री राम जय राम जय जय राम हा एक सरळसाधा असा मंत्र आहे. यात तेरा अक्षरं आहेत आणि सात शब्द आहेत. हा मंत्र म्हणायला अतिशय सोपा आणि वाचायला सरळसाधा दिसत असला, तरी या तारक मंत्रात जी शक्ती आहे, ती अनुभवाचा विषय आहे. या तायक मंत्राची शक्ती अनुभवायची असेल, तर त्याचा जप करावा लागेल. मनापासून करावा लागेल. ‘दे रे हरी खाटल्यावरी!’ असे होणार नाही. हा जप कुणी करावा, कुठे करावा, कसा करावा यावर कसलेही निबर्र्ध नाहीत. त्यामुळे ज्याला इच्छा होईल, त्याने जप करावा. अट एकच, त्यात भक्तिभाव असावा. एखादा स्वार्थ डोळ्यांपुढे ठेवून जर आपण हा जप केला तर अपेक्षित फळ मिळेलच याची शाश्वती नसते. रामनामात जी प्रचंड अद्भुत शक्ती आहे, तिचा परिचय आम्हाला लवकर का होत नाही, हा खरा प्रश्न आहे. प्रभू श्रीराम हे समस्त िंहदूंचे आराध्य दैवत आहे.
 
 
shriram_1  H x
 
या दैवताला पूज्य मानून त्याचे स्मरण दररोज केले तर यथावकाश फलप्राप्ती ही होतेच. पण, दुर्दैवाने आपल्या या देशात रामनामाचा विरोध करणारे लोकही कमी नाहीत. आपल्यापैकी कित्येक लोक हे स्वत:च्या उद्धारासाठीही रामनामाचा आश्रय घेत नाहीत, हे दुर्दैवच होय. रामनाम घेण्यात आम्ही जेवढे कमी पडलो तेवढेच जीवनात यश, सुख, शांती मिळविण्यात मागे पडलो आहोत, हे वेळीच लक्षात घेतले पाहिजे. समाजात विषमता वाढली आहे, त्रास वाढला आहे. आज आपल्याला कोरोनाने विळखा घातला आहे. या विळख्यातून सहीसलामत बाहेर पडायचे असेल, तर इतर उपायांसोबतच रामनामाचा गजर केला पाहिजे. त्रासातून मुक्ती देण्याची तारक शक्ती या मंत्रात असल्याने त्याचा नियमित मनोभावे जप करणे क्रमप्राप्त ठरते. राम हे अतिशय सार्थक नाव आहे आणि आपल्या ऋषी-मुनींनी या नामातली ताकद फार पूर्वीच ओळखली होती. खरे तर त्यांनीच आपल्याला रामनामाची गोडी लावली आहे आणि त्यामुळेच आज आपल्या आयुष्याची गाडी रुळावर आहे.
 
 
 
रामनामाला जीवनाचा महामंत्र मानले गेले आहे. आपल्या कुटुंबात कुठलेही शुभ कार्य असते ना, तेव्हाही आपण रामाचेच नाव घेतो, त्याचा गजर करतो. मनुष्य जेव्हा इहलोकाच्या यात्रेला निघतो, तेव्हाही रामनामाचाच जप केला जातो. राम सर्वमय आहे आणि सर्वमुक्त आहे. आपल्या प्रत्येकात जी चेतनाशक्ती आहे ना, त्याचेच सजीव असे नाव म्हणजे श्रीराम आहे. जो रामभक्त आहे, त्याच्या हृदयात रामाचा वास असतो, हे लक्षात घेतले पाहिजे. आणि म्हणूनच ज्याच्या ठायी सदैव राम आहे, त्याला कसलीही िंचता करण्याची आवश्यकता भासत नाही. िंचता हा आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनाचा आवश्यक भाग असला तरी रामनामाने िंचतेवर विजय मिळविता येऊ शकतो, हेही लक्षात घेतले पाहिजे. ज्याला रामनामातली तारक शक्ती कळली आणि ज्याने रामनामावर सगळे सोपविले, त्याच्या आयुष्यातील अडचणी निश्चितपणे दूर होतात. पण, हाही अनुभूतीचाच विषय आहे. तुलसीदासांनी जे रामचरितमानस लिहिले आहे ना, त्यात ते असे म्हणतात- ईश्वराची जेवढी नावे प्रचलित आहेत, त्या सगळ्यांमध्ये प्रभू श्रीरामाचे नाव अतिशय प्रभावी आणि फलदायी आहे. पुन्हा तेच की, विषय अनुभूतीचा आहे. ज्याने मनापासून रामनाम घेतले त्याला येणारी अनुभूती ही अन्य कुणी जाणू शकत नाही. त्यामुळे अनुभूती घेण्यासाठी अविरत नामजप आवश्यक ठरतो.
 
 
 
खामगावला लवकरच नामालय अस्तित्वात येणार आहे. या नामालयात प्रत्येक रामभक्ताला नामजप करण्याची अनुमती असणार आहे. सरळ, सुरक्षित आणि लक्ष्यप्राप्तीच्या दिशेने नेणारा महामंत्र अशी या मंत्राची ओळख उगाचच तयार झालेली नाही. आपले मन जेव्हा सहज अवस्थेत असते, त्यावेळी जर आपण जप केला तर तो अधिक फलदायी ठरतो, असाही अनेक रामभक्तांचा अनुभव आहे. माझा तर आहेच आहे. ‘श्री’ या अक्षराने या मंत्राची सुरुवात होते. ‘श्री’ला सीता वा शक्तीचे प्रतीक मानले गेले आहे. राम शब्द ‘रा’ अर्थात र-कार आणि ‘म’ मकारने मिळून तयार झाला आहे. ‘रा’ अग्निस्वरूप आहे. हा शब्द आपल्या दुष्कर्मांचा दाह करतो अर्थात दुष्कर्मांना मूठमाती देतो. यावरून तरी राम या शब्दातील आणि रामाच्या नावाने असलेल्या या तारक अशा महामंत्रातील शक्ती आपल्या लक्षात यायला हवी. राममधील ‘म’ हा शब्द जलतत्त्वाचा द्योतक आहे. जल म्हणजे पाणी. पाण्याला आत्म्याच्या जीवात्म्यावरील विजयाचे कारक मानले गेले आहे, यातच सगळे आले. तेव्हा रामनामातील ही तारक शक्ती ओळखू या आणि नियमित नामसाधना करण्याचा संकल्प करूया!
 
खामगाव