मित्रास पत्र...

    दिनांक :02-Jun-2020
|
हलकं-फुलकं
 मुकुंद परदेशी 
प्रिय मित्र,
मा. मु. उधोजी राजे यांसी मा. मु. देवा नाना नागपूरकर याचा सप्रेम नमस्कार! आपल्या नावापुढे लिहिलेल्या मा. मु.चा अर्थ माननीय मुख्यमंत्री असा असून, माझ्या नावापुढे लिहिलेल्या मा. मु.चा अर्थ माजी मुख्यमंत्री असा आहे. (यात केव्हाही अदलाबदल होऊ शकते हे लक्षात असू द्यावे.) तसेच मी तुम्हाला सप्रेम नमस्कार लिहिला आहे, त्या अर्थी माझ्या मनात तुमच्याप्रती अद्याप प्रेम आहे, हेही लक्षात असू द्यावे. आपल्यात हल्ली अनेक गैरसमज असल्यामुळे इतका सविस्तर खुलासा करावा लागत आहे. एकंदरीत दैव तुमच्यावर फारच मेहेरबान आहे, असे दिसते. अन्यथा दुसर्‍याच्या बुडाखालची खुर्ची ओढण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बारामतीकर साहेबांनी तुमच्या बुडाखाली आयती खुर्ची कशी सरकवली असती? तुमच्या गाठीशी पुण्यसंचयही भरपूर असावा, असे दिसते, अन्यथा मुख्यमंत्रिपदी बसल्या बसल्या तुम्हाला इतकी अहोरात्र समाजसेवा करण्याची संधी कशी मिळाली असती? एकंदरीत, कोरोना तुम्हाला पावला म्हणायचा. इतकी समाजसेवा घडायला नशीब लागतं. नशीबवान आहात तुम्ही. आनंद आहे. असो.
 
 
latter_1  H x W
 
मध्यंतरी राज्यपालांनी नियुक्त आमदार म्हणून तुमची निवड करण्यास टाळाटाळ करून तुम्हाला त्रास दिला. आपल्या मित्राला त्रास होतोय्‌ हे लक्षात येताच मी राज्यपालांकडची ऊठबस वाढवली आणि त्यांनी तुम्हाला त्रास देऊ नये म्हणून रोज त्यांची मनधरणी करू लागलो. आजपर्यंत त्यात खंड पडू दिला नाही. ते काही माझं ऐकेनात म्हणून मग तुमच्यासाठी म्हणून दिल्लीला फोन लावून विधान परिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी थेट मा. पं.ना गळ घातली. योगायोगाने तुम्हीही तेव्हाच त्यांना फोन लावल्याचे वर्तमानपत्रातून वाचले. तुमचं काम मी आधीच करून ठेवलं होतं. मित्रप्रेम कशाला म्हणतात? सुरुवातीपासून माझ्या संपर्कात राहिला असतात, तर तुम्हाला त्यांना फोन करावाच लागला नसता. सुज्ञास सांगणे न लगे. असो. परवा आम्ही जे आंदोलन केलं तेही तुमची जनतेतली प्रतिमा उजळावी म्हणूनच. म्हणजे असं की, विरोधक इतका त्रास देतात तरी तुम्ही किती चांगलं काम करतात, हे लोकांना कळावं म्हणून! आताही काही अज्ञानी माणसं राष्ट्रपती राजवटीची आवई उठवत आहेत. असं काही होणार नाही, याची मला खात्री आहे, पण दुर्दैवाने असं काही घडलंच, राष्ट्रपती राजवट लागलीच, तर सहा महिन्यांनंतर आपण दोघांनी राज्यपालांना एकत्र भेटायला जायचं का? खरंतर हे सर्व बोलायला मी स्वतःच ‘मातोश्री’वर येणार होतो. त्या निमित्ताने वहिनींच्या हातचे कांदे-पोहेसुद्धा खाता आले असते, पण म्हटलं तुमचं घरात बसून कोरोनाशी जोरदार युद्ध सुरू आहे, कशाला उगाच त्रास द्या?
ता. क.- तुम्हाला जर ‘वर्षा’ रिकामाच ठेवायचा होता, तर मला तिथून काढण्याची इतकी घाई का केलीत?
तुमचा हितिंचतक मित्र,
मा. मु. देवा नाना नागपूरकर.
 
देवा नाना,
तुमचे पत्र मिळाले. मा. मु.चा अर्थ सांगितल्याबद्दल आभारी आहे. माणसाने आशावादी राहावं. चांगलं असतं ते. निदान जगायला काहीतरी कारण तरी मिळतं. नाहीतर आयुष्य निरर्थक वाटून काही लोक आत्महत्या करतात. ‘वर्षा’ अजून तुमच्या मनात आहे, याचा आनंद आहे. काही गोष्टी माणूस विसरू शकत नाही, हेच खरं. पण, त्यासाठी फक्त दाढी वाढवू नका म्हणजे झालं. त्याचं काय आहे ना की, चेहरा जरा जास्तच सुजलेला दिसेल. मला लहानपणी ऐकलेली एका गाढवाची गोष्ट आठवते. त्याचा मालक आपल्या सुंदर मुलीला धमकी देत असे की, दोरीवरून चालताना पडलीस तर या गाढवाशी तुझं लग्न लावून देईन. ते गाढव बिचारं आशा लावून बसलं की, एक ना एक दिवस ही सुंदर मुलगी आधी दोरीवरून पडेल आणि मग आपल्या पदरात पडेल! त्या आशेतच मरून गेलं बिचारं! राज्यपालांच्या नादी लागू नका. सुज्ञास सांगणे न लगे. असो.
 
 
आता दैव माझ्यावर मेहरबान तर नक्कीच आहे, त्याशिवाय का तुमच्यापासून सुटका झाली? राज्यपालांनी मला छळू नये म्हणून तुम्ही रोज अर्धाअधिक दिवस राजभवनावर असता, हे कळले. आनंद झाला, झाला म्हणजे काय, होणारच. तुमच्यासाठी एक घोडा पाठवून देतो. घोडा प्रशिक्षित आहे. तुम्ही फक्त त्याच्या पाठीवर बसायचाच अवकाश की, तो तुम्हाला थेट राजभवनावरच घेऊन जात जाईल. तुम्ही केलेल्या आंदोलनामागचा उदात्त हेतू वाचून हायसं वाटलं. आमचं सरकार पाच वर्षे चालावं, मध्येच राष्ट्रपती राजवट लागू नये म्हणून तुम्ही जीवतोड प्रयत्न करीत असाल, याची मला पूर्ण खात्री आहे. तरीसुद्धा दुर्दैवाने जर राष्ट्रपती राजवट लागलीच तर सहा महिन्यांनंतर तुमचा सेनेत प्रवेश करून घेऊन मग आपण दोघे राज्यपालांना एकत्रच भेटायला जाऊ या. तयारीत असा. तुमचा प्रवेशसोहळा आटोपल्यावर सविस्तर बोलू या.
तुमचा हितिंचतक,
उधोजी राजे.
 
7875077728