भगवंत-भक्तांमध्ये भौतिक दूरतेचा आभास

    दिनांक :23-Jun-2020
|
पराग जोशी
मंदिरे व श्रद्धास्थाने हा भारतीय संस्कृतीचा आत्मा मानला जातो. श्रद्धेमुळेच समाजात थोडीफार नैतिकता उरली आहे. मंदिरांच्या आत गेल्यावर लोकांना समाधान मिळते. पण मंदिरांच्या बाहेर देखील पूजा साहित्य, प्रसाद, हार, फुले आदी व्यवसाय करणारे देखील मंदिराच्या आश्रयाला असतात. तीन महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे देव आणि भक्तांची भेटच कोरोनाने होऊ दिली नाही आणि मंदिरे बंद असल्यामुळे बाहेर व्यवसाय करणार्‍यांवर उपासमारीचे संकट कोसळले. आता इतर व्यवसाय सुरू झाले पण हे सर्व व्यवसायी मात्र अजूनही घरीच बसले आहेत. त्यापैकी अनेकांनी भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.
 

pooja photo_1   
 
 
नित्यनेम म्हणून दररोज मंदिरांमध्ये जाणार्‍यांची सं‘या देखील लाखोंच्या घरात आहे. त्याचप्रमाणे मंदिरांमध्ये देवदर्शनाला जाताना लोक हार, फुले, प्रसाद तसेच देवासाठी भेटवस्तू नेतात आणि त्याची खरेदी परिसरातील दुकानांमधूनच होते. त्यामुळे परिसरात दुकाने थाटलेली दिसतात. हा व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणावर होतो. पण मंदिरे बंद असल्यामुळे हे सर्व लोक उपासमारीच्या संकटात आहेत. दुसरा कोणता व्यवसाय करावा ही त्यांच्यापुढे समस्या आहे.
 
 
मागील काही वर्षांपूर्वी केवळ ज्येष्ठ नागरिकच मंदिरात जाताना दिसत होते पण आता युवा पिढी देखील आध्यात्मिक आणि धार्मितकडे वळलेली दिसत आहे. शाळा, कॉलेज, नोकरीवर जाताना हे लोक मंदिरात जातात किंवा रस्त्यावरून तरी नमन करतात पण देवाकडे पाहतात ही बाब सर्वत्र अनुभवास येते. गुरुवारी तर अनेक मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक गर्दी करतात. आरतीच्या वेळा निश्चित आहेत आणि त्यानंतर महाप्रसाद देखील वितरित होतो. या महाप्रसादावर देखील अनेकांची गुजराण होते. काही मंदिरांमध्ये दररोज प्रसाद वितरित करणारे भाविक आहेत. नवस फेडण्यासाठी येणार्‍यांमुळे अनेकांना कपडे, भोजन, भेटवस्तू मिळते.
 
 
यासोबतच मंदिरामुळे मिठाई, पेढे, बत्तासे, मोदक, लाडू आदींची विक्री देखील मिष्ठान्न भांडारातून होत असते. गुरुवार, चतुर्थी, एकादशी, पौर्णिमा, शनिवार, संत महंताचे प्रकटदिन, पुण्यतिथी दिन या दिवशी तर भजन, संगीतमय कार्यक्रम यांचे देखील आयोजन होत असे. मिरवणुकांसाठी घोडे, बग्गी, बत्ती, रथ, लायटिंग यांचा वापर होतो. मंदिरात जाण्यासाठी बस, ऑटो, कॅब, खाजगी वाहने, दुचाकी वाहने यांचा वापर होतो. त्यामुळे सायकल स्टॅण्डवाल्यांना रोजगार मिळत होता.
पुजारी हवालदिल
आता बहुतांश मंदिरांमध्ये विश्वस्त मंडळे आहेत आणि मंदिरातील पुजारी शिप्टनिहाय नोकरीवर आहेत. ते मंदिराचे पगारदार नोकर आहेत. अनेकांना पगाराशिवाय पूजा, अभिषेक यासाठी निराळी बिदागी मिळत होती. चढावा मात्र दानपेटीत जातो. शिवाय नवी वाहने खरेदी करणारे लोक सतत येत असतात. या सर्वांचे समाधान करणारे पुजारी मात्र बेरोजगार झाले आणि हवालदिल झाले आहेत. अनेकांना या काळात गरजू म्हणून शिधावाटपावर उदरनिर्वाह करावा लागला.