सरकार..मायबाप..सांगा, त्यांनी जगायचे कसे?

    दिनांक :27-Jun-2020
|
शैलेश भोयर 
कधी तरी आमच्याही आयुष्यात पौर्णिमेचा चंद्र प्रकाश देऊन जाईल...आमच्याही जीवनात आनंदाची बाग फुलेल, अशी स्वप्नांची मालिकाच त्यांच्या मनात होती. अन् तीन महिन्यांच्या काळोखानंतर प्रत्यक्षात सामान्यांच्या जीवनात चंद्राचा प्रकाश येणार तोच त्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले गेले. महागाईने दिवसाचे सुख हिरावले, तर भरमसाट वीज बिलाने रात्रीची झोप उडाली. आजही अनेकांच्या हाताला काम नाही. ज्यांना काम आहे, ते निम्म्या वेतनावर. अशा स्थितीत पोट भरायचे की, वीज, पाणी बिल भरायचे. सरकार... मायबाप... सांगा, त्यांनी जगायचे कसे?
 

depressed_1  H  
 
 
शहरात सर्वत्र एकच गोंधळ... भरमसाट वीज बिल हा एकच प्रश्न, दुसरे म्हणजे पाण्याचे बिल, तिसरे पेट्रोल, डिझेल अन् गॅस. या सर्व जीवनावश्यक वस्तू आहेत. आता पेट्रोल, गॅसची दरवाढ झाल्याने जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ निश्चित आहे. केवळ पोट भरणेच महत्त्वाचे आहे का? पण पोट तरी भरायचे कसे? तीन महिन्यांपर्यंत ठीक होते. कारण मदत करणाèयांचे शेकडो हात गरजूंच्या दिशेने सरसावले होते. त्या वेळी ना वीज बिल, ना पाणी बिल. त्या काळात गॅसचे दरही कमीच होते. तो वनवास असला तरी तेवढा त्रास झाला नाही. आता खऱ्या अर्थाने जगणे आणि कुटुंबाला जगविण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
 
व्याजाच्या पैशावर दिवस काढल्यानंतर चांगले दिवस आले की, मागणारे घरावर येतात. अशीच काहीशी स्थिती सामान्यांची झाली आहे. कोणीही असा विचार केला नसावा. तीन महिन्यांनंतर जगण्यासाठी त्याहीपेक्षा अधिक संघर्ष करावा लागेल. एकाच वेळी तीन महिन्यांचे वीज बिल, पाण्याचे बिल आले. आता तर हळूहळू जीवनमान पूर्वपदावर येत होते. लोक अन्नपाण्याला लागत होते. खऱ्या अर्थाने ते मुलांना दोन घास भरवत असतानाच पुन्हा तेच दिवस आलेत.
 
 
एकाच वेळी सारेच तुटून पडले. मरता क्या नहीं करता म्हणत काहींनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला. नाममात्र, पैशात रस्त्यावर हातठेला घेऊन काही विकण्याचा प्रयत्न केल्यास मनपा सज्ज, सोबत पोलिसही असतात. तिकडे वाहतूक पोलिस दंड ठोठावत आहेत. अद्याप शाळा सुरू झाली नसली तरी शाळा व्यवस्थापनाने ड्रेस, कपडे, वह्या, पुस्तकांसाठी सांगितले आहे. शिकवणीसाठी स्पर्धा लागली आहे. आजही काही गरजू घरोघरी तांदूळ मागायला फिरतात. अशी विपरीत स्थिती निर्माण झाली आहे. आजही अनेकांचे हात रिकामेच आहेत. कामाच्या शोधात घरून निघालेले रात्री रिकाम्या हाताने परततात.
 
 
संयमाचा बांध सुटला की उद्रेक!
जीवन कोणासाठी थांबत नाही फक्त जगण्याची कारणे बदलतात. जशी आता जगण्याची कारणे आणि पद्धतच बदलली. या बदलामुळे देशाची अर्थव्यवस्थाच रुळावरून घसरली. सामान्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत आहेत. आता कुठे दोन घास पोटात पडत आहेत. कोरोनाने साऱ्यांनाच जगण्याचा अर्थ सांगितला सोबत समस्याही दिल्या. मात्र, सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत. काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात, अशी म्हण आहे. परंतु प्रतीक्षा तरी करायची किती? संयम तरी कधीपर्यंत ठेवावा? संयमाचा बांध सुटला की उद्रेक होईल.
जीवन म्हणजे पत्त्यांचा डाव
पत्त्यांच्या डावाप्रमाणे जीवन असते. डाव खेळताना चांगले पत्ते मिळाले की, जिंकणे सोपे होते आणि मनासारखे पत्ते नसले तर पराजय निश्चित. प्रत्येक वेळी चांगले पत्ते मिळतीलच, असे नाही. त्याचप्रमाणे उजाडणारा प्रत्येक दिवस हा सोन्याचा असेलच असेही नाही. मात्र, येणाèया प्रत्येक दिवसाला सोन्यासारखे करता येते. हे प्रत्येकाच्या हाती असते. हे शब्दात सांगायला चांगले वाटत असले तरी प्रत्यक्षात जीवन एवढे सोपे नाही. अलिकडचा संघर्ष जगण्यापलीकडचा आहे. कारण एकाच वेळी सारेच तुटून पडले. जीवनात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. असे म्हणतात. आता कोरोनानिमित्त साऱ्यांनाच चांगल्या आणि वाईट दिवसांची qकमत कळली.