लग्नाच्या पाहुण्यांपैकी १५ जण निघाले कोरोना पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

    दिनांक :28-Jun-2020
|
संबंधित कुटुंबाला ६ लाखांचा दंड
जयपूर, 
 
करोनाचं संकट अजूनही प्रत्येकाच्या डोक्यावर घोंगावत प्रत्येकाची दैनंदिनी विस्कळीत झाली आहे. ऐन लग्नसराईत हे करोनानं देशात शिरकाव केल्यानं लग्न सोहळे लांबणीवर पडले होते. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर हळूहळू गर्दी टाळून लग्न सोहळे उरकण्याकडे सगळ्यांचा कल दिसून येत आहे. मात्र, यातही अनेक विघ्न येताना दिसत आहे. राजस्थानमधील एका कुटुंबावरही मुलाचा विवाह करताना करोनाचं विघ्न ओढवलं. लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांपैकी तब्बल १५ जण करोना बाधित निघाले, तर एकाचा मृत्यूही झाल्याची घटना समोर आली आहे.
राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील भदादा मोहल्ला येथील रहिवाशी असलेले घिसुलाल राठी यांच्या मुलाचा विवाह सोहळा लग्न १३ जून रोजी झाला. देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेला लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्यानंतर झालेल्या या विवाह सोहळ्यासाठी घिसूलाल राठी यांनी ५० पेक्षा अधिक पाहुण्यांना निमंत्रित केलं होतं. हा लग्न सोहळा पार पडल्यानंतर मोठी धक्कादायक बाब समोर आली. या सोहळ्यात सहभागी झालेल्या १५ जणांना करोना झाल्याचं रिपोर्टमधून पुढे आलं. विशेष म्हणजे यातील एका करोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यूही झाला आहे.

vivah _1  H x W
हा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनानं घिसुलाल यांच्याविरुद्धात कडक कारवाई केली. लॉकडाउनच्या नियमांचा भंग करत ५० पेक्षा जास्त नातेवाईकांना बोलावल्याप्रकरणी ६ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. भिलवाडाचे जिल्हाधिकारी राजेंद्र भट्ट यांनी या घटनेविषयीची माहिती दिली.
या प्रकरणी घिसूलाल राठी यांच्याविरुद्ध २२ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५ जण करोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर प्रशासनानं लग्नात उपस्थित असलेल्या पाहुण्यांना अलगीकरण व विलगीकरण कक्षात ठेवलं होतं. या पाहुण्यांची चाचणी, त्यांचं जेवण, रुग्णवाहिका यासाठी राज्य सरकारनं ६ लाख २६ हजार रुपये खर्च केले. त्यामुळे प्रशासनानं ही रक्कम वसुल करत घिसुलाल राठी यांना ६ लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यास सांगितले.