आत्मविश्वास

    दिनांक :28-Jun-2020
|
नवचेतना
- समिधा पाठक
काही वर्षांपूर्वी मी एका युवा काव्यसंमेलनात भाग घेतला होता. ‘अस्तित्व तुझं’ या विषयावर कविता सादर केली होती. सगळ्यांना कविता खूप आवडली आणि फलरूप पारितोषिकही मिळालं. कार्यक्रम संपला. भेटीगाठी झाल्यात. मग बाहेर येऊन कॅॅब बुक केली. कॅब यायला वेळ होता, तोपर्यंत सवयीप्रमाणे स्वतःशीच बोलू लागले. खरंतर मला आनंद झाला होता. केवळ पारितोषिक मिळाले म्हणून नाही, तर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आल्यानंतर पहिल्यांदाच मी कविता केली होती. त्यामुळे मनं प्रफुल्लित होतं. मोबाईल काढला आणि कॅब कुठवर आलीय हे बघायला गेली, तोचं नोटिफिकेशन दिसलं की, तुमची राईड कॅन्सल झालीय. पुन्हा बुिंकग करण्यात अर्थ नाही वाटला, म्हणून टॅक्सी िंकवा ऑटो बघत होती. पण, ते काही माझ्या पत्त्यावर सोडायला तयार नव्हते. काव्यसंमेलनातील एक मुलगी हा प्रकार बघत होती आणि तिने येऊन विचारलं की, कुठल्या भागात राहता. तिलाही माझ्या पत्त्यावरूनच जायचं असल्याने तिने तिच्या गाडीत मला लिफ्ट ऑफर केली. अजून ऑटोवाल्यांना हात दाखवून मला नकार ऐकायचे नव्हते. म्हणून मग मी तिच्याबरोबर जायचं ठरवलं. एकमेकींचा परिचय झाला आणि मग ती मला म्हणाली की, मला तुझी कविता फार आवडली, ती जर आधीच ऐकली असती, तर कदाचित मीसुद्धा माझी कविता सादर केली असती. सुरुवातीला मला तिच्या बोलण्यातील रोख कळला नाही. मग तिने सांगितलं की, तिनंसुद्धा कविता केली होती, पण स्टेजवर जायची भीती वाटली म्हणून नाव घेतल्यावर ती मंचावर गेलीच नाही. मी आग्रह केल्यावर तिने मला कविता म्हणून दाखवली आणि खरोखरच तिच्या काव्याने मी मंत्रमुग्ध झाली.
 

confidence_1  H 
 
‘मला हे जमेल का, जमलं नाही तर काय होईल?’ ही झाली भीती आणि ‘मला हे कसं बरं जमतं नाही,’ हा झाला आत्मविश्वास. असंच काहीबाही भरपूर वेळा घडतं. कधी व्हायवा असतो िंकवा मोठ्या क्लायंटला भेटायचं असतं, कधी खूप पाहुणे घरी येणार असतात, तर कधी लांबच्या प्रवासाला निघायचं असतं... अशा अनेक वेळी आपली परिस्थिती कुरुक्षेत्रातील अर्जुनासारखी होते. ‘सीदन्ति मम गात्राणि, मुखं च परिशुष्यति.’ घशाला कोरडं पडते, हातापायांना कंप सुटतो, दरदरून घाम येऊ लागतो... थोडक्यात, आत्मविश्वास कमी होतो. बहुतांश वेळी हे सगळं तेव्हा होत असतं जेव्हा आपण एखादी गोष्ट पहिल्यांदा िंकवा मोठ्या गॅपनंतर करत असतो. स्किल असतं, पण ते प्रेझेंट करण्याचा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये नसतो! मुळात आत्मविश्वासाची कमी असते. त्याला रिचार्ज करावं लागतं. आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ इस्टिम असे अनेक शब्द कानावर पडतात. पण नेमका अर्थ काय? तर आत्मविश्वास म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून पुढे वाटचाल करणे. पण, आत्मविश्वास हा काही गॉड गिफ्ट नसतो. आत्मविश्वास मनाची एक अवस्था असते, जिचं सोंग आणता येत नाही. आत्मविश्वास हा दिसून येत असतो, दिखाव्याची गरज नसते. तो वक्तृत्वातून जाणवत असतो आणि कर्तृत्वातून दिसून येत असतो. प्रत्येकाला वाटत असतं की, सगळ्यांना आकर्षित करणारं आपलं व्यक्तिमत्त्व असावं आणि ज्याचं सगळ्यांनी कौतुक करावं. मग असं मोहक व्यक्तिमत्त्व साकारायला आत्मविश्वासाने स्वतःचं ग्रुिंमग करणं फार आवश्यक असतं. व्यक्तिमत्त्व विकास हा आजच्या जगातील परवलीचा शब्द! आत्मविकास ही व्यक्तिमत्त्व विकासाची पहिली पायरी असते आणि आत्मविकासासाठी अनिवार्य असणारा गुण म्हणजे- आत्मविश्वास! कसा वाढवायचा मग आपल्यातील आत्मविश्वास?
 
 
आत्मविश्वास वाढवण्याचा एक बेसिक फंडा म्हणजे आपल्या क्षेत्रात आपला पाया मजबूत करणे. नकारात्मक विचार जर मनाभोवती घिरट्या घालत असतील, तर आत्मविश्वासाचा अभाव निश्चितपणे जाणवून येतो. कारण विचार आत्मविश्वासाचा स्रोत असतात आणि वैचारिक दृष्टिकोन मनोबल वाढवत असतो. मनातील आत्मविश्वास ढळला की, मग नैराश्य वरचढ होतं. पन्नास धावांमध्ये पाच बळी गेलेल्या फलंदाजी करणार्‍या संघात, एखादा सहावा फलंदाज येऊन, आत्मविश्वासाच्या जोरावर संघाच्या तीनशे धावा करून दाखवतो. म्हणून परिस्थिती कशीही असली, तरीही नेहमी सकारात्मक विचारच करायचेत. कधी चुका होतील, पण त्या चुकांमधून धडा घेऊन पुढे जायचं. कधी भीती वाटणं साहजिक असतं, पण धैर्याने व योग्य नियोजनाने भीतीचा सामना करायला हवा. आपल्यातील उणिवा शोधायच्या, स्वतःचं स्वॉट अॅनालिसिस करायचं आणि पुढे जायचं. कारण आपल्या इतकं चांगलं इतर कोणीच आपल्याला ओळखत नसतं. म्हणून आपल्याला स्वतःची आणि आपल्या क्षमतांची जाणीव व्हायला हवी. अमिताभ बच्चन यांना त्यांचा आवाज चांगला नाही म्हणून रेडिओ ब्रॉडकास्टरच्या पदासाठी नाकारण्यात आलं होतं. पण, आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपले नाव अजरामर केले.
 
 
आत्मविश्वास एका रात्रीतून डेव्हलप होत नसतो, ती एक लंबी प्रोसेस असते आणि आत्मविश्वास क्रियशीलतेनीच येत असतो. फेक कॉन्फिडन्स िंकवा ओव्हर कॉन्फिडन्ससुद्धा घातक असतो. समस्यांना घाबरून जायचं नाही, तर एक चॅलेंज म्हणून स्वीकारायचं. स्वतःला एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखायचं. आपल्यातील प्रतिभेला वाव द्यायचा, एका जवाहिर्‍याप्रमाणे आपल्यातील चेतनेला पैलू पाडायचं. आपल्यात रुजलेली भीती व असुरक्षितता ओळखून त्यावर उपाय शोधायचे. आत्मप्रतिमा दुबळी होऊ द्यायची नाही. आपल्याला मिळालेल्या छोट्या छोट्या यशासाठीपण स्वतःचं कौतुक करायचं. माझ्याकडे अफाट क्षमता आहे आणि या क्षमतेच्या बळावर मी अशक्य तेही शक्य करून दाखवेल, असं रोज स्वतःला सांगायचं. आत्मविश्वासाने आपल्याला जगण्याची ऊर्जा मिळते, जीवन आनंदमयी वाटू लागतं आणि पुढची मोहीम फत्ते करायला एक नवी उमेद मिळते. मनात आत्मविश्वास बणवून अनेक गोष्टी आत्मसात करायला तयार व्हा! आत्मविश्वास ही जगातील सर्वांत सृजनशील शक्ती आहे आणि या शक्तीत प्रचंड सामर्थ्य आहे. या शक्तीचा यथायोग्य वापर करून पुढे चलू या!
तू खुदकी खोज मे निकल, तू किस लिये हताश हैं? तू चल, तेरे वजूद कि समय को भी तलाश हैं...
 
 
लेखिका, स्त्री सशक्तीकरण व युवा चेतना
या विषयांच्या स्तंभलेखिका आहेत.)
7276583054