नेहरू-इंदिरा यांच्या काँग्रेसला कोण वाचविणार?

    दिनांक :28-Jun-2020
|
- गजानन निमदेव
कॉंग्रेस पक्ष. देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष. याच पक्षाने देशावर सर्वाधिक काळ राज्य केले. एकेकाळी देशातील प्रत्येक राज्यात या पक्षाची सत्ता होती. ज्या उत्तरप्रदेशने देशाला सर्वाधिक पंतप्रधान दिले, त्या उत्तरप्रदेशसह भारतातील प्रत्येक राज्यात काँग्रेसचे सरकार होते. पण, आज याच काँग्रेसची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. चुकांमधून शिकत पुढे जाण्याच्याही स्थितीत काँग्रेस पक्ष राहिला नाही. सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या दरबारातील दरबारी राहुल गांधी यांच्या मदतीने कॉंग्रेसला वेगाने रसातळाला नेत असल्याची अनुभूती संपूर्ण देशाने घेतली आहे.  काँग्रेस पक्षाची आजची अवस्था बघितली तर जो कॉंग्रेसी नाही, त्यालाही वाईट वाटेल, एवढी खराब झाली आहे. पॅरलिसिस झालेल्या रुग्णासारखी काँग्रेसची अवस्था होण्यामागे दिशाहीन नेतृत्व कारणीभूत आहे. ज्या कॉंग्रेसने स्वत:ला स्पष्ट बहुमत नसतानाही 2004 ते 2014 अशी दहा वर्षे देशावर राज्य करताना संयुक्त पुरोगामी आघाडीचे नेतृत्व केले, त्या काँग्रेससोबत आज संपुआमधील पक्षही उभे राहायला तयार नाहीत आणि काँग्रेसचे जुनेजाणते नेतेही राहुल गांधींना साथ द्यायला तयार नाहीत. कारण, जुन्याजाणत्यांना खड्यासारखे बाजूला फेकण्यात काँग्रेस नेतृत्वाच्या आसपास पिंगा घालणार्‍या चौकडीने महत्त्वूपर्ण भूमिका निभावली आहे. आजही नेतृत्व त्याच चौकडीच्या चक्रव्यूहात अडकले आहे. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आज तरी नेतृत्वाला सापडेनासा झालाय्‌.
 

indian congress_1 &n 
 
हे सगळे आज पुन्हा लिहिण्याची गरज काय, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. त्याचे कारण आहे. देशावर कोरोनाचे गंभीर संकट आहे. या संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार अविरत परिश्रम करीत आहे. संकटातून बाहेर पडण्यासाठी मोदी सरकारने लॉकडाऊनसारखे कडक उपायही केले आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेलाही फटका बसला आहे. सारासार विचार करून मोदी सरकारने निर्णय केला असताना आणि देश संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांची धडपड सुरू असताना, काँग्रेस पक्षाने या मुद्यावर जी भूमिका घेतली आहे ती अनाकलनीय आहे. देश एकीकडे कोरोनासारख्या गंभीर संकटाशी लढत असताना दुसरीकडे, शेजारच्या चीनने नवे आव्हान उभे केले आहे. चीनचे आव्हान पेलण्यासाठी आणि त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी मोदींच्या नेतृत्वात देश सज्ज असताना काँग्रेस पक्ष मात्र आपल्याच सरकारवर टीका करत आहे, लष्कराच्या सामर्थ्यावर शंका घेत आहे. भारताचा एक इंचही भूभाग चीनने ताब्यात घेतलेला नाही, असे मोदींनी स्पष्ट केले असतानाही राहुल गांधी त्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. चीनला आवडेल आणि पटेल अशी भूमिका घेऊन ते कुणाला मदत करताहेत, हे आता देशवासीयांना पुरते कळले आहे.
 
 
राहुल गांधींच्या नेतृत्वात चुकांमागून चुका करणार्‍या काँग्रेसने स्वत:चा जनाधार गमावला आहे. अनेक राज्ये काँग्रेसच्या हातून गेलीत. उत्तरप्रदेशसारख्या सर्वाधिक मोठ्या राज्यात तर काँग्रेस पक्ष गेली 30 वर्षे सत्तेबाहेर आहे, याची जराही खंत त्या पक्षाला आणि नेतृत्वाला वाटत नाही, हे दुर्दैवीच होय. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तर राहुल गांधी यांना परंपरागत अमेठी हा मतदारसंघही गमवावा लागला. केरळमधील वायनाड या अल्पसंख्यकबहुल मतदारसंघाने तारले म्हणून बरे झाले, नाहीतर राहुल गांधी यांना घरीच बसावे लागले असते! कॉंग्रेस पक्षाची आज जी अवस्था आहे, त्यापेक्षा वाईट होऊ शकत नाही, असा विचार आपल्या मनात येऊ शकतो. पण, आपण चुकीचा विचार करीत आहोत, हे काँग्रेसच वेळोवेळी सिद्ध करत असते. देशावर संकट आले असताना राजकारण विसरून सगळ्यांनी सरकारसोबत खांद्याला खांदा लावून काम करायचे असते. पण, सध्या काँग्रेसची वर्तणूक विचित्र दिसते आहे. राष्ट्रीय सुरक्षेसारख्या संवदेनशील मुद्यावर काँग्रेस इतर विरोधी पक्षांच्या विपरीत भूमिका घेत आहे. सरकारला विरोध एकवेळ समजू शकतो. पण, देशाच्या शत्रूला मदत होईल, अशी वक्तव्ये करून राहुल गांधी काय साध्य करू पाहात आहेत, हे जनतेला कळत नाही, असे समजण्याचे कारण नाही. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर एखादा विरोधी पक्ष असा विपरीत भूमिका घेतो, हे स्वातंत्र्यानंतर प्रथमच अनुभवास येत आहे. स्वत:ला स्वातंत्र्याच्या आंदोलनाची वारसदार म्हणविणारी काँग्रेस अशी विचित्र वागेल, याची अपेक्षाही कुणी केली नव्हती. पण, सोनिया गांधी आणि राहुल यांच्या नेतृत्वात हे घडताना दिसते आहे. जे दिसते आहे आणि अनुभवास येते आहे, ते खोटे कसे असेल?
 
 
ज्या कॉंग्रेसने राष्ट्रवादाची व्याख्या केली आणि राष्ट्रवाद अग्रभागी ठेवून स्वातंत्र्यासाठी आंदोलन उभारले, ती काँग्रेस तर कधीच विसर्जित झाली आहे. आजची काँग्रेस आणि तेव्हाची काँग्रेस यांची तुलना होऊ शकत नाही. पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांचीही काँग्रेस आजच्यापेक्षा वेगळी होती. चीनने लडाखच्या सीमेवर तणाव निर्माण केल्यापासून म्हणजे गेल्या महिनाभरापासून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी जी विधानं केली आहेत, ती चीनलाच मदत करणारी जास्त आहेत, हे देशवासीयांच्याही लक्षात आले आहे. हे काही पहिल्यांदाच घडते आहे असे नाही. पाकिस्तानने पुलवामा येथे केलेल्या घातपाती कारवाईनंतर जेव्हा भारतीय वायुदलाने ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला, त्यावरही सोनिया-राहुल यांच्या काँग्रेसशी वागते आहे, हा आपला समजही चुकीचा आहे. कारण, यापूर्वी पाकिस्तानने विश्वासघात करून कारगिल युद्ध लादले होते, त्या वेळीही कॉंग्रेसची भाषा अशीच होती. शत्रुराष्ट्राचे मनोबल वाढेल आणि आपल्या सैन्याचे मनोबल खच्ची होईल, असेच प्रश्न कारगिलच्या वेळीही कॉंग्रेसने विचारले होते. काँग्रेसची ही भूमिका कधीही विस्मरणात जाऊ शकत नाही. नेहरू-इंदिरा यांची काँग्रेस आणि सोनिया-राहुल यांची कॉंग्रेस यात बरेच अंतर आहे. ते सोनिया-राहुल यांनी प्रत्यक्ष कृतीने सिद्ध केले आहे. थोडक्यात काय, तर कॉंग्रेसच्या डीएनएतच बदल झाला आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. राष्ट्रहित ही प्राथमिकता मानण्याऐवजी शत्रुराष्ट्राचे मनोबल वाढविणारी या पक्षाची भूमिका निश्चितच िंनदनीय आहे.
 
 
चीनच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत काँग्रेसचा सहयोगी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, दक्षिणेतल्या द्रमुकने, तसेच पंतप्रधान मोदींचा प्रखर विरोध करणार्‍या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसने, उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनीही सरकारला भक्कम पािंठबा असल्याची भूमिका घेतली. राष्ट्रहित सर्वोपरी मानत संकटाच्या काळात सरकार आणि सैन्य यांच्यासोबत राहण्याची या पक्षांची भूमिका स्वागतार्ह आहे. पण, याच बैठकीत काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. एरवी मोदींना कडवा विरोध करणार्‍या बसपाच्या नेत्या मायावती यांनी सर्वात जास्त समंजस भूमिका घेत, कमालीचा संयम दाखवत राजकीय परिपक्वतेचा चांगला परिचय दिला. पण, काँग्रेसने मात्र विपरीत भूमिका घेत मित्रपक्षांच्या भूमिकेला फाट्यावर मारल्याचे दुर्दैवी चित्र पाहायला मिळाले.
 
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आज जरी काँग्रेससोबत असले, तरी सोनिया गांधी यांच्या विदेशी असण्याच्या मुद्यावरून ते कॉंग्रेस पक्षातून बाहेर पडले होते आणि राहुल गांधी यांचे नेतृत्व त्यांना कधी मान्य नव्हते आणि मान्य नसेल, यात शंकाच नाही. त्यांनीही सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेसला अप्रत्यक्षपणे झिडकारल्याचेच पाहायला मिळाले. काँग्रेससोबत राहणे ही शरद पवारांची राजकीय गरज आहे. मनातून त्यांना कॉंग्रेससोबत राहायला आवडत नाही, हे तेसुद्धा अमान्य करणार नाहीत. शरद पवारांनी झिडकारल्याचा काँग्रेसवर कोणताही परिणाम झाल्याचे दिसत नाही. कारण, अजूनही राहुल आणि सोनिया यांची वक्तव्ये चीनला बळ देणारीच येत आहेत. डाव्यांची भूमिका मात्र कॉंग्रेसशी मिळतीजुळती दिसते आहे. असे असले तरी डावे अधूनमधून सावध भूमिका घेतात. काँग्रेसला तेही जमत नाही. सातत्याने मोदी सरकारवर टीका करणे, सरकारच्या हेतूवर शंका घेणे, सैन्यदलाचे मनोबल खच्ची करणारी वक्तव्ये देणे, यातच काँग्रेसचा वेळ खर्ची पडत आहे. डावे पक्ष तर विसाव्या शतकात असल्यासारखेच वागत आहेत. सीताराम येचुरी यांना आताच्या संकटाच्या काळातही पंचशील करार आठवतो आहे. नेहरूंच्या काळात पंचशीलचा जन्म झाला आणि त्यांच्यासोबतच अंत झाला, याचा येचुरी यांना विसर पडलेला दिसतो आहे. डी. राजा नावाचे एक कम्युनिस्ट नेते आहेत. त्यांना तर स्वप्नातही अमेरिकाच सतावत असते. अमेरिकेसोबत झालेल्या अण्वस्त्र कराराला विरोध केल्याचा परिणाम म्हणून डाव्यांना निवडणुकांमध्ये सपशेल पराभव स्वीकारावा लागला होता. अगदी पानिपत झाल्यावरही डावे सुधारायला तयार नाहीत, हे त्यांचेच दुर्दैव. संपूर्ण जगातून कम्युनिझमचा नायनाट झाला असताना भारतात मात्र हे येचुरी आदी मंडळी कम्युनिझम जिवंत ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न करताहेत. नेहरू-गांधी यांनी नावारूपाला आणलेली कॉंग्रेस आजचे नेतृत्व रसातळाला घेऊन जाण्याचा विडा उचलल्यागत वागत आहेत, याचे आता आश्चर्य वाटेनासे झाले आहे.
 
 
भारत सरकारने फ्रान्सकडून राफेल विमाने खरेदी करण्याचा करार केला होता, त्या वेळी राहुल गांधी यांनी सरकारवर प्रचंड टीका केली होती. सरकारने यात घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यांचा तोच राफेल-अवतार सध्या कोरोनाच्या संकटातही पाहायला मिळतो आहे. राफेलच्या मुद्यावर सरकारवर आरोप करताना त्यांनी राजकारणाच्या सर्वच मर्यादा ओलांडल्या होत्या, सार्वजनिक जीवनात जी साधनशुचिता पाळावी लागते, तिलाही तिलांजली दिली होती. आताही ते तसेच वागत आहेत. राफेलवरून सरकारला ते घेरत होते, त्या वेळी निवडणुका समोर होत्या. मोदींवर सतत आरोप केले, तर जनता आपल्या बाजूने वळेल आणि सत्तािंसहासनावर बसवेल, असा त्यांचा समज त्यांच्याभोवती पिंगा घालणार्‍या चौकडीने आणि कथित सल्लागारांनी त्यांना करून दिला होता. पण, प्रत्यक्षात त्यांच्या सल्ल्याने वागलेले राहुल गांधीही गारद झाले आणि त्यांचा काँग्रेसपक्षही पराभूत झाला. मोदींच्या नेतृत्वातील भाजपाला 2014 पेक्षाही मोठे बहुमत मिळाले. 2014 सालीही काँग्रेसला लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळाले नव्हते आणि 2019 च्या निवडणुकीनंतरही ते मिळाले नाही. देशावर सर्वाधिक काळ राज्य करणार्‍या कॉंग्रेस पक्षाची ही अत्यंत दयनीय अवस्था अन्य कुणी नव्हे, तर केवळ सोनिया-राहुल या मातापुत्रानेच केली, यावर शिक्कामोर्तब झाले आहे! दुसरीकडे, नरेंद्र मोदी यांची स्थिती आधीपेक्षाही मजबूत झाली आहे. 2014 मध्ये 282 जागा िंजकणार्‍या भाजपाने 2019 साली 303 जागा जिंकून काँग्रेसला सत्तेपासून पार दूर फेकले, तरीही राहुल गांधी सुधारायला तयार नाहीत. मध्यंतरी काही काळ विजनवासात राहून ते लोकसभेत सक्रिय झाले असताना थोडी आशा निर्माण झाली होती. पण, तीही राहुल यांनी आपल्या बेताल वर्तणुकीने फोल ठरविली आहे. भावनेच्या भरात त्यांनी कॉंग्रेसचे अध्यक्षपद तर सोडले, पण आता पक्षाध्यक्षाच्या िंसहासनावर बसण्याची त्यांची ओढ सगळ्यांना स्पष्ट दिसते आहे. त्यासाठीच तर ते सध्याचा सगळा खटाटोप करीत आहेत. पण, असा खटाटोप करून आपण पक्षाला आणखी रसातळाला नेतो आहोत, याचे भान त्यांना राहिलेले दिसत नाही. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांना डरपोक म्हणण्यापर्यंत राहुल गांधी यांची मजल गेली. असे बोलून त्यांनी मोदींची नव्हे, तर स्वत:ची प्रतिमा मलिन केली आहे, हे अजूनही त्यांच्या लक्षात येत नाहीये.
 
 
चीनने भारताच्या हद्दीत घुसखोरी करून सीमेवर तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे देशभर चीनविरोधी प्रचंड संतापाची लाट आहे. लोक चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची भाषा करताहेत. ठिकठिकाणी चिनी राष्ट्रपती शी जिनिंपग यांचे पुतळे जाळताहेत. देशभर प्रचंड रोष असताना राहुल गांधी मात्र आपल्याच देशाच्या सरकारवर, सैन्याच्या कामगिरीवर संशय घेतात, हे बावळटपणाचेच लक्षण नव्हे काय? असे करून आपण देशवासीयांची उरलीसुरली सहानुभूतीही गमावत आहोत, हेही त्यांना कळत नाहीये. देशाची नाडी ओळखून वागण्याची राजकीय क्षमता त्यांच्यात नाही, परिपक्वता तर अजिबातच नाही, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीने दाखवून दिले आहे. जनभावना काय आहेत, हे कळत नसल्यामुळे ते सातत्याने सरकारवरच तुटून पडत आहेत आणि कॉंग्रेसची अवस्था अधिक बिकट करत आहेत. एकूण सगळी परिस्थिती लक्षात घेता, कॉंग्रेसला ईश्वरही वाचवू शकेल का, याबाबत शंकाच आहे. आजपर्यंत अतिशय धीम्या गतीने होत असलेल्या काँग्रेसच्या पतनाला राहुल गांधी यांनी वेग दिल्याने पक्षाचे भवितव्य टांगणीला लागले आहे, हे निश्चित!