अति व्यायाम खेळाडूंना घातकच !

    दिनांक :28-Jun-2020
|
निखिल केळापुरे
 
- प्रशिक्षकांनी योग्य मार्गदर्शन करण्याची गरज 
नागपूर,
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी आणि त्या स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त करण्यासाठी प्रत्येक खेळाडू वर्षभर परिश्रम करीत असतात. यंदा देशात आणि राज्यात कोरोनाने उन्हाळ्यातच धुमाकूळ घातल्याने टाळेबंदी लावण्यात आली. त्यामुळे खेळाडू ऐन उन्हाळी हंगामात सरावास मुकले. मात्र टाळेबंदीत शिथिलता आल्याने खेळाडूंना मैदानावर कसरतीची मुभा मिळाली. तब्बल अडीच महिन्यांनंतर धावपटू व इतर खेळाडू सरावासाठी उतरल्याने मागील अनुशेष भरून काढण्यासाठी ते अधिक व्यायाम करीत आहेत. हा अतिरिक्त व्यायाम खेळाडूंच्या आरोग्यास घातक ठरू शकतो. त्यामुळे शरीराला झेपेल एवढीच कसरत किमान काही दिवस तरी खेळाडूंनी करावी, अशी जाणकारांची अपेक्षा आहे.
 

Krida 28_1  H x 
 
 
काही वर्षांपूर्वी क्रीडा क्षेत्राकडे उदासीन नजरेने पाहिले जात होते. मात्र आता त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. प्रत्येकाने एक तरी खेळ खेळावा आणि स्वत:ला तंदुरुस्त ठेवावे यासाठी केंद्र सरकारने युवकांना प्रोत्साहन दिले. याच पृष्ठभूमीवर मोठ्या प्रमाणात देशातील तरुण-तरुणी क्रीडा क्षेत्राकडे वळले. खेळाडू वर्षभर कसरत करून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दमदार कामगिरी करण्यासाठी सराव करीत असतात. परंतु, यंदा सराव आणि स्पर्धांवर कोरोनाचे संकट कोसळले. यामुळे स्पर्धा तर दूरच साधा सराव देखील खेळाडूंना मैदानावर करता आला नाही. कोरोनामुळे लागू झालेल्या टाळेबंदीच्या काळात काही धावपटूंनी घरी सराव केला. मात्र काहींना घरी सरावासाठी जागा नसल्याने ते सरावापासून वंचित राहिले.
 
 
अशातच अ‍ॅथ्लेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने सप्टेंबरमध्ये राष्ट्रीय स्पर्धा घेता येतील असे एप्रिलमध्ये जाहीर केले. राष्ट्रीय स्पर्धांपूर्वी राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय अ‍ॅथ्लेटिक्स स्पर्धा होतात. जर सप्टेंबरमध्ये राष्ट्रीय स्पर्धा होणार असतील तर जुलै, ऑगस्टमध्ये या दोन्ही स्पर्धांचे आयोजन करणे गरजेचे आहे. यातच काही दिवसांपूर्वी खेळाडूंना कसरतीसाठी परवानगी दिल्याने आगामी काळात होणाऱ्या स्पर्धा आणि मागील काही दिवस सराव न झाल्याने खेळाडूंनी व्यायामाला सुरुवात केली. मात्र खेळाडू जीवापेक्षा अधिक व्यायाम करीत असल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे खेळाडू जखमी होण्याचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे प्रशिक्षकांनी योग्य काळजी घेऊन खेळाडूंना त्यातही मुला-मुलींनी त्यांच्या क्षमतेनुसार व्यायाम करवून घेणे गरजेचे आहे.
शारीरिक, मानसिक आरोग्य जपावे
जवळपास अडीच महिन्यांच्या विश्रांतीनंतर खेळाडू सरावासाठी मैदानात उतरले असल्याने योग, प्राणायामासह टप्प्याटप्प्याने फिटनेसमध्ये वाढ करावी. खेळाडूंनी मागील दिवसांची कसर भरून काढण्यासाठी अति व्यायाम करू नये. व्यायाम करताना ऋतुमानाचा विचार करावा. मागील काही महिने बऱ्याच खेळाडूंनी व्यायामच केलेला नाही. त्यामुळे आपले कसे होणार हा मानसिक ताण घेऊ नये. प्रशिक्षकांनी खेळाडूंच्या आहार आणि शरीर क्षमतेनुसार व्यायाम करवून घ्यावा. असे न झाल्यास थकवा, स्नायू दुखापत आदी समस्या निर्माण होतील. मानसिक ताण देखील वाढेल. त्यामुळे प्रशिक्षकांनी खेळाडूंकडे योग्य लक्ष द्यावे, असे मत नागपूर विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.

Krida 28_1  H x
 
प्रशिक्षकांनी याकडे आवर्जून लक्ष द्यावे
- नियमानुसार प्रत्येक प्रशिक्षकाने ५ ते ६ खेळाडूंनाच सरावासाठी बोलविणे गरजेचे.
- खेळाडू आणि प्रशिक्षकांनी भौतिक अंतराचे पालन करावे.
- खेळाडू व्यायामासाठी वापरत असलेले साहित्य सॅनिटाईझ करावे आणि वारंवार धुवावे.
- सर्व खेळाडूंकडे सॅनिटायझर आहे किंवा नाही हे प्रशिक्षकांनी तपासावे.
- खेळाडूंचे तापमान मोजण्यासाठी प्रशिक्षकांकडे तापमान मोजणी साहित्य असावे.