अमेरिकेत कोरोनाबाधित दोन कोटीपर्यंत पोहोचण्याची भीती

    दिनांक :28-Jun-2020
|
-रुग्णालयांतही मोठी गर्दी
वॉशिंग्टन,
अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, आगामी काळात ही संख्या दोन कोटीपर्यंत पोहोचू शकते, अशी भीती अमेरिकन सेंटर फॉर डिसीज कन्ट्रोलने व्यक्त केली आहे.
 
 
america_1  H x
 
 
हा आकडा सध्याच्या 24 लाख रुग्णांपेक्षा 10 पट जास्त आहे. अमेरिकेत एकाच दिवसात विक्रमी 41 हजार नवीन रुग्ण आढळले, तर 2 हजार 430 रुग्णांचा मृत्यू झाला. याआधीच्या दिवशी 37 हजार 77 नवे रुग्ण आढळल्याची नोंद झाली आहे, असे जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या सूत्रांनी सांगितले. आतापर्यंत अमेरिकेत 1 लाख 24 हजार 410 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. न्यू यॉर्कमध्ये 31 हजार 301 तर न्यू जर्सीमध्ये 14 हजार 872 जण मृत्युमुखी पडले. कॅ लिफोर्नियामधील संख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला असून, अॅरिझोना, फ्लोरिडा आणि टेक्सासमध्ये पाच हजारांहून अधिक नवे बाधित आढळले आहेत.
 
 
मागील 14 दिवसांत या भागातील रुग्णालये 32 टक्क्यांपर्यंत भरली आहेत. वाढता संसर्ग पाहता टेक्साससह अनेक राज्यांनी अन्लॉकचा पुढील टप्पा पुढे ढकलला आहे. मे महिन्यात टेक्सासमध्ये रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांना उघडण्याची परवानगी होती. या संदर्भात गव्हर्नर ग्रेग अॅबॉट यांनी सांगितले की, बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन आणखी कठोर निर्णय घ्यावे लागतील. फ्लोरिडामध्ये दोन दिवसांपासून 10 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाल्याची माहिती आहे.