कमोडिटी बाजारात आता गोल्ड मिनीचे सौदे

    दिनांक :28-Jun-2020
|
-सेबीने दिली परवानगी
मुंबई,
भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळ अर्थात्‌ सेबीने मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारांना गोल्ड मिनी आणि सिव्हर मिनीला परवानगी दिली आहे. त्यानुसार मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये गोल्ड मिनी आणि सिल्व्हर मिनी पर्यायांमध्ये व्यवसाय केला जातो. आता मल्टी कमॉडिटी एक्सचेंजसुद्धा गोल्ड मिनी आणि सिल्व्हर मिनीचा व्यापार आयोजित करणार आहे. एमसीएक्सवर ऑगस्टची मुदतपूर्ती असणारे गोल्ड मिनी आणि सिव्हर मिनी सादर केले जातील. यात गोल्ड मिनी कॉन्ट्रॅक्ट्‌स 100 ग्रॅमचे असतील, तर सिल्व्हर मिनी कॉन्ट्रॅक्ट्‌स पाच किलोचे असतील. प्रत्येक मिनी फ्युचर्ससाठी 100 स्ट्राईक प्राईज असणार आहेत. ही स्ट्राईक प्राइज प्रत्येक गुंतवणूकदाराच्या जोखीम पत्करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असेल.
 

gold mini_1  H  
 
 
एमसीएक्सवर गोल्ड आणि सिव्हर मिनी फ्युचर्सचे सध्या सौदे सुरू आहेत. सेबीने एवढ्यात एमसीएक्स गोल्ड ऑप्शन सुरू करण्यास परवानगी दिली होती. यात ट्रेिंडग एक किलो सोन्यासह सुरू केले जाते. त्यासाठी सुरुवातीला गुंतवणूकदारांना अतिशय कमी खर्च येतो. त्यानंतर सोन्याच्या भावातील चढ-उतारांप्रमाणे गुंतवणुकीवर परतावा मिळणार आहे. हे वायदे सुविहित सुरू राहावेत, यासाठी एमसीएक्सने आवश्यक त्या तंत्रज्ञानाची सिद्धताही केली आहे.
 
 
सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असणार्‍यांसाठी एमसीएक्समधील सोन्याचे वायदे हा चांगला पर्याय ठरणार आहे. गुंतवणूकदार कमी गुंतवणूक करूनही चांगला परतावा प्राप्त करू शकतात. योग्य वेळी योग्य ती सावधगिरी बाळगल्यास उत्तम परतावा प्राप्त करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी गुंतवणूकदारांना ऑप्शनची खरेदी अथवा विक्री करावी लागणार आहे. त्यामुळे निर्णय घेताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
 
 
एमसीएक्स नऊ कर्मचारी कोरोनामुक्त
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमधील नऊ कर्मचारी करोनामुक्त झाले असल्याची माहिती बाजाराने दिली आहे. लॉकडाऊनमध्ये एमसीएक्सच्या कार्यालयातील 30 पैकी नऊ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर हे सर्व कर्मचारी पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले असे एमसीएक्सने म्हटले आहे. एमसीएक्सचे दैनंदिन कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी आता रोटेशन पद्धतीने कर्मचारी काम करत आहेत, असे कमोडिटी बाजाराने म्हटले आहे.