कोरोनाविरोधात भारतात लोकलढा : पंतप्रधान मोदी

    दिनांक :28-Jun-2020
|
-अमेरिकेतील डॉक्टरांच्या कार्यक्रमात आभासी मार्गदर्शन
वॉशिंग्टन,
कोरोना महामारीविरोधात भारतात लोकलढा देण्यात आला. सुरुवातीलाच जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे या लढ्याला यश आले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियन ओरिजिन (एएपीआय) या संघटनेच्या कार्यक्रमात आभासी मार्गदर्शन करताना सांगितले.
 
 
pm modi_1  H x
 
 
भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी कोरोना संकटाचा वापर करण्यात आला, असेही त्यांनी सांगितले. एएपीआयच्या वार्षिक सभेला संबोधित करणारे ते पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. भारतीय वंशाचे 80 हजार डॉक्टर्स या संघटनेचे सदस्य आहेत. भारताने कोरोनाच्या विरोधातील लढा चांगल्या पद्धतीने दिला, असे त्यांनी विविध देशांची आकडेवारी सादर करताना सांगितले. अमेरिकेत प्रती दहा लाख लोकांमागे कोरोनामुळे मृत्युमुखी पडणार्‍यांचा दर 350 आहे. ब्रिटन, इटली आणि स्पेन या युरोपियन देशांमध्ये हा दर 600 असून, भारतात प्रती दहा लाख व्यक्तींमागे कोरोनाबाधितांचा मृत्यूदर केवळ 12 असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
उत्तरप्रदेशचे कौतुक
कोरोनाविरोधी लढ्यात उत्तरप्रदेशने नेत्रदीपक यश मिळवले आहे. इतर काही राज्येही प्रभावी कामगिरी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील नागरिकांनी दिलेल्या समर्थनामुळेच कोरोनाविरोधी लढा यशस्वी होत असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांनी सहकार्य केले नसते, तर दाट लोकवस्तीच्या जगातील दुसर्‍या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या या देशाला कोरोनाविरोधी लढ्यात यश मिळवणे शक्य झाले नसते. भारतात सामाजिक एकीककरण ही जगण्याची पद्धत आहे. येथे नेहमी मोठ्या प्रमाणात राजकीय आणि धार्मिक मेळावे होतात, मोठ्या प्रमाणात आंतरराज्यीय स्थलांतरणही सुरू असते. अशा परिस्थितीत हा लोकलढा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.