सहा राफेल विमाने 27 जुलैपर्यंत भारतात

    दिनांक :29-Jun-2020
|
- अंबाला येथे राहणार तळ
नवी दिल्ली,
आजच्या तणावाच्या स्थितीत भारताला राफेल विमाने मिळू नये, यासाठी चीनने अवलंबलेले सर्व दबावतंत्र अखेर निष्फळ ठरले. शत्रूला घाम फोडणार्‍या सहा राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी येत्या 27 जुलैपर्यंत भारतात दाखल होणार आहेत. या घडामोडींशी संबंधित उच्चस्तरीय सूत्रांनी याबाबतची माहिती आज सोमवारी दिली.
 
 
Aer0 India_1  H
 
भारताने फ्रान्सकडे 36 राफेल लढाऊ विमानांसाठी करार केला आहे. हा संपूर्ण व्यवहार 59 हजार कोटी रुपयांचा आहे. यातील काही विमाने या वर्षीच्या अखेरपर्यंत मिळण्याची अपेक्षा होती, पण चीन आणि पाकिस्तान या दोन शेजारील देशांच्या सीमांवर सातत्याने तणाव वाढत असल्याने, भारताची गरज लक्षात घेऊन, फ्रान्सने जुलैमध्येच सहा विमाने भारताला देण्याचे ठरविले आहे. संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी 2 जून रोजी फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ले यांच्याशी दूरध्वनीवरून या मुद्यावर चर्चा केली होती. जगात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला, तरी राफेल विमानांच्या पुरवठ्याला मुळीच विलंब होणार नाही. उलट, ठराविक मुदतीच्या आधीच ही विमाने भारताच्या सुपूर्द करण्यावर आमचा भर राहील, असे पार्ले यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर विमानांचा पुरवठा करण्याच्या प्रक्रियेलाही गती देण्यात आली होती.
 
 
चीनचा दबाव कुचकामी
सहा विमानांची पहिली तुकडी कुठल्याही स्थितीत जुलैच्या अखेरीस भारताला प्राप्त होईल, यासाठी फ्रान्सने तयार सुरू केली आहे. दरम्यान, लष्करातील एका वरिष्ठ अधिकार्‍याच्या मते, ही प्रक्रिया थांबविण्यासाठी चीनने फ्रान्सवर दबाव आणला होता. मात्र, तो झुगारण्यात आला आहे. राफेल विमाने भारताच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर, भारताची मारकक्षमता कितीतरी पटीने वाढणार असून, चीनलाही त्यातून आवश्यक तो संदेश मिळणार आहे.
 
 
राफेल विमानांचे पहिले स्क्वाड्रन हरयाणातील अंबाला येथे असणार आहे. भारतीय हवाई दलाचे हे सर्वाधिक धोरणात्मक तळ असून, ही विमाने प्राप्त झाल्यानंतर या तळाला आणखी महत्त्व प्राप्त होणार आहे.
 
 
राफेल विमानांची क्षमता
अण्वस्त्र वाहून नेण्याची तसेच नजरेच्याही पलीकडील लक्ष्य भेदण्याची राफेल लढाऊ विमानाची क्षमता आहे. हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणालीही या विमानात बसविण्यात आली आहे.
 
 
एकूण 10 विमाने तयार
सूत्रांच्या मते, दसॉं कंपनीने 10 राफेल विमाने तयार केली असून, यापैकी सहा विमाने भारतात पाठविण्यात येतील. या प्रवासात ही विमाने केवळ अबुधाबीच्या अल्‌ दाफरा तळावर थांबतील. भारतीय वैमानिकच या विमानांचे सारथ्य करतील. उर्वरित चार विमाने भारतीय वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी फ्रान्समध्येच ठेवण्यात येतील.