स्वॅब घेऊन जाणार्‍या रुग्णवाहिकेला अपघात

    दिनांक :29-Jun-2020
|
स्वॅब नमुने नष्ट झाल्याची भीती
मेळघाटातील घटांग नजीकची घटना 
धारणी, 
कोविड-19 नियंत्रण तथा उपाययोजना करण्यासाठी धारणी येथील सेंटरवर रुग्णांचे स्वॅब घेण्यात येत असून त्यांचे नमुने अमरावतीला नेताना घटांग जवळ रुग्णवाहिका पलटून गंभीर अपघात झाला. विश्वसनीय वृत्तानुसार, आरोग्य विभागाचे निवडक कर्मचारी सोबत असताना चालक दारूच्या नशेत धुंद होता. धारणी येथे कमला नेहरू मुलींच्या वसतिगृहात कोरोना तपासणी सुरू करण्यात आलेली होती. प्रथम दिवशी म्हणजे रविवार, 28 जून रोजी 21 जणांचे स्वॅब घेऊन रविवारी सायंकाळी रुग्णवाहिका अमरावतीकडे रवाना झाली. घटांग जवळ भीषण अपघातात गाडी उलटली. सुदैवाने जास्त मार लागला नाही.
 
dharani_1  H x
 
मात्र, याविषयी माहिती सोमवार, 29 जून रोजी देण्यात आल्याने संशय वाढलेला आहे. सर्व नमुनेसुद्धा सांडले असण्याची भीती असून गाडीत बसलेले अनेक लोक व स्वतः चालक दारू पिऊन नशेत होता, असे समजते. गाडीला फार मोठे नुकसान झालेले आहे. अपघाताविषयी धारणी येथील आरोग्य विभागालाही सोमवारी दुपारीच माहिती मिळाल्याने शंका वाढलेली आहे. अमरावती किंवा इतर शहरातून कामानिमित्ताने मेळघाटात येणारे प्रेमी येथील मोहाच्या मद्याचे रसपान करतातच, अशी अलिखित एक प्रकारची परंपरा पडलेली आहे.