अपघाती मृत्युप्रकरणी नुकसानभरपाईत भविष्यातील कमाईदेखील जोडा

    दिनांक :29-Jun-2020
|
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली, 
मोटार अपघातप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अतिशय महत्त्वाचा निर्णय दिला आहे. अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या विद्यमान कमाईत, भविष्यातील संभाव्य संपूर्ण कमाई जोडूनच नुकसानभरपाई दिली जावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
अपघातात मृत्यू पावलेल्या उत्तराखंडातील व्यक्तीच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा महत्त्वाचा निर्णय दिला. हा निर्णय देताना नुकसानभरपाईच्या रकमेत सर्वोच्च न्यायालयाने वाढ केली आहे. विमा कंपनीनी ही वाढलेली 17 लाख 50 हजार रुपये इतकी नुकसानभरपाई द्यावी. यासोबतच या रकमेवर साडेसात टक्के व्याजही दिले जावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. विशेषाधिकाराचा प्रयोग करीत नुकसानभरपाईची रक्कम वाढवल्याशिवाय पीडितांना संपूर्ण न्याय मिळणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय देताना म्हटले आहे.

delihi high court_1 
उत्तराखंड उच्च न्यायालयाने, मृत व्यक्तीच्या अंतिम आयकर परताव्याचा विचार न करून चूक केली आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीने हा परतावा मृत्युपूर्वी दाखल केला होता. यात त्याने आपली मिळकत वार्षिक एक लाख रुपये असल्याचे सांगितले आहे. उच्च न्यायालयाने त्यापूर्वीच्या तीन मिळकत परतव्याची सरासरी काढून 52 हजार 625 रुपये इतकी वार्षिक मिळकत असल्याचे मानले. ही उच्च न्यायालयाची चूक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. कनिष्ठ न्यायालयाने आयकर परतावा 2006-07 ची मिळकत 98,500 रुपये असल्याचे मान्य केले होते. मात्र, त्यात भविष्यातील मिळकत जोडली नव्हती. न्या. इंदू मल्होत्रा प्रमुख असलेल्या न्यायासनाने हा निर्णय दिला.