चिन्यांच्या तंबूला लागलेल्या गूढ आगीमुळे संघर्ष

    दिनांक :29-Jun-2020
|
- केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांचा दावा
 
नवी दिल्ली, 
चिनी लष्कराच्या तंबूला लागलेल्या गूढ आगीमुळे गलवान खोर्‍यात भारत आणि चिनी जवानांमध्ये संघर्ष झाला, असा दावा केंद्रीय परिवहन आणि महामार्ग खात्याचे राज्यमंत्री आणि माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी केला आहे. या संघर्षात 40 पेक्षा जास्त चिनी जवान ठार झाले, असा दावाही त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला.
पीपल्स लिबरेशन आर्मीच्या तंबूला अचानक आग लागली होती. त्यामुळे गलवान खोर्‍यात 15 जून रोजी चिनी व भारताच्या जवानांमध्ये संघर्ष झाला. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ दोन्ही देशांचे सैनिक उपस्थित राहणार नाहीत, असे भारत आणि चीनमध्ये कमांडर पातळीच्या झालेल्या बैठकीत ठरले होते. चकमक झाली त्या दिवशी भारताचे जवान आपल्या भागाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी, चिनी जवानांनी घटनास्थळ सोडले नसून, त्यांनी तंबू देखील उभारल्याचे भारतीय जवानांना आढळले, असे त्यांनी सांगितले.

vk singh_1  H x
हा तंबू काढण्यात यावा, असे सांगण्यासाठी भारताचा कमांडिंग ऑफिसर तिथे गेला. हा तंबू काढला जात असताना अचानक त्याला आग लागली. त्यानंतर दोन्ही देशांच्या जवानांमध्ये सिंसक संघर्ष झाला, असे त्यांनी मुलाखतीवेळी वृत्तवाहिनीला सांगितले. या संघर्षात 40 चिनी जवान ठार झाले. परंतु, चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी ठार झालेल्या जवानांची संख्या सांगण्यास तयार नाही, असे त्यांनी सांगितले.